भविष्यकथन आणि फलज्योतिष्य या लोकप्रिय व राजाश्रयी मार्गापासून दूर राहण्याची किंमत पृथ्वी गोल असून ती स्वत:भोवती फिरते व त्यामुळे दिवस-रात्र होतात, हे सांगणाऱ्या पहिल्याच भूगोलतज्ज्ञांना, आर्यभटांना मोजावी लागली.

प्रतिभेची ज्योत आणि उपेक्षेचा अंधार यातील सुप्त संघर्षाच्या कहाणीचे दुसरे नाव आहे – आर्यभट. मुळात ‘ज्योतिषशास्त्र’ हा शब्दच ‘ज्योति:शास्त्र’वरून आलेला आहे. वैदिक ज्योतिष म्हणजे ‘वेदांग ज्योतिष्य’. हा प्रत्यक्ष वेदांचा भाग नसून वेदांच्या छंद, निरुक्त, व्याकरण इ. सहा अंगांपैकी एक आहे. ऋग्वेदासह चारही वेदांचे वेदांग ज्योतिष ग्रंथ आहेत. त्यांचा काळ इ. स.पूर्व १५०० मानला जातो. त्यातून पुढे ब्राह्म, पौलिश, रोमन, वसिष्ठ व सूर्य हे पाच ज्योतिष्य सिद्धांत विकसित झाले. पण नंतर त्या पाचही सिद्धांतांतील सूत्रे व गणिते यांचा ताळमेळ प्रत्यक्ष निरीक्षणाशी लागेना. अर्थातच वेदांग ज्योतिषानंतर सुमारे दीड हजार वर्षांच्या काळातील ज्योतिषावरचा ग्रंथ उपलब्ध नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर पाचव्या शतकात आर्यभट नावाची ज्योत प्रकटली. त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल माहिती उपलब्ध नाही. इ. स. ४७६ मध्ये त्यांचा जन्म व शिक्षण बिहारमधील कुसुमपूर (बहुधा सध्याचे पाटणा) या गावी झाले. आर्यभट हे ‘कुलप’ म्हणजे कुलपती होते असा उल्लेख आहे. यावरून ते नालंदा विद्यापीठात खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख असावेत. बिहारमधील तारेगना येथे आर्यभटांनी वेधशाळा उभारली होती असेही मानले जाते. त्या सुमारास गुप्त साम्राज्य उतरणीस लागले होते. पण नालंदा हे जगातील मोठे ग्रंथालय व ज्ञानकेंद्र म्हणून प्रसिद्ध होते. तिथे एक वेधशाळाही होती. बहुधा तिथेच आर्यभटांनी आपला ‘आर्यभटीय’ हा अद्वितीय ग्रंथ लिहिला. ते वर्ष होते इ. स. ४९९ आणि त्या वेळी त्यांचे वय होते २३. ज्योतिष सिद्धांत व प्रत्यक्ष निरीक्षण यातील त्रुटी या ग्रंथामुळे दूर झाल्या. हा ग्रंथ ब्राह्मसिद्धांतावर आधारित असून त्याची विभागणी दशगीतिकापाद, गणितपाद कालक्रियापाद व गोलपाद या चार भागांत केलेली आहे. सांकेतिक संख्यालेखन पद्धतीचा वापर करून लिहिलेला असल्याने तो वरकरणी क्लिष्ट व दुर्बोध वाटला तरी श्लोकबद्ध रूपात त्यात अतिशय कमी शब्दांत प्रचंड माहिती आहे. केवळ १२३ श्लोकांच्या या ग्रंथातील आशय, सूत्रे व तपशील पूर्ण उलगडून मांडायचा तर शेकडो पानांचे ग्रंथ होतील. त्यातील सूत्रे व आकडेवारी अद्यायावत तुलनेतही अचूक ठरलेली आहे. त्यापैकी काही उदाहरणे अशी. आर्यभटांनी दिलेला एक नक्षत्रदिनाचा कालावधी २३ तास ५६ मिनिटे ४.१ सेकंद आहे, तर त्याचा आधुनिक कालावधी २३ तास ५६ मिनिटे ४.०९१ सेकंद आहे. त्यांनी दिलेला शुक्राचा युतीकाल ०.६१५२० एवढा आहे, तर आधुनिक युतीकाल ०.६१५२१ एवढा आहे. ग्रहांची सूर्यापासून त्यांनी दिलेली तुलनात्मक सरासरी अंतरे पुढीलप्रमाणे आहेत. आधुनिक अंतरे कंसात दिली आहेत. बुध- ०.३७५ (०.३८७), शुक्र – ०.७२५ (०.७२३), मंगळ – १.५३८ (१.५२३), गुरू – ५.१६ (५.२), शनी – ९.४१(९.५४). याचप्रमाणे चंद्र, बुध, मंगळ, गुरू व शनी यांचा नक्षत्रभ्रमण काळ त्यांनी जवळपास अचूक दिला आहे.

हेही वाचा >>> कलाकारण : माणसाने माणसाला अमूर्तासम पाहणे…

ग्रहणे ही राहू-केतूमुळे नव्हे तर पृथ्वी व चंद्राच्या छायेमुळे लागतात हे आर्यभटांनी दीड हजार वर्षांपूर्वी नि:संदिग्धपणे सांगितले. पृथ्वीच्या छायेची लांबी त्यांनी अचूक दिली आहे. आश्चर्य म्हणजे चंद्रावर १५ दिवसांचा दिवस व १५ दिवसांची रात्र असते, हेही त्या काळात त्यांनी नोंदवले.

पृथ्वी गोल असून ती स्वत:भोवती फिरते व त्यामुळे दिवस-रात्र होतात, हे सांगणारे आर्यभट हे पहिलेच भूगोलतज्ज्ञ होते. या परिवलनासाठी त्यांनी ‘भूभ्रम’ असा शब्द वापरला. यासाठी नदीप्रवाहात नावेतून जाताना काठावरील वस्तू मागे जाताना दिसतात हे उदाहरण त्यांनी दिले. इतकेच नाही तर पृथ्वीच्याच परिवलन गतीने (२४ तासात एक फेरी) फिरणाऱ्या गोलयंत्राची माहितीही त्यांनी गोलपाद या भागात दिली आहे. दुर्दैवाने पुढे वराहमिहीर, ब्रह्मगुप्त इ. नी आर्यभटांची ही परिवलन संकल्पना फेटाळली व हा सिद्धांत दुर्लक्षित राहिला.

आर्यभटांचा ‘आर्यभट सिद्धांत’ नावाचा आणखी एक ग्रंथ होता. वराहमिहीर, ब्रह्मगुप्त, इ.नी त्याचा उल्लेख केलेला आहे. मात्र एकेकाळी भारतभर पाठ्यपुस्तक म्हणून वापरला जाणारा ‘आर्यभट सिद्धांत’ हा ग्रंथ आता उपलब्ध नाही.

त्याच सुमारास वराहमिहीर हे गुप्त राजांच्या दरबारात ज्योतिषी होते. इ. स. ५०५ मध्ये त्यांनी पंचसिद्धांतिका हा खगोलशास्त्रीय ग्रंथ लिहिला. याशिवाय त्यांचे ‘बृहत्संहिता’ व इतर अनेक ग्रंथ आहेत. तारे, ग्रह, ग्रहणे, धूमकेतू इथपासून ते ढग आणि भूकंपापर्यंत अनेक विषयांवर त्यांनी लिहिले आहे. वराहमिहिरांनी भविष्य व फलज्योतिष्य यावरच भर दिला नसता तर ते पहिले मोठे भूगोल संशोधक ठरले असते. त्यानंतर भास्करचार्य पहिले यांनी ५२९ मध्ये आर्यभटियावर भाष्य आणि महाभास्करीय व लघुभास्करीय हे दोन ग्रंथ लिहिले.

पुढे बह्मगुप्त यांनी इ. स. ५९० मध्ये ब्राह्मसिद्धांत व ६३० मध्ये खंडखाद्याक हे ग्रंथ लिहिले. दहाव्या शतकात या ग्रंथांची ‘सिंद हिंद’ व ‘अल अर्कंद’ ही अरबी भाषांतरे झाली. त्या ग्रंथामार्फतच दशमान पद्धत व शून्याचा शोध अरबस्तानात गेला.

पण या सर्वांहून आर्यभट वेगळे व महान ठरले. भविष्य व फलज्योतिष्याचा मोह टाळून आपल्या पूर्ण ग्रंथाचे विशुद्ध शास्त्रीय स्वरूप त्यांनी कायम राखले. त्यामुळे अचूकता, सूक्ष्मता आणि नावीन्यपूर्ण पद्धती असणारा त्यांचा ग्रंथ जगप्रसिद्ध झाला. नवव्या शतकात बगदादमध्ये ‘आर्यभटीय’चे अरबीत भाषांतर करण्यात आले. विद्वान इतिहासकार अलबेरुनी यांच्या १०३० मधील ‘अलबेरुनीचा भारत’ मध्ये आर्यभटांचा वारंवार उल्लेख आहे. अल फाझरी व याकूब यांनी ‘आर्यभटीय’चे भाषांतर पूर्वीच अरबीत केल्याची माहिती अलबेरुनींनी दिली आहे. डॉ. केर्न या नेदरलँडच्या विद्वानाने १८७४ मध्ये ‘आर्यभटीय’चे इंग्रजीत भाषांतर केले. आधुनिक काळात अनेक पाश्चात्त्य विद्वानांनी आर्यभटांना गौरविले आहे.

पण भारतात मात्र आर्यभट हे आपल्या भूगोल व विज्ञानाच्या उपेक्षेचे प्रतीक ठरले. कदाचित भविष्यकथन आणि फलज्योतिष्य या लोकप्रिय व राजाश्रयी मार्गापासून दूर राहण्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. दीड हजार वर्षे राज्यकर्ते व इतर विद्वानांनी आर्यभटांची नोंदच घेतली नाही. त्यांचा मृत्यू इ. स. ५५० मध्ये झाला असे मानले जाते. पण तो नक्की केव्हा, कुठे झाला हेही अज्ञात आहे. इ.स. ५२५ ते १५०२ या काळात ‘आर्यभटीय’वर प्रभाकर, भास्कराचार्य, इ.नी काही भाष्ये लिहिली. पण पुढील ५०० वर्षे, ग्रहणात पृथ्वीच्या सावलीची लांबी सांगणारे आर्यभट आणि त्यांची भूगोल व खगोलविद्या हे सारे विस्मृतीच्या काळोखात हरवून गेले. त्या काळातील पुराणे, असंख्य काव्ये, कथा, मिथके आणि सत्य व काल्पनिक चरित्रे यांनी भारतीय साहित्य भरलेले आहे. पण त्यात किंवा ऋषीमुनींच्या यादीत वास्तवात होऊन गेलेल्या आर्यभटांचे नाव आढळत नाही. हजार वर्षापूर्वी अरबीत व नंतर इंग्रजीतही भाषांतर झालेले ‘आर्यभटीय’ परवापर्यंत आपल्याच देशातल्या मराठी भाषेत उपलब्ध नव्हते.

पण हजारो वर्षांच्या उपेक्षेचा काळोखही प्रतिभेच्या तेजाला गिळंकृत करू शकत नाही. ४९ वर्षांपूर्वी अचानक आर्यभट उपेक्षेच्या अंधारातून बाहेर आले. १९७५ मध्ये भारताने आपला पहिला उपग्रह प्रक्षेपित केला, त्याला आर्यभटांचे नाव देण्यात आले. विश्वकोश व इतर ग्रंथांत त्यांची माहिती प्रकाशित होऊ लागली. जगप्रसिद्ध प्रतिष्ठित ‘नेचर’च्या २००१ मधील एका अंकात आर्यभटांच्या एका कोष्टकावर लेख प्रकाशित झाला. २००९ मध्ये ‘आर्यभटीय’वर मराठीत स्वतंत्र पुस्तक प्रकाशित झाले. आता त्यांच्या ग्रंथाच्या अभ्यासाची प्रत्येक विद्यापीठात व्यवस्था करणे हेच त्यांच्या उपेक्षेचे प्रायश्चित्त ठरेल. तीच आर्यभटांना आदरांजली आणि भावी पिढीला प्रेरणा ठरेल.

लेखक भूगोलाचे अभ्यासक आणि निवृत्त शिक्षक आहेत.

lkkulkarni@gmail.com

Story img Loader