केरळच्या मंदिरांतील भित्तिचित्र शैलीला आधुनिक भारतीय रूप देणारे चित्रकार, साक्षात नंदलाल बोस- बिनोदबिहारी मुखर्जी- रामकिंकर बैज या शांतिनिकेतनच्या कलागुरूंकडून शिकण्याची संधी मिळालेले आणि भरपूर वाचन, निरीक्षण असलेले अभ्यासू कला-प्राध्यापक अशी ए. रामचंद्रन यांची ख्याती होती. त्यांचे १० फेब्रुवारीस निधन झाल्यानंतर माहिती-महाजालावर त्यांची चित्रे सहज म्हणून पाहू गेलेल्यांना मात्र अनेक धक्केही बसले असतील . उदाहरणार्थ, १९६० च्या दशकात ए. रामचंद्रन यांच्या चित्रांमध्ये भारतीय वळण नव्हते. किंबहुना नंदलाल, बिनोदबिहारींच्या रंगरेषांतील प्रासादिकतेपेक्षा त्यांच्यावर रामकिंकरांच्या रांगडया आकारसौष्ठवाचा प्रभाव त्या वेळी अधिक होता. एकंदर भारताप्रमाणेच शांतिनिकेतनातही साठच्या दशकात अभिव्यक्तिवादाचा (एक्स्प्रेशनिझम) प्रवाह जोर धरत होता, तोही त्यांच्या त्या वेळच्या कलाकृतींत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> व्यक्तिवेध: शशिकांत मुळे

या अभिव्यक्तीवादाला रामकिंकर अगदी निसर्गत:च जवळचे.. रामकिंकरांच्या शिल्पांतले सौष्ठव बाहेरचे पाहून नव्हे, तर आतून आलेले होते आणि त्यांच्याच ‘संथाळ फॅमिली’ या समूहशिल्पाची भुरळ त्या वेळी रामचंद्रन यांना होती, अशा नोंदी आहेत. पुढे १९७० च्या दशकापर्यंत रामचंद्रन यांच्या अल्परंगी चित्रांमध्ये काळयाकरडया रंगांतल्या वस्त्रहीन मानवाकृती असत, त्याही पायाच्या तळव्याकडून पाहिल्यासारख्या- म्हणून फार तर मांडीपर्यंतचाच भाग स्पष्ट दिसणाऱ्या.. या मानवाकृती वर ओढल्या जाताहेत किंवा गुरुत्वाकर्षणहीन पोकळीत आहेत, असे भासत असे. ती चित्रे थांबली, तोवर शांतिनिकेतनाच्या पौर्वात्य वारशाची जिवंत खूण असलेल्या चमेली रामचंद्रन यांच्याशी त्यांचा संसार बहरला होता. दोघे मिळून बालपुस्तकांसाठी चित्रेही करू लागले होते. जामिया मिलिया विद्यापीठाच्या कला विभागात रामचंद्रन यांची प्राध्यापकी सुरू होतीच, पण केरळ आणि शांतिनिकेतन यांच्या परंपरांचा समन्वय त्यांनी १९८० च्या दशकात कॅनव्हासवर आणला. तेव्हाची त्यांची फुले- पानेदेखील ‘खालून पाहिल्यासारखी’ होती, आणि कॅनव्हासभर पसरलेल्या त्या लालित्यात एखाद्या भ्रमराला स्वत:चा चेहरा देऊन रामचंद्रन यांचे गुंजन सुरू झाले होते. अच्युतन रामचंद्रन नायर यांनी इतिहास घडवला, तो या चित्रांमुळे. १९३५ मध्ये तिरुवनंतपुरम जिल्ह्यात जन्मलेल्या, केरळ विद्यापीठातून १९५७ मध्ये मल्याळम वाङ्मयाची पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या रामचंद्रन यांनी केरळी भित्तिचित्र परंपरेवर पुढे साद्यंत अभ्यासही केला, त्या मल्याळम पुस्तकाने अनेकांना प्रेरणा दिली. ‘वढेरा’सारख्या बडया कलादालनाच्या पाठिंब्यावर ते जगभर पोहोचणारच होते, पण भारत सरकारनेही २००५ मध्ये ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Artist a ramachandran biography a ramachandran s achievements in life zws