मंगल प्रभात लोढा
सर्वांना व्यावहारिक आणि दर्जेदार शिक्षण मिळावे, उद्योग क्षेत्रांच्या गरजेनुरूप तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण प्रणाली विकसित व्हावी, अद्यायावत माहिती तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे, मागणीनुसार शिक्षणाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी…
देशातील युवक कौशल्यपूर्ण असावेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत विविध योजना राबविल्या. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सव्वादोन वर्षांत कौशल्य विकासाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांविषयी…
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबवली जाणार आहे. योजनेसाठी ५ हजार ५०० कोटींची तरतूद करण्यात आली असून योजनेसाठी उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण कालावधीत बारावी उत्तीर्ण उमेदवारांना दरमहा सहा हजार रुपये, आयटीआय व पदविकाधारकांना आठ हजार रुपये, पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधारकांना १० हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात कार्य प्रशिक्षणाच्या (इंटर्नशिप) १० लाख संधी उपलब्ध होणार असून प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक असे एकूण ५० हजार योजनादूत नेमण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>> लालकिल्ला : हरियाणामुळे महाराष्ट्रात नुकसान?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना – महिलांचे सर्वाधिक स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे हा योजनेचा उद्देश आहे. त्यासाठी १०० कोटींच्या निधीची तरतूद असून, सुमारे ५०० स्टार्टअप्सना २५ लाखांपर्यंत आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना– पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांची व्यवसायवृद्धी व्हावी यासाठी १८ प्रकारचे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या विश्वकर्मांना पाच दिवसांचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे. लाभार्थ्यांना संबंधित व्यवसायाच्या टूलकिटसाठी १५ हजार रुपयांचे ई-व्हाऊचर दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्याला प्रति दिवस ५०० रुपयेप्रमाणे एकूण तीन हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. प्रशिक्षणानंतर पात्र लाभार्थ्यांना व्यवसायवृद्धीसाठी विनातारण रुपये एक लाख रकमेचे कर्ज ५ टक्के व्याजदराने देण्यात येईल. पहिल्या हप्त्याच्या कर्जाची नियमित परतफेड केल्यास, लाभार्थ्यांना दोन लाखांचे कर्ज ५ टक्के व्याजदराने विनातारण मिळेल. जून २०२४ पर्यंत राज्यात एकूण ३६ हजार ४३ विश्वकर्मांनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना –
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आलेले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीतंर्गत ही नावीन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे. हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. प्रत्येक केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येईल. यामुळे संपूर्ण राज्यात १५ ते ४५ वयोगटातील साधारण एक लाख ५० हजार युवक-युवतींना दरवर्षी प्रशिक्षण मिळणार आहे.
महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना –या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ उमेदवारांना देय विद्यावेतनाच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त पाच हजार रुपये यापैकी कमी असलेले विद्यावेतन शासनातर्फे देण्यात येते. राज्यात एकूण ४७ हजार ६१४ उद्याोग व इतर आस्थापना शिकाऊ उमेदवारीसाठी नोंदणीकृत असून सद्या:स्थितीत एकूण आठ हजार ५३६ उद्याोग व इतर आस्थापना शिकाऊ उमेदवारी योजेनेची अंमलबजावणी करीत असून सद्या:स्थितीत एकूण दोन लाख ५४ हजार ८३९ शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत.
महाराष्ट्र इंटरनॅशनल – आंतरराष्ट्रीय स्तरावर युवकांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्ट्र इंटरनॅशनल हा स्वतंत्र कक्ष महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीअंतर्गत स्थापन करण्यात आला आहे. त्याद्वारे परदेशात नोकरीसाठी जाऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी समुपदेशन आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय भाषांचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महापुरुषांच्या कौशल्य विचारांचा अभ्यास – महापुरुषांच्या कौशल्यविषयक कार्याचा, धोरणाचा व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये समावेश केल्यामुळे व्यवसाय शिक्षण अधिक समृद्ध होऊन विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढण्यासही मदत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर या महापुरुषांच्या कौशल्यविषयक विचारांचा समावेश ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकात करण्यात आला आहे. आयटीआयच्या सद्या:स्थितीतील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त हा विषय विद्यार्थ्यांना शिकविला जाणार आहे.
आयटीआयमध्ये ७५ व्हर्चुअल क्लासरूम –व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात ७५ व्हर्चुअल क्लासरूम सुरू करण्यात आल्या आहेत. व्हर्चुअल क्लासरूममध्ये इंटरअॅक्टिव्ह पॅनल, संगणक सेवा, उत्तम बैठक व्यवस्था असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘स्किल इंडिया’ व ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमांअंतर्गत राज्यातील ४१९ औद्याोगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये व ५४७ खासगी औद्याोगिक प्रशिक्षण संस्थांना सहकार्य करून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
रोजगार मेळावे – उद्याोजक आणि रोजगार इच्छुक उमेदवारांमध्ये दुवा साधण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित केले जातात. २०२३-२४ मध्ये एकूण ५८१ रोजगार मेळावे पार पडले. त्यापैकी ३४ महिला रोजगार मेळावे होते. नागपूर, लातूर, अहमदनगर, बारामती-पुणे, ठाणे येथे पाच नमो महारोजगार मेळावे झाले. या मेळाव्यांमध्ये एक हजार ४९५ उद्याोजकांनी सहभाग घेतला, तर एक लाख ५७ हजार १३९ उमेदवार या मेळाव्यांना उपस्थित होते. यामध्ये ६० हजार ६९१ उमेदवारांची नोकरीकरिता निवड करण्यात आलेली आहे.
छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर – तरुणांना कौशल्य शिक्षणाचे व रोजगाराचे मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हास्तरावर ६ मे ते ६ जून २०२३ या कालावधीत करिअर मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एक लाख ७४ हजार ६३८ युवक-युवतींनी आणि १५ हजार ४१३ पालकांनी सहभाग घेतला.
महाराष्ट्र राज्य नावीन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८ – औद्याोगिकतेशी नावीन्यतेची सांगड घालून, महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकास व नावीन्यपूर्ण संकल्पनांना, उद्याोगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्याोजकता व नावीन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाने हे धोरण जाहीर केले. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील नावीन्यपूर्ण परिसंस्थेच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी काम करत आहे.
स्टार्टअप वीक – स्टार्टअप्सना शासनासोबत काम करण्याची संधी देण्यासाठी व प्रशासनात नावीन्य आणण्यासाठी नावीन्यता सोसायटीतर्फे दरवर्षी ‘‘महाराष्ट्र स्टार्टअप वीक’’ हा उपक्रम राबावला जातो. या अंतर्गत विजेत्या स्टार्टअप्सना १५ लाखांचे कार्यालयीन आदेश देण्यात येतात. आतापर्यंत झालेल्या पाच आवृत्त्यांच्या १२० विजेत्या स्टार्टअप्सचे काम विविध विभागांसोबत सुरू आहे. दरवर्षी, ग्रँड फिनाले दरम्यान, अव्वल १०० स्टार्टअप्सना स्टार्टअप एक्स्पो-व्हीसी मिक्सर, स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. महाराष्ट्र स्टार्टअप वीक ग्रँड फिनालेचा एक भाग म्हणून अखिल भारतीय स्तरावरील स्टार्टअप महासंमेलन आयोजित करण्यात येणार आहे.
आयटीआयमध्ये रात्र अभ्यासिका – राज्यातील ४१९ आयटीआयमध्ये रात्र अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पूरक वातावरण निर्माण करून आयटीआय बरोबर इतर संस्थामधील विद्यार्थ्यांनाही याचा लाभ घेता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ – महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात १८ अभ्यासक्रम शिकवले जातात. विद्यापीठाने विविध उद्याोगसमूहांबरोबर ५५ करार केले असून सर्व अभ्यासक्रमांत उद्याोग समूह विद्यार्थ्यांना नोकरी करताना प्रशिक्षण देणार आहेत. विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट्ससाठी एनएसडीसी इंटरनॅशनलबरोबर करार केला असून तिथे जपानी, जर्मन या भाषांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. बिग डेटा, एआय, सायबर सिक्युरिटीवर आधारित एमटेक या अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यापीठाने या वर्षी युरोपची नामवंत डिझाइन संस्था रुबिकशी करार करून जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमांची निर्मिती केली आहे. विद्यापीठाने आय-स्पार्क फाउंडेशनची विद्याविहार येथे स्थापना केली असून यामध्ये नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे, मेन्टॉरिंग, सीड फंड देणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येतात. विद्यापीठांनी २० महाविद्यालयांत प्री इनक्यूबेशन केंद्रांची स्थापना केली असून १०० नवसंशोधकांनी प्रस्ताव विद्यापीठात सादर केले आहेत.
संत गाडगेबाबा स्वच्छता अकादमी – स्वच्छ भारत अभियानात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी ठाण्यात संत गाडगेबाबा स्वछता अकादमीची स्थापना करण्यात आली आहे. ‘विकास ग्रुप’ या कंपनीबरोबर करार करू बीबीए फॅसिलिटी मॅनॅजमेण्ट व इतर प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहेत. तीन महिन्यांत ३०० लाभार्थींनी त्यांचा उपयोग करून घेतला असून त्यांना रोजगार प्राप्त झाला आहे.
कौशल्य विकास, रोजगार, उद्याोजकता व नावीन्यता मंत्री, महाराष्ट्र राज्य