अभिजीत ताम्हणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कलाकृतींमध्ये स्थळकाळानुरूप स्वत:चं चिंतन पेरण्याचं कामही काही विचारी कलावंत करतच असतात. भले ती कलाकृती परीक्षाप्रदर्शनातली का असेना..

कुठल्याशा विद्यापीठात कलाविषयक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा भाग म्हणून सादर झालेल्या कलाकृतींनी समजा कुणाच्या भावना दुखावल्या तर काय होतं, याचं प्रस्तुत लेखकानं अगदी जवळून पाहिलेलं उदाहरण २००७ सालच्या मे महिन्यातलं. बडोदे इथल्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या दृश्यकला विभागात शिल्प, रंगचित्रं, मुद्राचित्रण अशा उपविभागांमध्ये पदवी आणि पदव्युत्तरच्या अखेरच्या वर्षीच्या परीक्षेचा भाग म्हणून, या परिसरातली एखादी जागा निवडून परीक्षार्थीना आपापल्या कलाकृतींचं छोटेखानी प्रदर्शन मांडावं लागतं. बाहेरचे परीक्षक या कलाकृती पाहतात, त्याबद्दल संबंधित परीक्षार्थीची (उद्याच्या कलावंताची) भूमिका जाणून घेण्यासाठी त्या परीक्षकांकडून मुलाखत घेतली जाते.. शिवाय कोणाही कलारसिकांना पाहण्यासाठी हे परीक्षाप्रदर्शन खुलंच असतं, अशी पद्धत अनेक वर्षांची. पण २००७ पासनं तिच्यात बदल झाला. कोणता बदल, ते नंतर पाहू. बदलच करावा लागण्यासारखं काय घडलं, ते आधी सांगतो. त्या वर्षी, मुद्राचित्रण शिकणारा एक विद्यार्थी चंद्रमोहन यानं येशू, दुर्गा यांच्या रूढ प्रतिमांना मानवदेहाच्या वाटय़ाला निसर्गानं दिलेले भोग (उत्सर्जन, जनन) जर आले तर काय होईल, अशा प्रकारची कल्पना करून तीवर आधारित कलाकृती केल्या होत्या. कल्पना किती ताणावी, कुठे थांबावं हे या परीक्षार्थीला कळत नाही, हे त्याच्या कलाकृतींतून दिसत असल्याचं माझं प्रथमदर्शनी मत झालं. पण मुद्राचित्रण विभागातला असूनही त्यानं शिल्पं, मांडणशिल्प केली आहेत, हे पाहता या तरुणाचा कामाचा उत्साह भरपूर असणार हे अधिक प्रकर्षांनं दिसत होतं आणि त्या उत्साहाच्या भरात आशयाकडे दुर्लक्ष झालं असेल, असं मानायला जागा होती. ही ‘मानायला जागा’ जी असते, ती खूप-खूप महत्त्वाची असते. ज्याला कलावंताचा कलेचा ‘अवकाश’ असं म्हटलं जातं ती ही जागा असते.

तो अवकाश किती संकुचित आहे आणि फक्त ‘कलाकृतीत देव दिसतायत आणि तेही काहीतरी घाणेरडं करताना दाखवले आहेत’ एवढंच पाहून या अख्ख्या परीक्षाप्रदर्शनावर घाला आणला जातो आहे, संबंधित विद्यार्थ्यांला अटक होते आहे (पुढे जामीनही मिळत नाही), त्यानं ज्या भागात स्वत:च्या परीक्षा-कलाकृती ठेवल्या त्या खोल्याच ‘मुद्देमालासह सीलबंद’ केल्या जाताहेत, या निमित्तानं या विद्यापीठाच्या अख्ख्या कलाविभागाला आणि विशेषत: तिथल्या काही पुरोगामी शिक्षकांना ‘कुजबुज ब्रिगेड’च्या हल्ल्याचं लक्ष्य बनवलं जात आहे , असा अनपेक्षित घडनाक्रम घडत गेला. राज्य गुजरात, शहर बडोदे आणि सन २००७ हा स्थळकाळसंदर्भ पुरेपूर अंगी बाणलेले असे जे बडोदेवासी काहीजण होते, त्यापैकी काही ‘हितचिंतकां’नी संबंधित विद्यार्थ्यांला सांगितलंही होतं म्हणे- ‘‘तुझ्यामुळे सगळे गोत्यात येतील, असं नको करू’’. पण त्याला तो सल्ला कळला नाही आणि व्हायचं ते झालं. यामागे जो सत्ताधारी, शिरजोर पक्ष कार्यरत होता त्यातल्या एका तत्कालीन वकील-कार्यकर्त्यांनं, विशेषत: प्रादेशिक भाषांतल्या आणि त्यातही विशेषत: टीव्ही चॅनेलच्या पत्रकारांना आत नेऊन, ‘हा पाहा केवढा अपमान धर्माचा, केवळ आपल्याच नव्हे, त्यांच्याही धर्माचा..’ अशी कॉमेंट्री आरंभल्याचाही अनुभव प्रस्तुत लेखकानं तेव्हा घेतला होता.

‘‘कलेच्या जागी कलेचीच चर्चा करा’’ हा जर दंडकिबडक असेल तर हा दंडक कोण, कसा नि किती पायदळी तुडवतंय याचा उत्तुंग वस्तुपाठ त्यातून मिळाला होता.

हा प्रकार घडल्यानंतर विद्यापीठाच्या त्या विभागातलं वातावरण कलुषित झालं, लोकशाहीप्रेमी विद्यार्थ्यांनी पुढल्या शैक्षणिक वर्षांतही विरोध सुरू ठेवला वगैरे.. आणि विद्यापीठाच्या कलाविभागानं परीक्षा-प्रदर्शनाचे नियमही बदलले. बाहेरून आलेल्या परीक्षक मंडळाचं काम पूर्ण झाल्यानंतरच, ‘निवडक’ कलाकृती सर्वाना पाहण्यासाठी खुल्या केल्या जाव्यात असा साधारण तो बदल होता.

हे सारं पाळतशाहीकडे नेणारं आहे, हे तिथं त्यापुढल्या वर्षांमध्ये शिकणाऱ्या श्रेयस कर्ले याला उमगलं असावं. म्हणूनच तर त्यानं रॉकेल वगैरे भरण्यासाठी जे टिनाचं नरसाळं वापरतात तशाच आकाराची पण तीनतीन फुटांपर्यंत उंचीची नरसाळी उलटी ठेवलेली आहेत, त्यांच्या निमुळत्या नळकांडय़ांची टोकं करकरीत कोनामध्ये वाकलेली आहेत आणि त्या नळकांडय़ाच्या अगदी टोकाला भोक नसून, डोळा लावलेला आहे अशा अनेकानेक नरसाळय़ांचं मांडणशिल्प विद्यापीठ परिसरभर कुठंकुठं केलं होतं.‘‘हे कशाला केलं?’’ असं विचारणाऱ्यांचा नूर ओळखून, ‘यंगस्टर्स है, तांकझांक तो होती रहती है ना..’ असं निरागस उत्तर श्रेयसकडे तयार होतं! नरसाळय़ाचा शंकू हा आकार, टिन हे माध्यम श्रेयसनं अन्यत्र आणि आधीही वापरलं होतंच. त्यामुळे त्याच्या या कलाकृतीत राजकीय असं काही नाही, असंही मानायला जागा होती.. ‘कलेचा अवकाश’ श्रेयसनं बरोब्बर स्वत:च्याच कलाव्यवहारातून नेमका शोधला होता.

नंतर पुन्हा तेच विद्यापीठ, तेच आवार, तसंच परीक्षा-प्रदर्शन, पण काळ निराळा- नेमकी तारीख : १७ मे २०१४! आदल्याच दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. पण तोवर, इथली गुणी, मेहनती, हुशार (गणित-भूमितीलाही न भिणारी!) तत्कालीन विद्यार्थिनी तेजा गवाणकर हिची भिंत बांधून तयार होती.. ही भिंत अर्धी उभी, अर्धी आडवी नि मध्ये लाटेसारखं वळण घेणारी.. ही तेजा गवाणकर हिची परीक्षाप्रदर्शनातली कलाकृती, बडोद्याच्या त्या आवारात शिरताच दिसणाऱ्या वडाच्या झाडाखाली असल्यानं लक्ष वेधून घेत होती. या कलाकृतीचं शीर्षक ‘चेंज टेकिंग प्लेस’ असं होतं आणि उभी भिंत पडते आहे की आडवी भिंत उभारी धरते आहे, अशी कलात्म संदिग्धता वगैरे या कलाकृतीत ठेवण्यात आली होती. तांत्रिकदृष्टय़ा हे काम उत्तमच होतं, पण इथंच नि आत्ताच – २०१४ च्या मेमध्येच आणि गुजरातच्या एका शहरातच भिंत, लाट, भिंत (जी उभी असल्यावरच तिला भिंत असं म्हणतात) आडवी होणं हे दाखवण्याचं कारण काय असेल, असा प्रश्न मनात राजकीय विचार असलेल्या समस्तांना पडत होता. तेजा आपल्या कोणत्याही कलाकृतींच्या सामाजिक, राजकीय अन्वयार्थाबद्दल कधीही बोललेली नाही. तिच्या कलाकृती गेल्या दशकभरात अनेक देशांमध्ये पोहोचल्या, तरीही नाही.

पण या तीन उदाहरणांतून काही धडे मात्र प्रस्तुत लेखकानं जरूर घेतले : आपापल्या कलासाधनांच्या शक्यता पडताळणं हे जसं लहानमोठय़ा कुणाही कलावंताचं काम असतं, तसं कलाकृतींमध्ये स्थळकाळानुरूप स्वत:चं चिंतन पेरण्याचं कामही काही विचारी कलावंत करतच असतात. हे विचारी कलावंत वयानं, कीर्तीनं एखाद्या वेळी लहानसुद्धा असू शकतात. हो, विचारापेक्षा उत्साहच अधिक असं काही (वया/ अनुभवानं) लहान कलावंतांबाबत होऊ शकतं, पण विचारीपणाची कळी उमलण्याच्या आतच- ऐन परीक्षाप्रदर्शनातच- खुडून टाकायची हे काही बरं नव्हे. राजकारण होईल ते होवो पण प्रसारमाध्यमं तरी अशा कलाकृतींना ‘अवकाश’ देतात का, हा माध्यमांची परीक्षा पाहणारा प्रश्न आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Artwork examinations for arts courses amy
Show comments