अमृत बंग

सॅम बँकमन-फ्रिडच्या उदाहरणावरून व्यावसायिक नीतिमत्ता पायदळी कशी तुडवायची नसते, हे शिकले पाहिजे.

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Ministry of Statistics report reveals 25 6 percent youth deprived of education employment and skills
आजचे तरुण ‘बिन’कामाचे आणि ‘ढ’?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड

जगप्रसिद्ध मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण, ‘जेन स्ट्रीट कॅपिटल’ या प्रतिष्ठित गुंतवणूक फर्ममध्ये नोकरी, स्वत:ची ‘अॅलामेडा रिसर्च’ नावाची क्रिप्टो हेज फंड कंपनी व ‘एफटीएक्स’ हा क्रिप्टो एक्स्चेंज आणि मग अब्जाधीश, जगातील ३० वर्षांखालील सर्वात श्रीमंत व्यक्ती, फॉर्च्यून व फोर्ब्सच्या फ्रंट पेजवर फोटो आणि कव्हर स्टोरी… कुणाही तरुणाला हवीहवीशी वाटणारी ही स्वप्नवत कहाणी आहे सॅम बँकमन-फ्रिड (एसबीएफ) या अमेरिकन तरुणाची. जगभरातल्या काही तरी ‘इम्पॅक्ट’ घडवून आणू या असं मानणाऱ्या सगळ्या युवा-युवतींना प्रेरणा मिळेल अशी ही वल्ली.

दुर्दैवाने याच एसबीएफवर सध्या अमेरिकेत खटला चालू आहे क्रिप्टो इंडस्ट्रीमधला सगळ्यात मोठा आर्थिक घोटाळा करण्याचा. गुंतवणूकदारांच्या फसवणुकीपासून अफरातफरीपर्यंतचे सात वेगवेगळे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तो दोषी आढळला तर त्याला ११५ वर्षे तुरुंगवासाची सजा मिळेल असा अंदाज आहे.

यशाच्या, पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार असलेल्या एसबीएफचे साम्राज्य नोव्हेंबर २०२२ मध्ये अचानक संकटात आले आणि एका आठवड्यात खालसा झाले.

हेही वाचा >>> चतु:सूत्र: जकात आणि कृतिशील चांगुलपणा!

मात्र त्याआधी एसबीएफने अनेकांना भुरळ घातली. त्यामागे त्याचे व्यक्तिमत्त्व, स्मार्ट मार्केटिंग, क्रिप्टो करन्सीविषयी असलेले गूढमिश्रित कुतूहल, गुंतवणूकदारांची आर्थिक अपेक्षा, पैशाला यशाचे अंतिम मानदंड मानणे आणि पुरेशी शहानिशा न करता ‘सक्सेस स्टोरीज’ना भुलण्याची समाजातली मानसिकता इत्यादी अनेक कारणे आहेत.

अमेरिकन फुटबॉलमधील सुपरस्टार टॉम ब्रॅडी, विनोदी कलाकार लॅरी डेव्हिड, बास्केटबॉलमधील दादा खेळाडू स्टीफन करी अशा तगड्या लोकांचा अतिशय कल्पक पद्धतीने जाहिरातींसाठी उपयोग (त्यासाठी त्यांना लाखो डॉलर्स मानधन), १३५ दशलक्ष डॉलर्सचा करार करून अमेरिकन बास्केटबॉल क्लब मायामी हीट यांच्या मैदानाला ‘एफटीएक्स अरिना’ नाव देणे अशा गोष्टींमधून लोकांना एफटीएक्स एक्स्चेंज वापरून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात एसबीएफ यशस्वी झाला. सोबतच स्वत:ची पद्धतशीरपणे एक ‘क्रिप्टो गीक’ व ‘व्हिझकिड’ अशी इमेज तयार करण्यातदेखील तो कमालीचा यशस्वी ठरला. विस्कटलेले केस, कुठेही गेला तरी टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये (अगदी बिल क्लिंटन व टोनी ब्लेयर यांच्यासोबतच्या एका कार्यक्रमातदेखील पठ्ठ्या अशाच वेशात), ऑनलाइन मुलाखती देताना व्हिडीओ गेम खेळणे अशा अतरंगी हरकतींमधून ही व्यक्ती अफलातून आहे, संकेत व शिष्टाचार यापलीकडचा विचार करणारी आहे असा समज स्वत:बद्दल प्रसृत करून घेणे एसबीएफने साध्य केले. आपल्या संपत्तीपैकी काही भाग सामाजिक कार्यासाठी दान करणे हादेखील एसबीएफच्या कृतींचा (आणि पब्लिक इमेजचा) एक महत्त्वाचा भाग होता. सोबतच अमेरिकन निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात फंडिंग, वॉशिंग्टनमध्ये क्रिप्टोसंबंधी लॉबिंग अशा अनेक बाबी त्याच्या बहुरंगी व्यक्तित्वाचा भाग होत्या.

अनेक युवांना आयकॉन वाटेल अशा एसबीएफचा मग इतका अचानक ‘डाऊनफॉल’ कसा झाला? एसबीएफ ज्या कंपनीचा सीईओ त्या ‘एफटीएक्स’ या क्रिप्टो एक्स्चेंजवर दहा लक्ष युजर्स उलाढाल करत होते, आणि तो जगातला तिसरा सगळ्यात मोठा क्रिप्टो एक्स्चेंज होता. मात्र या ‘एफटीएक्स’च्या सॉफ्टवेअर कोडमध्ये असा घोटाळा होता की त्यामुळे एफटीएक्सद्वारे गुंतवणूक करणाऱ्या लाखो गुंतवणूकदारांचा पैसा एसबीएफ स्वत:च्याच ‘अॅलामेडा रिसर्च’ या हेज फंडकडे वळवत होता, वाटेल तिथे गुंतवत होता आणि मनात येईल तसा खर्चदेखील करत होता. हे म्हणजे स्वत:चा कॅसिनो सुरू करून त्यात ग्राहकांच्या पैशाने स्वत:च जुगार खेळणे असे झाले. ‘एफटीएक्स’च्या युजर्सचे एकूण आठ अब्ज डॉलर्स (सुमारे ६४० अब्ज रुपये) हे अशा रीतीने एसबीएफने ‘अॅलामेडा’कडे गुप्तपणे वळवले, वाट्टेल तसे खर्च केले, त्यातून बेभरवशी गुंतवणूक केली. आणि नंतर ग्राहकांनी त्यांचे पैसे परत मागितले तेव्हा ते परत करण्यास असमर्थता दर्शवली. याबाबत एसबीएफचे स्पष्टीकरण असे की हा सगळा नजरचुकीने झालेला गोंधळ आहे, यात जाणीवपूर्वक केलेले असे काही नाही. मात्र हे अविश्वसनीय आहे. एफटीएक्स व अॅलामेडा या दोन्ही कंपन्यांमध्ये एसबीएफसोबत जी टॉप लीडरशिप होती, जे त्याचेच मित्र व सहकारी होते, त्यातील किमान तिघांनी आम्ही दोषी आहोत असे कबूल केले आहे आणि एसबीएफ या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार कसा होता अशी साक्ष नुकतीच न्यूयॉर्क कोर्टात सादर केली आहे. एसबीएफसमोरील संकट त्यामुळे आता आणखीनच गडद झाले आहे.

यथावकाश एफटीएक्सने औपचारिकरीत्या दिवाळखोरी जाहीर केली. एसबीएफ सीईओ पदावरून पायउतार झाला आणि त्याच्या जागी जॉन रे यांची नियुक्ती झाली. जॉन रे अशा त्रासदायक कंपन्यांकडून ग्राहकांचे पैसे वसूल करण्यातले तज्ज्ञ मानले जातात. महाराष्ट्राला परिचित असलेल्या एन्रॉन या कंपनीच्या दिवाळखोरीनंतर यांनीच त्याची सूत्रे हाताळली होती. जॉन रे यांनी एफटीएक्सचा कार्यभार हाती घेतला तेव्हा ते असे म्हणाले की माझ्या अख्ख्या कॉर्पोरेट करिअरमध्ये मी इतके गलथान व्यवस्थापन, गव्हर्नन्स व कंट्रोल्सचा इतका पूर्ण अभाव आजपर्यंत कधी बघितला नव्हता.

या संपूर्ण प्रकरणातून आपण सगळेच, आणि विशेषत: तरुण काय शिकू शकतात?

खासगी, शासकीय वा सामाजिक, कुठल्याही क्षेत्रात काम करत असतानादेखील ‘प्रोफेशनल एथिक्स’ नावाची काही चीज असते जी सांभाळणे गरजेचे असते. आपल्या कामाच्या परिणामांसाठी आपणच जबाबदार असतो, म्हणून त्यातील खरेपणा, पारदर्शकता आणि ज्यांच्यासोबत व ज्यांच्यासाठी काम करतो त्यांच्याप्रति उत्तरदायित्व टिकवणे हे अत्यावश्यक आहे. स्वत:च्या वर्तनात तसेच मी जिथेही काम करतो त्या संस्थेच्या व्यवहारात काय मूल्ये प्रकट होतात वा उल्लंघली जातात याकडेदेखील लक्ष देणे जरुरी आहे. एसबीएफ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गुंतवणूकदारांचे सुमारे २५ कोटी डॉलर्स खर्च करून बहामाज बेटांमध्ये ३५ प्रॉपर्टी विकत घेतल्यात. तिथे काम करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना (आणि स्वत:ला) खूश करण्यासाठी अमेरिकेहून चार्टर्ड जेट्सद्वारे अॅमेझोनच्या ऑर्डर्स डिलिव्हर करून घेतल्या. हे पर्यावरणीयदृष्ट्या अक्षम्य आहेच, पण अशा ‘चीप गिमिक्स’ला भुलून याला ‘कूल वर्कप्लेस’ मानणे हादेखील खुळेपणा आहे हे समजणे गरजेचे आहे.

अंतिम साध्य वा निष्पत्ती महत्त्वाची, मग त्यासाठी माध्यम व प्रक्रिया कुठलीही आणि कशीही वापरली तरी ठीक, अशी मानसिकता आजकल युवांमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. यामुळे दैनंदिन कामात, रोजच्या जगण्यात, प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याला मनावर घेऊन त्यात सचोटी, खोली आणि सौंदर्य आणण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ‘चलता है’ अशी मनोवृत्ती, कामटाळूपणा व शॉर्टकट मारण्याचा मोह वाढताना दिसतो.

तुम्ही नेमके काय करता, त्यातील सत्त्व काय यापेक्षा बाहेरील वेष्टन कसे, तुम्ही स्वत:ला कसे मार्केट करता हे दुर्दैवाने लोकांना जास्त भुलवते आहे. कमी काम करून अथवा कमी दर्जाचे काम करूनही त्याचा प्रचार जोरात केल्यास स्वत:ला ‘सेलेब्रिटी’ म्हणून खपवता येते व ते म्हणजेच यश असे मानण्याच्या गर्तेतून युवांना सावध करणे गरजेचे आहे. सामाजिक वा व्यावसायिक, कुठल्याही दृष्टीने, आवश्यक तो वेळ देऊन स्वत:ची योग्यता जगासमोर सिद्ध न करताच, वाट्टेल त्या इतर मार्गाने ‘लवकरात लवकर प्रसिद्ध व यशस्वी होणे’ ही शर्यत कधीना कधी तोंडघशी पाडणारी आहे.

एसबीएफच्या प्रवासात त्याच्या जीवनातील इतरांनी, त्याचे पालक, शिक्षक, मेंटर्स, हितचिंतक, कोणीही त्याला कधीही मायेने वा खडसावून प्रश्न का विचारला नाही, या निसरड्या उतारावर घसरण्यापासून थांबवले का नाही हे समजत नाही. अत्यंत उच्चशिक्षित अशा त्याच्या पालकांनी त्याच्याकडून व एफटीएक्सकडून बरेच पैसे व इतर लाभ घेतलेत, पण आपले कर्तव्य बजावण्यात मात्र ते कमी पडले.

फोमो म्हणजे ‘फियर ऑफ मिसिंग आऊट’ याचा उल्लेख आपण सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात ऐकलेला असतो. मात्र एफटीएक्सच्या बाबतीतही ‘हे काही तरी भारी दिसते आहे, आपल्याला नीट समजत नसेल तरी इतर अनेक जण यात पैसे गुंतवत आहेत तर मग आपण मागे नको राहून जायला’ या मानसिकतेतून अनेक सर्वसामान्य गुंतवणूकदारांपासून चक्क सिकोया कॅपिटल, थर्ड पॉइंट अशा सिलिकॉन व्हॅलीमधील मातब्बर कंपन्यांदेखील पुरेशी शहानिशा न करता एफटीएक्सच्या नादाला लागल्या. आपल्याकडे आजकल कॉलेजच्या मुलांमध्येही स्वत:चा एक पैसा न कमावता, पालकांच्या पैशांना शेअर्स, ऑनलाइन गेमिंग व गॅम्बलिंगमध्ये टाकायची होड सुरू झालेली आहे…

गेल्या नोव्हेंबरमध्ये एका आठवड्याच्या आत जिचे गाडे गडगडले, इतक्या तकलादू पायावर उभ्या असलेल्या एफटीएक्सचे त्याआधी ३२ अब्ज डॉलर्स एवढे मूल्यांकन कोणी कसे केले हे अनाकलनीय आहे. असला फुगा फुटणारच होता. शेवटी आपण सातत्यपूर्ण व स्वयंप्रकाशित तारा व्हायचे की काही सेकंदात जळणारी उल्का हे ज्याचे त्याने ठरवायचे…

लेखक ‘निर्माण’ युवा उपक्रमाचे प्रमुख आणि ‘सर्च’ या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.

amrutabang@gmail.com

Story img Loader