भांडवली बाजाराने सोमवारी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकावा अशी भीतीदायी गटांगळी अनुभवली. हे असे यापूर्वीही अनेकदा घडत आल्याने सोमवार हा बाजारासाठी घातवार ठरलाय की काय, असे वाटावे. सेन्सेक्स-निफ्टी हे आपल्या बाजाराचे सूचक निर्देशांक या पडझडीत जवळपास तीन टक्क्यांपर्यंत लोळण घेताना आढळून आले. जगभरातील बाजारात सुरू असलेल्या पडझडीचेच हे प्रतिबिंब. जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँगसेंग अथवा अमेरिकेच्या एस अॅण्ड पी ५०० अथवा नॅसडॅकमधील गेल्या काही सत्रांतील घसरणीची मात्रा पाहिली, तर त्या तुलनेत आपली स्थिती बरी म्हणावी. पण हे समाधान वरवरचेच. उलट आपल्याला भीती अधिक हवी, कारण तेजीचे जोमदार वारे वाहणे सुरू असतानाच अकस्मात जबर धक्का बसतो आहे. म्हणजेच धावपटूने वेग पकडत इतरांपासून मोठी आघाडी घ्यावी आणि अंतिम रेषेला तो गाठणार इतक्यात पाय ठेचकाळून त्याने तोंडावर पडावे असा हा घाव! त्या धावपटूला परत उठण्याची संधी मिळेल की नाही हा प्रश्न जितका गहन, तितकाच बाजारातील पडझड सोमवारपुरती तात्कालिक प्रतिक्रिया स्वरूपाची की, ती पुढेही काही काळ सुरू राहील आणि राहिली तर कुठे जाऊन थांबेल, हे सध्या उत्तर अवघड असलेले प्रश्नही तितकेच सर्वांगाने गंभीर. त्यामुळे सोमवारच्या झडीची कारणे आणि त्यामागील सैद्धांतिक मांडणी, यापेक्षा पडझडीची नेमकी वेळ काय, हे लक्षात घेणे अधिक उपयुक्त. तसे केले तरच मग कुणी कमावले आणि कुणी गमावले हा हिशेबही स्पष्टपणे पुढे येईल. अमेरिकी अर्थव्यवस्थेतील मंदीचे संकेत आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून तेथील बाजार आपटणे हे चिंतेचे कारण आहेच. पण हे अगदी अनाकलनीय होते किंवा अकस्मातपणे घडून आले असेही नाही.

हेही वाचा >>> उलटा चष्मा : आपण रक्तपिपासू?

inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
After soybeans price of cotton become big issue for farmers in Vidarbha
विदर्भात कापसाचे अर्थकारण विस्‍कळीत
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’

अमेरिकेच्या अर्थसूचक आकडेवारीतील असे नरम-गरम उलटफेर कैक महिने सुरूच होते. पण विश्लेषकांचा सारा भर तेथे व्याजदर कपातीचे चक्र सुरू होईल आणि आज ना उद्या त्या संबंधाने अनिश्चितता संपुष्टात येईल. तशी ती संपुष्टात आल्याचे गेल्या बुधवारी फेडरल रिझर्व्ह या तेथील मध्यवर्ती बँकेच्या बैठकीतील चर्चेच्या समालोचनातून पुढे आलेदेखील. पण दोनच दिवसांत तेथील रोजगाराच्या प्रतिकूल आकडेवारीने बाजार पुन्हा पडला. दुसरीकडे बँक ऑफ जपानच्या व्याजदरात वाढीच्या पवित्र्याने तेथील बाजाराला मंदीत लोटले. सोमवारी तर ऑक्टोबर १९८७ नंतरची सर्वात मोठी घसरण (१५ टक्के!) तेथील निक्केई या निर्देशांकाने अनुभवली. वर्षभरात त्यांच्या निर्देशांकाने साधलेली वाढ एका दिवसात धुऊन निघाली. हे फार अगम्य नव्हतेच म्हणा! पण आपल्या बाजाराबाबत सर्वात अगम्य बाब हीच की, आपल्या बाजार नियामकाला म्हणजेच ‘सेबी’ला ज्याची चाहूल लागली आणि ज्याबद्दल अनेकदा नुसतेच इशारे दिले गेले ते टाळण्यासाठी प्रत्यक्षात काय केले गेले? सेबीच नव्हे तर रिझर्व्ह बँक गव्हर्नरही अलीकडे त्यांच्या कार्यकक्षेबाहेर जात बाजारातील उन्मादी तेजीबाबत सावधगिरीचा इशारा देऊन गेले.

हेही वाचा >>> पहिली बाजू : ठाकरेंचे वक्तव्य नैराश्याचे द्योतक

वायदे बाजारातील बेभरवशाचे सौदे हे कुटुंबाच्या बचतीचा घास घेत आहेत, असा सेबीने प्रसिद्ध केलेल्या ताज्या पाहणीचा निष्कर्षही याच पठडीतील. ताकीद, इशाऱ्यांच्या फैरी सुरू असतानाच, बाजार निर्देशांकांची विक्रमी शिखरांना सर करणारी बैलदौड सुरूच होती. तर्क, विश्लेषण, सद्या:स्थितीचा अन्वयार्थ हा ज्याच्या त्याच्या दृष्टीने वेगवेगळा लावला जाऊ शकेल. बाजार मंदीचा पूर्वअंदाज लावता येणे अवघड, हेही तितकेच खरे. पण गुंतवणूकदारांनी जे गमावले, ते गमावलेच. यातील अनेक गुंतवणूकदार असे की ज्यांनी कदाचित पहिल्यांदाच हा आघात आणि त्यापायी होणाऱ्या वेदना अनुभवल्या असतील. करोनाकाळानंतर डिमॅट खात्यांमध्ये दुपटीने झालेली वाढ अशा समयी मग फुशारक्या मारण्याची नव्हे, तर शोचनीय बाब ठरते. दु:खद गोष्ट हीच की, सध्याच्या झडीमागील कारणे आणि निदान जरी झाले तरी, उपचार मात्र शक्य नाही. बाजारातील उलटफेरीने हातातोंडाशी आलेले अपेक्षित लक्ष्य हिरावले गेल्याचा चटका जीवघेणी बोच देणाराच ठरतो. अशा समयी पैसा गमावतो तो छोटा गुंतवणूकदारच. दरमहा १५,००० कोटी ‘एसआयपी’तून गोळा करणाऱ्या म्युच्युअल फंडासारख्या देशी गुंतवणूकदार संस्थांनी, विदेशी गुंतवणूकदारांना तुल्यबळ सामर्थ्य कमावले म्हणणाऱ्यांच्या दाव्यातील फोलपणाही अशा वेळी उघडा पडतो. अशा या संक्रमणकाळात गुंतवणुकीचा संयम, सबुरी, सुज्ञतेचा पैलू आणखी उजळेल आणि फळफळेल, अशीच तूर्त अपेक्षा!

Story img Loader