‘तमिळनाडू ग्रीन मूव्हमेंट’चे संस्थापक सहसचिव असलेले एस. जयचंद्रन हे त्या राज्यातील पहिले व्यक्ती होते, ज्यांनी पश्चिम घाटाला पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करा, वन्यप्राण्यांचा अधिवास टिकवा आणि अतिक्रमण करणाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण करा अशी केंद्राला विनंती करून आवाज उठवला. विधायक कार्य करतानाच वन्यजीवांसाठी प्रसंगी सरकारच्या विरोधात उतरणारा एस. जयचंद्रन नावाचा आवाज हृदयविकाराच्या झटक्याने २२ सप्टेंबर रोजी कायमचा हरपला. त्यांनी तमिळनाडू ग्रीन मूव्हमेंट १९९० मध्ये सुरू केली. या चळवळीने केवळ सरकारविरोध न करता, वनखात्याला पुरेपूर सहकार्यही केले. त्यामुळे वन-कायद्यांच्या आखणीसाठी सल्ला आणि अंमलबजावणीत मदत खात्याला झाली. हत्ती किंवा इतरही वन्यजीवांच्या शिकाऱ्यांना त्यांच्या शिकारी प्रवृत्तीपासून परावृत्त करणे अशक्यप्राय असते. किंबहुना तसे प्रयत्नही कुणी करत नाही. मात्र, एस. जयचंद्रन त्यात यशस्वी ठरले. आज हेच हत्तीचे शिकारी वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करत आहेत, केरळमध्ये वनपर्यवेक्षक म्हणून काम करत आहेत. तमिळनाडू आणि केरळ वन विभागांना २०१५ मध्ये बेकायदा हस्तिदंताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्याशी संबंध असलेल्या शिकाऱ्यांच्या अटकेसह शिकारीची साखळी तोडण्यास जयचंद्रन यांची मदत होती. २०१० मध्ये, निलगिरी वन्यजीव आणि पर्यावरण संघटनेचे मानद सचिव म्हणून त्यांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे चेन्नई उच्च न्यायालयाने सिगूर एलिफंट कॉरिडॉरमधून बेकायदा पर्यटन पायाभूत सुविधा काढून टाकणारा ऐतिहासिक निकाल दिला. एवढेच नाही तर एस. जयचंद्रन यांनी मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प, तमिळनाडूमधील सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प आणि कर्नाटकातील बिलीगिरी रंगनाथ मंदिर व्याघ्र प्रकल्प यासह पर्यावरणीयदृष्टय़ा महत्त्वाच्या वनक्षेत्रातील अनेक रस्ते आणि पर्यटन पायाभूत सुविधा थांबवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी तमिळनाडू सरकार आणि वन विभागांसोबत निलगिरी बायोस्फीअर रिझव्र्हमधील प्रमुख वन्यजीव अधिवासांना एकत्रित करण्यासाठी सातत्याने काम केले.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध : डॉ. स्वाती नायक
वन्यजीवांच्या संवर्धनासाठी त्या क्षेत्रातील गावांचे, गावकऱ्यांचे स्थलांतरण करणे कठीणच, पण प्रसंगी सरकारविरोधात भूमिका घेणाऱ्या एस. जयचंद्रन यांनी सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत लोकांना थेंगूमऱ्हाडा येथे स्थलांतरित करण्यासाठी त्यांचे मतपरिवर्तन केले. त्यानंतर बरेच लोक स्थलांतरासाठी पुढे आले. बरेचदा जोखमीचा सामना करत वन्यजीव गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्यांनी मदत केली. जयचंद्रन यांनी भवानी नदीवर बंधारा बांधण्याचा केरळ सरकारचा प्रयत्न रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सरकारचा हा प्रयत्न प्रत्यक्षात उतरला असता तर कोंगू प्रदेशाला त्याच्या जलस्रोतापासून वंचित ठेवले गेले असते. त्यांनी मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील हत्ती कॉरिडॉरच्या मधूनच रेल्वे रूळ बांधण्याचा प्रस्ताव थांबवला. १९९८ मध्ये करमादई-मुल्ली-उटीमार्गे रस्ता तयार करण्यापासून आणि हसनूर कोल्लेगल महामार्गाचे रुंदीकरण करण्यापासून राज्य सरकारला रोखले, अन्यथा वन्यजीवांच्या हालचालींना अडथळा निर्माण झाला असता. त्यांना २०१७ मध्ये सँक्च्युअरी नेचर फाऊंडेशनकडून वन्यजीव सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वन्यजीवांसाठी इतक्या हिरिरीने काम करणारे संवर्धक दुर्मीळच, म्हणून त्यांचे अवघ्या ६५ व्या वर्षी त्यांचे झालेले निधन चुटपुट लावणारे.