उपग्रह वाहिन्यांमुळे नव्वदीच्या दशकात भारतातील टीव्हीने सिनेमापोईचे रूप धारण केले, तेव्हा अमेरिकी-हॉलीवूड चित्रपटांतील काळ्या-गोऱ्या कलाकारांची कर्तुमकी समसमान पातळीवर दिसत होती. वेस्ले स्नाईप नायक असलेल्या ‘ब्लेड’ मालिकेआधी त्याचे मारधाडीतील नैपुण्य दाखविणारे कित्येक चित्रपट गाजून इथे पोहोचले होते. पडद्यावर वाईट माणसे ते परग्रहावरील मानवांपासून अमेरिकेला (अन् पृथ्वीलाही) वाचविण्याचे महान कार्य करणारा विल स्मिथ टाळीफेक अभिनेता बनला होता. टेरेण्टीनोच्या ‘पल्प फिक्शन’नंतर सॅम्युएल जॅक्सन हे नाव जगभरात परिचित झाले होते. डेन्झेल वॉशिंग्टन, फॉरेस्ट विटेकर, लॉरेन्स फिशबर्न, मॉर्गन फ्रीमन ही नावे पुढल्या काळात ओळखीची आणि आवडीचीही झाली होती. पण या सगळ्या कृष्णवंशीय कलाकारांना चित्रपटांतील मुख्य भूमिकांत, मुख्य व्यक्तिरेखांत दिसण्यासाठी एकोणीसशे चाळीस-पन्नासच्या दशकातील पिढीला प्रचंड संघर्षदिव्यातून जावे लागले. त्या संघर्षकाळातील एक नाव होते रिचर्ड राऊण्डट्री यांचे. लिंकन पेरी हा हॉलीवूडमधील पहिला कृष्णवंशी अभिनेता. १९३७ ते १९५० पर्यंत त्याचे मुख्य काम हे बावळट व्यक्तिरेखा पडद्यावर दर्शविण्याचेच राहिले.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध : बॉबी चाल्र्टन
कृष्णवंशीयांच्या व्यक्तिरेखा मूर्ख, चोर आणि गुन्हेगारच दाखविण्यात स्वारस्य मानणाऱ्या हॉलीवूडमध्ये ‘ब्लॅक्स्पॉयटेशन’ चळवळीतून खरे बदल झाले. त्यात काही काळ्या चेहऱ्यांनी हॉलीवूडचे साठोत्तरीचे दशक गाजवले. हॅरी बेलाफॉण्टे यांना कॅरेबियन ‘कलिप्सो’ संगीताने नायक म्हणून उभे केले. हॅरी ब्राऊन या खेळाडूला गोऱ्या अभिनेत्रीसमवेत काम करताना पाहणे प्रेक्षकांनी पचवले. अन् त्याच काळात ‘शाफ्ट’ चित्रमालिकांमुळे रिचर्ड राऊण्डट्री यांना पहिला ‘ब्लॅक अॅक्शन हिरो’ म्हणून मान्यता मिळाली. ‘ब्लॅक्स्पॉयटेशन’ सिनेचळवळ ही कृष्णवंशीयांबाबत अपसमज पसरविणाऱ्या संकल्पनेविरोधात होती. या चळवळीतील मुख्य अभिनेत्यांमध्ये राऊण्डट्री यांचे नाव घेतले जाते. ‘शाफ्ट’ या कादंबरीतून उभे राहिलेले डिटेक्टिव्ह एजंटचे पात्र राऊण्डट्री यांनी वठविले. ते विविध हत्यारांनी आणि कराटे-मार्शल आर्ट्सच्या अर्ध्या डझन प्रकारांनी समृद्ध होते. त्यामुळे हाणामाऱ्यांतील देखणेपणामुळे ‘शाफ्ट’ हे पात्र जेम्स बॉण्डपेक्षा स्मार्ट असल्याच्या चर्चा त्या काळात रंगल्या. न्यू यॉर्कमध्ये सुखवस्तू घरात जन्मलेल्या आणि शरीर कमावलेल्या राऊण्डट्री यांनी सिनेमांत काम करण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडले. ‘शाफ्ट’ मालिका काही प्रमाणात गाजल्या, पण पुढे जगभरात अमेरिकी सिनेमाचा रतीब पुरविणाऱ्या स्टार मुव्हीज- एचबीओ- एमजीएम या वाहिन्यांना या सिनेमांचा आणि नायकाचा विसर पडावा, इतपत राऊण्डट्री यांची कारकीर्द अडगळीत गेली होती. २०१९ला पुन्हा सॅम्युएल एल. जॅक्सन ‘शाफ्ट’ म्हणून समोर आले, (त्यात राऊण्डट्रीही झळकले) पण जुन्या ‘शाफ्ट’ला लोकप्रियता मिळाली, तसे अमेरिकेतील भेदपूर्ण वातावरण बदलल्याने तो सिनेमा सर्वदूर पोहोचला नाही. राऊण्डट्री यांच्या निधनानंतर त्यांच्या कारकीर्दीविषयी जाणून घेण्याच्या निमित्ताने त्यांच्या अभिनय योगदानाची आणि ‘शाफ्ट’ या व्यक्तिरेखेची ओळख आजच्या दर्शकपिढीला कदाचित पहिल्यांदाच होऊ शकेल.