डॉ. उज्ज्वला दळवी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सॅकरीन, सायक्लॅमेट, अॅस्पार्टेम, स्टेव्हिया हे सारे साखर नसलेले ‘गोडकरी’.. पण ते आरोग्यासाठी सुरक्षित मानावे का?
‘‘मधुमेही माणसा, केळी- चिकू- खजूर- द्राक्षं असं मोठ्ठा वाडगाभर फ्रुटसॅलड खाल्लंस! फळांतलीच साखर शंभर ग्रॅमच्या वर.. भरीला कस्टर्ड-जेली! शिवाय तोंडीलावणी, च्यावम्याव वगैरेत छुपी साखर असेलच! रक्तातली साखर गगनाला भिडली असेल! स्प्लेन्डा घातलेल्या गोड खिरीने भागत नाही का?’’ संजयने पथ्याचा बट्टय़ाबोळ केल्यामुळे आरती संतापली होती.
माणसामध्ये गोड चवीचा मोह जन्मजात नव्हे, जनुकजात आहे. मानवजातीच्या जन्माच्या कितीतरी आधीपासूनच शाकाहारी, मिश्राहारी प्राणी वानगी चाखत, नवं अन्न शोधत भटकत जात. बहुतेक विषांची चव आंबट-कडू असते. मेंदूच्या पोषणासाठी ग्लुकोजची गरज असते. ते गोड, पिष्टमय पदार्थातून मिळतं. तसं बिनविषारी, पोषक म्हणजेच गोड अन्न जाणणारे जनुक त्या प्राचीन प्राण्यांत उत्क्रांतीच्या ओघात निर्माण झाले, माणसाला लाभले.
तरीही १७व्या शतकापर्यंत सामान्य जिभांना फक्त रानमेव्याचा, क्वचित गुळाचा गोडवा ठाऊक होता. मध राजेरजवाडय़ांनाच मिळत होता. राजपुत्र- जन्मानिमित्त ‘हत्तीवरून साखऱ्या वाटला’ तर तेवढीच मिठाई जनसामान्यांपर्यंत पोहोचत होती. सतराव्या शतकापासून साखरेचं घाऊक उत्पन्न आणि दरडोई गोडधोडाचं खाणं वाढत गेलं. लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकाराचं प्रमाणही वाढलं. ‘साखरेचं खाणार त्याचं वजन वाढणार,’ ही नवी म्हण रूढ झाली. २०३०पर्यंत साखरखाऊ लठ्ठभारतींची संख्या भारतात सर्वाधिक झालेली असेल!
साखरेचा द्वाडपणा समजल्यापासून बिनसाखरेच्या गोड चवीचा शोध सुरू झाला. मध- गूळ- खजूर, फळं वगैरे माहितीतल्या नैसर्गिक पर्यायांना साखरेसारखेच दुष्परिणाम आहेत. गोडव्याच्या हव्यासामुळे माणसाने त्यांच्याहून वेगळे, नवे गोडकरी शोधले.
१८७९साली, जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातल्या संशोधकाने डांबरातल्या घटकांवर काम करताना, हात न धुताच ‘वदिन कवळ’ घेतला. घास अतिगोड लागला. या गोडव्याचा माग काढताना साखरेच्या ५५०पट गोड, टिकाऊ, अन्नपदार्थाशी मारामारी न करणाऱ्या, त्यांच्याबरोबर शिजताना नाश न पावणाऱ्या सॅकरीनचा शोध लागला. सॅकरीन लगेच बाजारात आलं. पहिल्या महायुद्धात साखरेची तीव्र टंचाई झाली आणि सॅकरीनच्या गोडीची महती जगाला अधिक पटली. ‘सॅकरीनमुळे उंदरांना मूत्राशयाचा कॅन्सर होतो,’ असा संशोधकी बोभाटा साठच्या दशकात झाला. सॅकरीनवर जगभर बंदी आली. अनेक मधुमेह्यांनी विरहगीतं लिहिली. नंतर संशोधकी अग्निपरीक्षेत सॅकरीनचा निष्कलंकपणा सिद्ध झाला. भारतात आता ते ‘स्वीट’एन लो’ नावाने मिळतं. शंभराहून अधिक वर्ष ते चॉकलेट-बिस्किट- शीतपेयांची गोडी वाढवतं आहे. तरी काही देशांत अजूनही त्याच्यावर बंदी आहे.
१९३७साली इलिनॉय विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनं ज्वरावरच्या औषधावर काम करताना टेबलावर ठेवलेली सिगारेट पुन्हा तोंडात घातली. ती त्याला गोड लागली. त्याचं कारण मुळापासून खणल्यावर सायक्लॅमेट सापडलं. अमेरिकेत आणि भारतातही, कर्कजनकतेच्या आरोपामुळे १९७९ पासून त्याच्यावर बंदीच आहे.
१९६५साली नेब्रास्कातल्या कार्यमग्न शास्त्रज्ञानं वहीचं पान उलटताना जिभेला लावलेलं बोट गोड लागलं. त्या माधुर्याचा छडा लावताना अॅस्पार्टेम हे साखरेच्या २००पट गोडकरी द्रव्य हाती लागलं. गोडचुकीमुळे हाती लागलेला तो तिसरा गोडकरी! बाजारात येण्यापूर्वीच शंभराहून अधिक देशांच्या औषध नियामकांनी त्या द्रव्याला संशोधनाच्या अनेक निकषांनी तपासलं. त्यांच्यातून तावूनसुलाखून १९८१ साली अॅस्पार्टेम बाजारात आलं. भारतात ते ‘शुगर-फ्री’, ‘ईक्वल’ या नावांनी मिळतं. त्याच्या प्रत्येक ग्रॅममधून साखरेसारख्याच चार कॅलरीज मिळतात. पण पदार्थाच्या गोडीच्या हिशेबाने अतिगोड अॅस्पार्टेमच्या कॅलरीज नगण्य ठरतात. अॅस्पार्टेममुळे शीतपेयांमधल्या संत्र्याची, चेरीची चव अधिक खुलते, च्यूइंग गम अधिक रुचकर लागतं.
अॅस्पार्टेमच्या रासायनिक बांधणीत मीथॅनॉल(म्हणजे खोपडी-दारूतलं विष) असतं. तापमान ३०डिग्री सेंटिग्रेडच्या (मुंबई-पुण्याच्या उन्हाळय़ातल्या तापमानाच्या) वर गेलं की मिथॅनॉल मोकाट सुटतं. त्यामुळे उष्ण वातावरणात राहिलेलं, चुकून तापवलं गेलेलं अॅस्पार्टेम वापरू नये. अॅस्पार्टेमच्या रासायनिक बांधणीत फिनाईल अलानाईन नावाचा एक प्रोटीन-घटकही असतो. तो आपल्या आहारात घेणं अत्यावश्यक. पण २० हजारांत एखाद्या मुलाला फिनाईल- कीटोन- यूरिया नावाचा आनुवंशिक आजार असतो. त्याच्या मेंदूवर फिनाईल अलानाईनचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. पण सर्वसाधारणपणे, माफक प्रमाणात अॅस्पार्टेम घेण्यात धोका नाही. निओटेम, अॅडव्हाण्टेम हे गोडकरी अॅस्पार्टेमसारखेच वागतात. पण त्यांची जिभेवर रेंगाळणारी चव कित्येकांना नकोशी वाटते.
१९७६मध्ये हफ आणि शशिकांत फडणीस या दोघा शास्त्रज्ञांनी लंडनच्या क्वीन एलिझाबेथ कॉलेजात रीतसर प्रयोग करून, साखरेच्या रासायनिक बांधणीत क्लोरीन घुसवून स्यूक्रालोज नावाचं कॅलरीविरहित गोडकरी द्रव्य बनवलं. ते साखरेच्याच चवीचं, पण ६००पट गोड. उच्च तापमानालाही टिकून राहतं. म्हणून केक-बिस्किटादी ४०००हून अधिक व्यावसायिक अन्नपदार्थात वापरलं जातं. ते आतडय़ातून विघटनाशिवाय, अलिप्तपणे आरपार निघून जातं, चुकून शरीरात शिरलंच तरी तिथे साठत नाही. भारतात ते ‘स्प्लेन्डा’ नावाने मिळतं. आजवर ते निर्धोक, मधुमेहींसाठी वरदान ठरलं होतं. पण रॅले विद्यापीठातल्या प्राथमिक संशोधनानं स्यूक्रालोज कॅन्सरजनक असण्याची शक्यता दर्शवली आहे.
पॅराग्वे देशातले लोक गोड पेयं बनवायला कित्येक शतकांपासून तिथल्याच‘काऽहीऽ’ नावाच्या झुडपाची पानं वापरत होते. तशा झुडपांची पैदास भारतातही होते. त्या पानांचा अतिशुद्ध अर्क म्हणजे स्टेव्हिया. उकळल्यानं ते नष्ट होत नाही. त्याच्यावर दोनशे मोठे शोध-प्रकल्प झाले. ते जिभेचे चोचले तर पुरवतंच शिवाय शरीरातल्या मोकाट, हानीकारक प्राणवायूला निकामी करतं. रक्तदाब, रक्तवाहिन्या, लिव्हर, प्रतिकारशक्ती वगैरे सगळय़ांना त्याच्यामुळे फायदाच होतो. ते भारतात ‘झेव्हिक’, ‘मोरिटो’ वगैरे नावांनी मिळतं.
बाजारी खाद्यांत सॉर्बिटॉल वगैरे गोड अल्कॉहॉलंदेखील असतात. त्यांनी पोट दुखतं, वारा धरतो, जुलाब होतात.
कृत्रिम गोडकऱ्यांच्या उत्पादकांना डोंगराएवढा नफा होतो. तरी गोडकऱ्यांची किंमत साखरेच्या तुलनेत फारच कमी असते. म्हणून बाजारी खाद्यपेयांचे उत्पादक आता साखरेपेक्षा गोडकरीच अधिक वापरतात. चीझ, पास्ता सॉस, सॅलड ड्रेसिंग्ज, सूप वगैरे अगोड पदार्थातही छुपे गोडकरी असतात. औषधांतल्या साखरेमुळे दात किडतात. ते टाळायला औषधांतही गोडकऱ्यांचा वापर वाढला आहे.
मधुमेहींच्या रक्तातली साखरपातळी जेवल्याजेवल्या शिखर, मग इन्सुलिनवाढीमुळे खोल दरी गाठत वरखाली नाचते. त्यांच्या आहारातल्या साखरेची जागा गोडकऱ्यांनी घेतली की साखर न नाचता स्थिर राहते. पण ते निर्धोक आहे का?
गोड खाल्ल्यावर मेंदूच्या गाभ्यातल्या केंद्रात डोपामीन नावाच्या आनंदरसायनाला उधाण येतं. शेजारच्या स्मृतिकेंद्रात त्या आनंदोत्सवाची आठवण कोरली जाते. उधाण ओसरून ओहोटी आली की नैराश्य येतं. नव्या उधाणाची अनावर ओढ लागते. पुन्हापुन्हा गोड खावं, खात राहावं असं वाटतं. गोडाचं व्यसन लागतं. गोडकऱ्यांच्या अति गोडव्याने तर उधाण आभाळाला भिडतं. गोड खायच्या असोशीने जीव वेडापिसा होतो. पुन्हा गोडकऱ्यांनी भरलेले खाऊ बकाबका खाल्ले जातात. साखरेच्या नसल्या तरी इतर कॅलरीज वाढतच जातात. सूड उगवल्यासारखं वजन वाढत जातं. वाढलेला रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार वगैरे लठ्ठपणाचे सगेसोयरे शरीरात वस्तीला येतात.
सॅकरीन आणि स्यूक्रालोज मोठय़ा आतडय़ांत पोहोचली की त्यांचा तिथल्या जंतुसमुदायाशी संपर्क होतो. विशेषत: काही गुणकारी जंतूंची संख्या घटते. लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार वगैरेंचं प्रमाण त्यामुळेही वाढू शकतं. त्या गोडकरी-गुणकारी-परस्परसंबंधांचा अधिक अभ्यास होणं आवश्यक आहे.
डब्ल्यूएचओच्या १० जून २०२३च्या मार्गदर्शक पत्रिकेत, ‘कुणीही वजन घटवण्यासाठी कृत्रिम गोडकरी वापरू नयेत’ असं स्पष्ट म्हटलं आहे. त्याच्यावरून बोध घ्यावा. पण गोडकऱ्यांपासून दूर राहायचं म्हणून पुन्हा ‘साखरेचं खाणं’ वेडेपणाचं ठरेल. आधी ‘शून्य कॅलरीज’, ‘लो-कॅल’ वगैरे छापे मिरवणारे पाकीटबंद खाऊ वज्र्य करावे. बाजारातल्या प्रत्येक पाकिटावर छापलेली सामग्री काळजीपूर्वक वाचावी. त्यांच्यातले छुपे रुस्तुम हुडकून टाळावे. सतराव्या शतकापूर्वीचे लोक जसे राजपुत्राच्या जन्मोत्सवालाच साखऱ्या खात, तसे गोड किंवा बाजारी पदार्थ सणासुदीपुरते आणि तेव्हाही माफकच खावे. बूफेमध्ये गोडाच्या विभागाकडे जाऊच नये.
संजयने तसं पथ्य केलं तर मधुमेह कह्यात राहील, वजन घटेल. भांडणं मिटतीलच आणि आरती आनंदाने त्याला तऱ्हेतऱ्हेच्या भाज्या- कोशिंबिरी आणि धिरडी- थालीपिठं करूनही घालेल.
लेखिका वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त आहेत.
ujjwalahd9@gmail.com