संध्याकाळची वेळ. पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. सर्द काळोख्या वातावरणात हळूहळू एक उदासी यायला लागते. ही उदासी आसमंतात भरू लागते. आजूबाजूचे आवाज क्षीण होऊ लागतात. संध्याकाळी दूरच्या जंगलातून अशा वेळी मोरांचे आवाज यायला लागतात आणि अशा पावसाची झड लागलेल्या रात्री आणखीच उदास वाटायला लागतं. त्याच रात्री कधीतरी पावसाचा जोर वाढू लागतो. डोळे उघडतात तेव्हा असं दिसतं की पाऊस तुफान बरसतोय पण तेवढ्या रात्री कुठून तरी गीतांचा आवाज येतोय.
देखो श्याम नहीं आये, घेरी आई बदरी
इक तो कारी रात अंधेरी बरखा बरसे बेरी बेरी
… गावात गल्ली आणि मोहल्ला एकमेकाला लागून. मोहल्यातलं एक झोपेतलं घर जागं होतं. शरीफन बुवा म्हणते,
‘गं बाई… हा जन्माष्टमीचा पाऊस आहे. कन्हैयाचे बाळवते धुऊन निघत आहेत.’
‘अरे आता कन्हैयाचे बाळवते धुऊनही निघालेत… सगळं पाणी पाणी झालंय.’
अम्मा कूस बदलून पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करते तोच चौकात ढोल वाजू लागतो.
पानी भरन गई रामा जमुना किनरवा
रहिया मे मिल गये नंदलाल
सकाळी उठल्यानंतर आकाश मोकळं झालेलं असतं. पावसाचा कुठेच लवलेश नसतो. जणू सगळा पाऊस जन्माष्टमीच्या रात्रीच पडणार होता.
हे वर्णन एका पाकिस्तानी लेखकाच्या कादंबरीतलं आहे. ‘बस्ती’ हे कादंबरीचे नाव आणि लेखक इंतजार हुसैन ! उत्तर प्रदेशातल्या डिबाई इथं त्यांचा जन्म झाला. बालपणही याच गावी गेलं. महाविद्यालयाचं शिक्षण मेरठला घेतल्यानंतर काही काळ तिथं नोकरीही केली. फाळणीसारख्या घटनेने त्यांचं अवघं आयुष्य पालटून गेलं. ते पाकिस्तानात गेले पण इथल्या सगळ्या अनुभवांचा दाब त्यांच्या मनावर कायमच कोरलेला होता. जणू इथला सगळा भूतकाळच ते आपल्यासोबत घेऊन गेले होते.
विस्थापनाचेच अनुभव असणाऱ्या ‘आधा गाँव’ कादंबरीत ‘अशी कोणतीच तलवार नाही की जी इथली मुळं कापून टाकू शकेल.’ असं राही मासूम रझा यांनी म्हटलं होतं. इथंच ‘गोदाकाठ ते गंगौली’ या लेखात ते अधोरेखित केलं होतं. ‘बस्ती’चा विषय जरा वेगळा आहे. मुळं तुटलेली आहेत पण नव्या जमिनीत रुजतानाही आधीचं पोषणमूल्य धारण केलेलं या मातीतलं सत्त्व असं ‘बस्ती’ या कादंबरीच्या पानोपानी बहरलेलं दिसून येतं. कोणताही लेखक अनुभवांचं एक अदृश्य असं गाठोडं डोक्यावर घेऊनच वावरतो. त्यातही बालपणीच्या स्मृती अशा सहजासहजी पुसल्या जात नाहीत. त्या आयुष्यभर पाठलाग करीत असतात. लिहिताना त्या शब्दांमध्ये बेमालूमपणे मिसळतात. कधी जाणतेपणी तर कधी अजाणतेपणी… इंतजार हुसैन यांचा तर पिंडच इथल्या लोकमानसावर पोसलेला होता.
साहित्य, कला, संगीत या गोष्टी सगळ्या प्रकारच्या सीमारेषा पार करून आपल्या संवेदनेला आवाहन करतात. सारे भेद इथं गळून पडतात. नुसरत फतेह अली खानच्या आवाजात ‘सांसो की माला पे सिमरू मैं पी का नाम’ यासारखे मिराबाईचे भक्तीगीत ऐकतानाची अवस्था, फैज अहमद फैजची शायरी वाचताना, ऐकताना होणारा आनंद ! और भी दुख हैं ज़माने में मोहब्बत के सिवा, राहतें और भी हैं वस्ल की राहत के सिवा… अशा असंख्य बाबी देशाच्या, प्रदेशाच्या सीमा पार करून आपल्या अंत:करणाला भिडतात. यात असं काहीतरी खास असतं जे आपल्यापर्यंत सगळ्या प्रकारचे बांध फोडून येतं.
तसंही फाळणीनंतरच्या विस्थापनाचे चित्रण हिंदीपेक्षाही उर्दूत अधिक आहे. त्यातलं बहुतांश हिंदीत अनुवादितही झालं आहे. या विषयावर सिनेमेही अनेक आहेत.‘मम्मो’ हा श्याम बेनेगल यांचा सिनेमा आहे. यात एका अशा स्त्रीची कथा आहे की ती जन्माने भारतीय आहे पण फाळणीनंतर तिला आपल्या पतीसोबत पाकिस्तानात जावं लागतं. इथल्या आपल्या दोन बहिणींना सोडून ती तिकडे जाते. नवऱ्याच्या मृत्यूनंतर सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून मम्मो इकडे भारतात आपल्या बहिणीकडे तीन महिन्यांसाठी येते. परत पाकिस्तानात जायची तिची इच्छा होत नाही. आजारपणाचा बहाणा करून ती आपल्या ‘व्हिसा’ची मुदत वाढवण्यासाठी प्रसंगी अधिकाऱ्यांना लाचही द्यायला तयार होते. पण हे प्रत्यक्षात घडत नाही आणि तिला जबरदस्तीने पाकिस्तानला पाठवलं जातं. या सिनेमातलं जगजीत सिंग यांच्या आवाजातलं गाणं या भळभळत्या जखमेला आणखी गहिरं करतं.
ये फासले तेरी गलियों के हम से तय न हुए
हजार बार रुके हम हजार बार चले
ये कैसी सरहदें उलझी हुई है पैरों मे
हम अपने घर की तरफ उठके बार-बार चले
…तर गोष्ट इंतजार हुसैन यांची. त्यांच्या लेखनात सांस्कृतिक मिथकं, लोककथा, जातक कथा अशा सगळ्या भारतीय कथन परंपरा आढळतात. या लेखकाचं कथाविश्वच भारतीय कथन परंपरांच्या शैलीवर आधारलेलं आहे. वेताळ पंचविशी, कथासरित्सागर, जातक कथा हे सगळं पचवून आपण कथात्म साहित्य लिहिल्याचे इंतजार हुसैन यांनी त्यांच्या काही मुलाखतीत स्पष्टपणे नमूद केलंय. एका कथेच्या पोटातून दुसरी कथा सुरू होणं आणि अशा कथांच्या साखळ्यांमधून अनुभवाचे विणकाम करणं हे इंतजार हुसैन यांच्या लेखनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. हिंदुस्तान से एक खत, मोरनामा, बंदर- कहानी, तोता मैना की कहानी, शहर ए अफसोस या त्यांच्या काही गाजलेल्या कथा. या कथांमध्ये जशी हर्षद सुलेमान, मौलवी साहेब, नईम अशी पात्रं आढळतात तशीच विद्यासागर, देवानंद ऋषी, गोपी या नावाची पात्रंही आढळतात. पशुपक्षी प्राण्यांच्या कथा, भारतातले अनेक सण- उत्सव त्यांच्या कथात्म साहित्यात आहेत.
कथालेखनात जर अनुभवांना कुठे अपुरेपण आलं तर आपण स्वत:च्या आयुष्यातले काही तुकडे त्यात मिसळून या अनुभवांना पूर्णत्व दिल्याचं सांगताना इंतजार हुसैन यांनी सोहनी- महिवाल या गाजलेल्या प्रेमकथेचं उदाहरण दिलंय. खरं तर ही पंजाबातली लोककथा आहे. महिवाल आपल्या प्रेयसीसाठी- सोहनीसाठी- भेटायला दुथडी भरून वाहणाऱ्या चिनाब नदीच्या पुरातून यायचा. येताना दररोज तिच्यासाठी मासोळी पाण्यातून घेऊन यायचा. मात्र एके दिवशी तो मासोळी पकडू शकत नाही. त्या दिवशी त्यानं आपल्या मांडीचा लचका तोडून तो भाजून सोहनीला दिला. हे सोहनीला कळतं तेव्हा ती स्वत: एका घागरीच्या साहाय्याने दररोज महिवालसाठी पूर पार करून भेटायला जाते… पोहणं येत नसतानाही एका घागरीच्या आधाराने ती आपल्या प्रियकराला पुराच्या पाण्यातून भेटायला जाते ही गोष्ट तिच्या नणंदेला कळते. सोहनीच्या पक्क्या घागरीच्या ठिकाणी एके रात्री गुपचूप मातीची कच्ची घागर ती आणून ठेवून देते. सोहनी या घागरीच्या आधाराने पुरात उतरते तेव्हा ही मातीची घागर विरघळून जाते. सोहनी आणि तिची दुसऱ्या किनाऱ्यावर वाट पाहत असलेला महिवाल दोघेही पाण्यात वाहून जातात. ही लोककथा खूप मोठी आहे, तिला अनेक उपकथानकंही आहेत. पण इथे ध्यानात एवढंच घ्यायचं की इंतजार हुसैन म्हणतात, मी कथाशिल्पातील न्यून भरून काढण्यासाठी माझ्या आयुष्यातल्या काही तुकड्यांचा स्वत:च्या मांडीचा लचका तोडणाऱ्या महिवालप्रमाणे वापर केलाय. भारतीय कथनपरंपरेचा प्रभाव एखाद्या लेखकावर किती प्रगाढ असू शकतो याचं हे उदाहरण.
लेखक साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आहेत.
aasaramlomte@gmail.com