नलिनी भागवत या गेले काही दिवस, खरे तर काही महिने चित्रकलेच्या क्षेत्रापासून दुरावल्या होत्या. कलाविद्यार्थिनी, चित्रकार, कलासंशोधक आणि कलेतिहासाच्या प्राध्यापक, कलासमीक्षक आणि कलाविषयक सल्लागार अशा अनेक भूमिकांतून झालेल्या त्यांच्या प्रवासाची अखेर वृद्धापकाळ आणि अटळ मृत्यू अशीच झाली. मात्र या अटळ मानवी अंताआधी त्या जे जगल्या, ते चित्रासारखेच निकोप, नितळ आणि सुंदर होते. कलेचा प्रांत हा आपला आहे आणि तिथले सारेजण आपले आहेत, हा नलिनी भागवत यांचा स्थायीभाव, त्यांच्या निकोप वागण्याला झळाळी देणारा होता. त्यामुळेच यश, प्रसिद्धी, पैसा या लौकिक मोजमापांच्या पलीकडले अलौकिक स्थान त्यांनी टिकवले. अढळपदच ते.. किमान दोन पिढय़ांच्या मनातले!

हेही वाचा >>> अग्रलेख : ‘फेडरर रिपब्लिक’..

‘कलापूर’ अशी कोल्हापूरची कीर्ती जेव्हा सार्थ होती, अशा काळात या नगरीत त्या वाढल्या. इथल्याच दळवीज आर्ट इन्स्टिटय़ूटमध्ये, दत्तोबा दळवी यांच्याकडे शिकल्या. या संस्थेशी त्यांचे ऋणानुबंध दत्तोबांचे नातू अजय दळवी यांच्यापर्यंत कायम राहिले. या नगरीतल्या अनेक चित्रकारांवर भागवत यांनी लिखाण केले. कोल्हापूरच्या जलरंग निसर्गचित्र आणि पावडर शेडिंग ते तैलरंगातली व्यक्तिचित्रे या परंपरेत भागवत शिकल्या.  मात्र पुढे मुंबईच्या ‘जेजे’त गेल्या आणि संशोधनासाठी त्यांनी बडोदे येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठ गाठले. रतन परिमू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘पश्चिम भारतातील आधुनिक कलेचा विकास’ या विषयात पीएच.डी. मिळवली. त्यांचा हा ४०० पानी प्रबंध आजही ‘शोधगंगा’ संकेतस्थळावर उपलब्ध आहे.कोल्हापूर, मुंबईच्या खालोखाल इंदूर व बडोदे येथील चित्रकारांचाही अभ्यास भागवत यांनी केला होता हे त्यातून दिसतेच; पण ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’बद्दल अभ्यासू लिखाण करणाऱ्या त्या पहिल्या विदुषी आहेत (नंतर गीता कपूर यांचा  अभ्यासही ग्रंथरूप झाला), हे यातून सिद्ध होते.

‘जेजे’त विद्यार्थ्यांना कलेतिहास शिकवण्याचे काम त्यांनी १९७२ ते ९५ अशी २३ वर्षे केले. त्यानंतर त्या ‘लोकसत्ता’ व अन्यत्र कलासमीक्षा करू लागल्या. त्यांचे शिकवणेही सरळसाधे असावे, याची कल्पना त्यांच्या कलासमीक्षापर लिखाणातून येते. कधीतरी एकदा या लिखाणात ‘रांगोळीसारख्या’ असा उल्लेख असल्याने कुणा तंत्रनिष्ठ समीक्षकाला ठसका लागला होता म्हणे.. पण वृत्तपत्रीय समीक्षेत अशाच प्रकारे लोकांना विश्वासात घ्यावे, ‘ज्ञाताकडून अज्ञाताकडे’ न्यावे,  हे भागवत यांना नेमके उमगले होते. सरळपणा, सालसपणा ही वैशिष्टय़े व्यक्तीत असतील तर कारकीर्दीतही असतात, हे त्यांच्याकडे पाहून समजे. हेवेदावे तर नाहीतच पण रागलोभही नाहीत, असा विश्वास त्यांच्याबद्दल वाटे. त्यामुळेच विविध पातळय़ांवरली, भिन्न वयांची आणि पदांवरली माणसे त्यांच्या जाण्यामुळे खिन्न झाली असतील. या साऱ्यांनी, सुमारे दशकभरापूर्वी त्यांनी मीनाकारीच्या (धातूवरील एनॅमल काम) तंत्राने चितारलेल्या झोपाळय़ावरल्या स्त्रीचे चित्र आठवून पाहावे.. उन्हे उतरताना जगाचे भान विसरून स्वत:च्या झोक्यांशी तल्लीन झालेली ती स्त्री आता झोपाळय़ावरून उतरली असेल! 

Story img Loader