डॉ. श्रीरंजन आवटे
चित्रकार नंदलाल बोस यांनी संविधानाच्या हस्तलिखितात भारताची संस्कृती, इतिहास आणि वैविध्य चित्रांतून मांडले आहे…
संविधानाचे हस्तलिखित हा सचित्र दस्तावेज आहे. त्यात सुरेख चित्रेही आहेत. ही चित्रे काढली आहेत आधुनिक भारतीय चित्रकलेचे जनक ज्यांना मानले जाते अशा नंदलाल बोस व ‘शांतिनिकेतन’मधील त्यांच्या विद्यार्थ्यांनी. २२ भागांच्या सुरुवातीला चित्रे आहेत. ही चित्रे साधारण तीन बाबींविषयीची आहेत: १. धर्म आणि संस्कृती २. इतिहासाचे टप्पे, राजे, महाराजे, प्रेरणादायी व्यक्ती ३. भारताचा स्वातंत्र्यलढा. या चित्रांचा आणि संविधानातील भागांच्या आशयाचा थेट सहसंबंध नाही.
सिंधू संस्कृतीचे प्रतीक असलेला बैलाचा शिक्का अगदी पहिल्या भागात आहे. लंकेच्या युद्धानंतर प्रभू राम, सीता, लक्ष्मण परतत असतानाचे चित्र संविधानाच्या तिसऱ्या भागाच्या सुरुवातीला आहे तर चौथ्या भागाची सुरुवात होते कृष्णासोबत चर्चा करणाऱ्या अर्जुनाच्या चित्राने. पाचव्या भागाच्या सुरुवातीला आहेत पशुपक्ष्यांसोबत रमलेले गौतम बुद्ध आणि सहाव्या भागाच्या सुरुवातीला आहेत वर्धमान महावीर. महाबलीपुरममधील शिल्पांच्या चित्राने तेरावा भाग सुरू होतो. धर्म आणि संस्कृतीविषयक वैविध्य असलेली अशी अनेक चित्रे यात दिसतात.
हेही वाचा >>> चतु:सूत्र : संविधानाचे आस्थाविषय
इतिहासातील काही पराक्रमी व्यक्तींची चित्रेही आपल्याला संविधानात दिसतात. यात हत्तीवर बसून बौद्ध धर्माचा प्रचार करणारा सम्राट अशोक दिसतो तर पुढे परिवर्तनवादी मुघल सम्राट अकबराचे चित्र दिसते. गायक, नर्तकांच्या दरबारासह राजा विक्रमादित्याची छबी दिसते तर संविधानाच्या पंधराव्या भागात आपली छत्रपती शिवरायांशी भेट होते. सोबतच गुरू गोविंद सिंग रेखाटले दिसतात. म्हैसूरचे राजे टिपू सुलतान आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची सुरेख चित्रेही संविधानात आहेत.
चौदाव्या भागाच्या सुरुवातीला पर्वताच्या पार्श्वभूमीवर तिरंग्याला सलाम करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद फौजेचे सैनिक दिसतात. तसेच महात्मा गांधींविषयीची दोन चित्रे संविधानात आहेत. एका चित्रात दांडी यात्रा दाखवली आहे. दुसरे चित्र विशेष बोलके आहे. ते आहे नौखालीमधील. तिथे हिंदू-मुस्लीम दंगे मोठ्या प्रमाणावर झाले होते आणि गांधीजी निधड्या छातीने तिथे जाऊन दंगल शमवण्याचा प्रयत्न केला होता. त्या पार्श्वभूमीवर हे चित्र आहे. त्यात गांधी उभे आहेत आणि त्यांना हिंदू स्त्रिया आरतीचे ताट घेऊन ओवाळत आहेत तर कुफी टोपी घातलेले मुस्लीम शेतकरी त्यांचे स्वागत करत आहेत, असे हे काव्यात्म चित्र आहे! याशिवाय तीन निसर्गचित्रे संविधानात आहेत ती रवींद्रनाथ टागोरांना अर्पण केलेली आहेत.
हेही वाचा >>> संविधानभान : संविधानाच्या पानापानांवरील ‘प्रेम’
इतक्या व्यापक पटाचे भान असणारे नंदलाल बोस हे महान चित्रकार होतेच. त्यासोबतच ते स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय होते. महात्मा गांधींमुळे त्यांनी काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनांसाठीही चित्रे काढली होती. त्यांच्या चित्रशैलीवर अवनींद्रनाथ टागोरांचा प्रभाव होता. चित्रकलेच्या, नक्षीकामाच्या आणि एकूणच या कलाकुसरीच्या कामात नंदलाल बोस यांच्यासमवेत ब्योहर राममनोहर सिन्हा, ए. पेरुमल, कृपालसिंग शेखावत यांच्यासारखे कलाकार होते, कोल्हापूरचे विनायक शिवराम मासोजी यांच्यासारख्या श्रेष्ठ चित्रकारांची साथ होती तर जमुना सेन, निवेदिता बोस यांसारख्या महिला चित्रकारही बोस यांच्यासोबत होत्या.
ही सारी चित्रे सांगतात- कहाणी माणसाची! त्याच्या प्रवासाची. ती सभ्यतांचा आलेख मांडतात. संस्कृतीतला सलोखा सांगतात. प्रेमाला लिपीबद्ध करतात. स्वातंत्र्याचे गीत गातात. इंद्रधनुषी रंगात भारताचा कॅनव्हास रंगवतात. त्या कॅनव्हासवर उमटले आहे भारतीय संस्कृतीचे नितांत सुंदर असे कोलाज. विंदा करंदीकरांच्या भाषेत हे कोलाज सांगते: मानवाचे अंती एक गोत्र!
poetshriranjan@gmail. com