राष्ट्रीयीकृत बँकांचा दबदबा राहिलेल्या भारताच्या बँकिंग व्यवस्थेत बहुराष्ट्रीय बँकांचा वावर पूर्वापार असला तरी त्यांचा फैलाव एका मर्यादेतच राहिला. मात्र नव्वदीनंतर आखाड्यात उतरलेल्या नव्या पिढीच्या खासगी बँकांनी चित्र पालटले. या नव्या बँकांचे वैशिष्ट्य म्हणजे यातील बहुतांश वरिष्ठगणांची विदेशी बँकांतील, खासकरून ‘सिटि’तील उमेदवारी आणि पूर्वपीठिका खासच. परंतु विदेशी बँकेचे सर्वोच्च पद कोणा भारतीयाकडे असणे हे तोवर विरळाच. सिटि बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष व्हिक्टर मेनेझीस हे मात्र याला अपवाद ठरले.
तीन दशकांहून अधिक काळ सेवेनंतर, मेनेझीस यांनी २००५ मध्ये सिटि ग्रुपमधून निवृत्ती स्वीकारली. त्यांचा हा निर्णय अनेकांसाठी आश्चर्यकारक होता. कारण या महाकाय जागतिक बँकेच्या सर्वोच्च पदासाठी प्रमुख दावेदारांमध्ये त्यांचेच नाव आघाडीवर होते. पुणेकर मेनेझीस यांनी आयआयटी मुंबईतून विद्याुत अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून वित्त आणि अर्थशास्त्रातून पदव्युत्तर पदवी मिळविली. १९७२ मध्ये ते सिटिच्या सेवेत दाखल झाले आणि जगभरात वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांवर त्यांनी काम केले. मेहनती, कामात वस्ताद असलेली व्यक्ती बुद्धिमान आणि व्यवहारचतुरही असावी, इतकेच नाही तर मनमिळाऊ स्वभावाने ती जनप्रियदेखील ठरावी, असे दुर्मीळ संयोग म्हणून मेनेझीस यांच्या व्यक्तित्वाचा त्यांचे समकालीन आवर्जून उल्लेख करतात.
भारतातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या घडणीपासून तीन दशकांहून अधिक काळ तिचे प्रमुखपद भूषविलेले आदित्य पुरी म्हणूनच सिटि बँकेतील त्यांच्या कारकीर्दीत मेनेझीस यांनी वरिष्ठ म्हणून बजावलेल्या भूमिकेचा, त्यांच्या शिकवण आणि कानमंत्रांचा नि:संकोच उल्लेख करतात. त्यांच्या मते, सुयोग्य माणसांची पारख कशी करावी आणि त्यांच्याकडून इच्छित काम हे इष्टतम परिणामांसह कसे मिळवावे, हा मेनेझीस यांचा वकूब असामान्यच होता. मेनेझीस यांचे द्रष्टेपण म्हणजे त्या काळातही तंत्रज्ञानाच्या बँकिंग सेवेत असलेल्या भूमिकेची त्यांना पुरेपूर जाणीव होती. भविष्यातील बँकांचे सेवांचे वेगळेपण कसे असेल याबाबत त्यांची दृष्टी सुस्पष्ट होती. भारताच्या बँकिंग वर्तुळात अनेक वरिष्ठगण मेनेझीस यांचा कृतज्ञतापूर्वक वारसा सांगतात त्यामागे हे कारण आहे. निवृत्तीनंतर त्यांचे वास्तव्य अमेरिकेतच होते. अमेरिका इंडिया फाऊंडेशनचे मानद अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. परतफेड भावनेने त्यांनी आयआयटी मुंबईला ३० दशलक्ष डॉलर (सुमारे २५५ कोटी रुपयांची) देणगी दिली. आज त्यातून त्या संकुलात प्रशस्त परिषद सभागृहाची वास्तू उभारली गेली आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या या ज्येष्ठ बँककर्मीच्या कार्य-कर्तबाचा हा जिवंत वारसाच ठरावा.