एके काळी लोकसभेत सोमनाथ चॅटर्जी, इंद्रजीत गुप्ता, वासुदेव आचार्य आदी डाव्या पक्षांमधील मातब्बर नेत्यांची फळीच होती. त्यांनी चार दशकांपेक्षा अधिक काळ खासदारकी भूषविलेली होती. नऊ वेळा लोकसभेत निवडून आलेल्या वासुदेव आचार्य यांच्या निधनाने डाव्या चळवळीतील आदर्श आणि जागृत संसदपटूंच्या फळीतील आणखी एक दुवा निखळला आहे. मूळच्या तमिळी असलेल्या आचार्य यांचे पूर्वज पश्चिम बंगालमध्ये स्थलांतरित झाले होते. आपण बंगाली आहोत, असेच आचार्य सांगत असत. पश्चिम बंगाल हा डाव्यांचा बालेकिल्ला. या राज्यातून आचार्य लोकसभेवर निवडून येत. साधी राहणी, विषयांचा अभ्यास, सामान्य लोकांच्या प्रश्नांची योग्य पद्धतीने मांडणी ही त्यांची वैशिष्टय़े होती. बंगाली-तमिळ कुटुंबात १९४२ मध्ये जन्मलेल्या आचार्य यांनी विद्यार्थिदशेपासूनच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात काम करण्यास सुरुवात केली होती.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध: फ्रँक बोरमन
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला. त्यांच्यातील नेतृत्वगुण बघूनच माकपने पुरुलिया जिल्हा सचिवपदी निवड केली होती. पुढे त्यांनी कामगार चळवळीचे नेतृत्व केले. खासगीकरणाच्या, कंत्राटी कामगार पद्धतीच्या विरोधात त्यांनी नेहमीच आवाज उठविला. लोकसभेत कामगारांच्या प्रश्नांवर ते ठामपणे बाजू मांडत असत. १९८० ते २०१४ या काळात त्यांनी पश्चिम बंगालमधील बनकुरा मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते. १९८० मध्ये त्यांना लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळाली त्याची पार्श्वभूमी काहीशी निराळी होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते बिमन बोस यांनी पक्ष संघटनेची जबाबदारी सांभाळण्याकरिता निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. बोस यांनी वासुदेव आचार्य यांच्या नावाची शिफारस केली होती. अशा रीतीने आचार्य यांची संसदीय कारकीर्द सुरू झाली. पुढे बिमन बोस हे पश्चिम बंगाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख झाले. आचार्य यांनी माकपच्या पॉलिट ब्यूरो, पश्चिम बंगाल राज्य समितीत अनेक वर्षे काम केले.
हेही वाचा >>> चिंतनधारा : लांगूलचालन करणारा शिक्षक घातक
सोमनाथ चॅटर्जी यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यावर माकपचे लोकसभेतील नेतेपदही आचार्य यांनी भूषविले होते. ‘सिटू’ या डाव्या पक्षाच्या कामगार संघटनेचे ते अनेक वर्षे उपाध्यक्ष होते. विमा क्षेत्रात खासगी कंपन्यांना प्रवेश दिल्याने एलआयसीचे कसे नुकसान होईल यावर त्यांनी सभागृहात अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण केले होते. सोमनाथ चॅटर्जी, इंद्रजीत गु्प्ता किंवा आचार्य यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाने सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढत असे किंवा त्यांच्या भाषणांची सरकारला दखल घ्यावी लागे. लोकसभेच्या संस्थात्मक ऱ्हासाबद्दल चिंता व्यक्त केली जात असताना वासुदेव आचार्य यांच्यासारखे तत्त्वाशी एकनिष्ठ आणि कधीही समझोता न करणारे नेते आता आढळणे दुर्मीळच. आचार्य यांच्या निधनाने संसद गाजविणारे डाव्या पक्षांमधील आणखी एक खासदार अस्तंगत झाले आहेत. साधी राहणी, अभ्यासपूर्ण भाषणे, महत्त्वाच्या विषयांचा सखोल अभ्यास असे खासदार अलीकडच्या काळात दुर्मीळ झाले आहेत. पश्चिम बंगालमधील डाव्यांची सद्दी संपून तृणमूल काँग्रेस सत्तेत आल्यावर २०१४ च्या निवडणुकीत एका नटीने आचार्य यांचा पराभव केला होता. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी हैदराबादमध्ये अखेरचा श्वास घेतला.