तर्कतीर्थांनी मार्क्सवादाचे भवितव्य’ या शीर्षकाने लिहिलेला लेख १९४९ चा. अवघ्या तीन दशकांतच मार्क्सवादास घरघर लागली. आज (२०२५) रशिया, चीन, उत्तर कोरिया, क्युबा, लाओस, व्हिएतनाम इथेच कम्युनिस्ट सत्ता आहे. विसाव्या शतकात पोलंड, हंगेरी, अल्बानिया, बल्गेरिया इ. देशांत ती होती. मार्क्सवादाच्या फसगतीचे विवेचन करीत या लेखात तर्कतीर्थांनी खुलासा केला आहे की, ‘जाणीव व जीवन मानवी व्यवहारात विभक्त नाहीत म्हणून नीती, धर्म, तत्त्वज्ञान, कायदा, कला इत्यादी जाणिवांची किंवा मनाची रूपे आर्थिक व्यवहारापासून विभक्त करून अर्थातच मूलभूत सत्य मानून मार्क्सने एकांगीपणे इतिहासचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात तो पूर्ण फसला.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऐतिहासिक सापेक्षवादाचा अतिरेक हा महत्त्वाचा दोष मार्क्सवादात भरून राहिला आहे. मार्क्सने मानवी इतिहासाची ढोबळमानाने पाच आर्थिक युगे मानली आहेत. त्याच्या दृष्टीने त्यात सर्व मानवी इतिहासाची समाप्ती होते. प्राथमिक साम्यवादी संस्था, प्राचीन दास्यमूलक संस्था, सरंजामशाही, भांडवलशाही व समाजवादी क्रांतियुग अशी ती पाच आर्थिक युगे होत. प्रत्येक युगाच्या सामाजिक जीवनाचे नियम वेगळे आहेत. सर्व जीवनमूल्ये त्या त्या आर्थिक युगापुरतीच खरी होत युग बदलले की ती बदलतात. मार्क्सवाद हा भांडवलशाही युगातील आर्थिक दुरवस्थेमुळे घडणाऱ्या जगण्याचे मनावर उमटलेले तात्पुरते प्रतिबिंब होय. ऐतिहासिक सापेक्षवाद तर्कशास्त्रदृष्ट्या सदोष आहे. कोणती मूल्ये विशिष्ट युगापूर्तीच व कोणती अनेक युगे व्यापणारी, हे तपासल्याशिवाय सर्वच मूल्ये युगसापेक्ष होत, हे मत चुकीचे आहे.

वस्तुत: कोणतीही कला, वाङ्मय वा शास्त्रीय सत्य यांची तपासणी करताना त्यांचे योग्य मूल्यमापन त्या त्या विषयाच्या तर्कशास्त्राने केले पाहिजे. भांडवलदारी हितसंबंधाचा दोष, न्यूनगंड, मनोविकृती इत्यादी कारणे दाखवून कोणत्याही मूल्याचा अधिक्षेप करणे सोपे आहे. परंतु त्यामुळे खरे मूल्यमापन होऊ शकत नाही. कलेच्या वा शास्त्राच्या सामान्य निकषाने अथवा तर्कशास्त्राने कलेचा विशिष्ट नमुना किंवा शास्त्राचा विशिष्ट निर्णय चूक की बरोबर, हे ठरविल्यानंतर व त्यातील प्रमाण उघडकीस आल्यानंतर त्या प्रमाणाची कारणे म्हणून वर्गहितसंबंधाचा पूर्वग्रह, सामाजिक परंपरा, न्यूनोच्च गंड किंवा मनोविकृती इत्यादी सांगणे योग्य होय. मार्क्सवादी किंवा मानस विश्लेषणवादी अथवा सामाजिक परंपरावादी हे या मूलभूत तर्कशास्त्रीय संशोधनपद्धतीचे उल्लंघन करून वाङ्मयाचा, कलेचा व शास्त्रीय विचारांचा निवाडा करू लागतात.

त्यांच्या स्वत:च्या विचारांची समीक्षा वर्गाहंकारबाधेने, मनोगंडपीडेने किंवा सामाजिक परंपरेच्या बंधनाने करून त्याचे खंडन होऊ शकते. मार्क्सवादातील वर्गरक्षण, मानसशास्त्रातील मनोविश्लेषण व सामाजिक पृथक्करण तत्त्वातील परंपराबंधन निदान ही दुधारी शस्त्रे आहेत. त्यांच्या घातक माऱ्यातून तो चालविणारा सुटू शकत नाही, म्हणून ती जपून वापरली पाहिजेत. मार्क्सवाद्यांनी सांस्कृतिक चिरमूल्यांचा उच्छेद त्या शस्त्राने चालविला. नैतिक सापेक्षवादाने मार्क्सवादाच्या तावडीतील जग भविष्यकालीन जगत्क्रांतीच्या आशेच्या नशेत बेताल म्हणून स्वैर झाले आहे.

विरोधविकासवाद हा मार्क्सवादाचा प्राण आहे. हा विरोधविकासवाद प्रथम हेगेल या जर्मन तत्त्वज्ञाने मांडला. त्याने अॅरिस्टॉटलचे तत्त्वज्ञान निष्फळ ठरविले. अविरोधाचा विरोध मोडीत काढला. केवळ विरोधविकास म्हणून समाजातील नेमकी कोणती शक्ती विरोध करून विकास करणारी आहे, हे निश्चित करता येत नाही. यात संधिसाधूपणाला वाव आहे. वाटेल ती साधने सूक्तासूक्त विचार न करता विरोधातून विकास होतो म्हणून वापरता येतात. कोणत्याही तर्कदुष्ट कल्पनेचे समर्थन विरोधविकासाच्या साहाय्याने कम्युनिस्ट पक्ष व मार्क्सवादी करू शकतात. विरोधविकासही एक किमया आहे. मार्क्सवाद्यांचा तो लोखंडाचे सोने करणारा परीस आहे. कामगारांच्या हुकूमशाही राज्यातून परिपूर्ण मानवी स्वातंत्र्याचे युग येईल, ही कल्पना मार्क्सने उराशी बाळगली, याचे कारण, हाच वाद होय. वस्तुत: ताकद, हिंसक शक्ती, सशस्त्र उठाव, हेच क्रांतीचे साधन झाले. फॅसिस्ट वृत्ती बळावली. स्वातंत्र्यांऐवजी दास्यत्वच सत्तेने जन्माला घातले. मार्क्सवाद विचार आणि व्यवहारातील अंतरामुळे भवितव्यास पारखा झाला. तर्कतीर्थांचे हे आकलन विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातले, पण नंतरच्या काळात ते वास्तव होऊन पुढे ठाकले आहे.

drsklawate@gmail.com