योगेन्द्र यादव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशोकस्तंभावरील पुष्ट सिंह,  खादीच्या राष्ट्रध्वजाऐवजी पॉलिएस्टर वा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज, शहरांत प्रचंड मोठे ध्वजस्तंभ, अतिभव्य पुतळे आणि ‘सेंट्रल व्हिस्टा’.. या साऱ्यांतून नेमके काय साधले जाते आहे?

भारताचे आधीचे प्रजासत्ताक बदलले जात असून त्याची दुसरी आवृत्ती जन्म घेत आहे. त्यामुळे त्याची प्रतीके बदलली जाणेही साहजिक आहे. अर्थात या बदलांची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही. हे बदलदेखील कसे तर, विकृतीकरण, मोडतोड करणे, काढून टाकणे आणि प्रक्षिप्त मजकूर घुसडणे या पद्धतीने मागील दरवाजाने, करावे लागणार. तरीही या सगळय़ामागे एक स्पष्ट सिद्धांत आहे. तो म्हणजे स्वातंत्र्यलढय़ातील राष्ट्रवाद, घटनासंमत मूल्ये आणि २० व्या शतकात आकाराला आलेल्या ऐतिहासिक आठवणी पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातून निर्माण झालेली पोकळी नवा भव्य दृष्टिकोन, नवीन मूल्ये, ताज्या आठवणींनी भरून काढण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे येऊ घातलेला आपल्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन, स्वातंत्र्याची वाटचाल पुढच्या पिढय़ांनी लक्षात ठेवावी यासाठी नाही तर ती वाटचाल विसरली जावी यासाठी आहे. ‘नियतीशी केलेल्या करारा’पेक्षा हा ‘नवा भारत’ वेगळा आहे, हे दाखवण्यासाठी हे सगळे आहे.

प्रतीकांचा अर्थ बदलणे

संसदेच्या नवीन इमारतीवर बसवल्या गेलेल्या अशोकस्तंभावरील सिंहप्रतिमा या यापुढील काळातील नव्या प्रतीकांच्या साखळीमधली एक छोटीशी कडी म्हणता येईल. सारनाथ येथील अशोकस्तंभावरील मूळ सिंहांपेक्षा नव्या सिंहांचे हे प्रतीक वेगळे आहेच, पण हे वेगळेपण फक्त कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. नैतिकतेचे प्रतीक असलेले धर्मचक्र आणि शांत आणि भव्य स्वरूप यातच अशोकप्रणीत सिंहाचे सामर्थ्य सामावले आहे. ‘नैतिकतेच्या राज्या’चे प्रतीक म्हणून अशोकाचे हे सिंह ओळखले जातात. ‘चूजिंग द नॅशनल सिम्बॉल्स फॉर इंडिया’ या लेखात प्राध्यापक भिखू पारेख सांगतात की ‘‘एकमेकांना पाठ लावून पाठीमागे आणि चार दिशांना तोंड करून बसलेले सिंह हे ताकदीचे महत्त्व दर्शवतात, असे मानले जाते. त्यांच्या पायाशी असलेले चक्र हे नैतिकतेचे प्रतीक आहे. नैतिकतेच्या चक्रावर चालणारे राज्यच स्थिर व लोकांना हवेसे असते असा त्याचा अर्थ आहे.’’

पण आता संसद भवनावर उभारल्या जात असलेल्या सिंहांच्या प्रतिमा भीतीदायक, आक्रमक, अगदी क्रुद्ध दिसणाऱ्या आहेत. सिंह एरवीही अधिक पीळदार, दणकट दिसतात. त्यांची छाती मोठी असते. मूळच्या प्रतिमा १.६ मीटर होत्या तर या ६.५ मीटर आहेत. राज्यसभा सदस्य आणि सांस्कृतिक इतिहासकार जवाहर सरकार यांनी दोघांची छायाचित्रे ट्वीट करून म्हटले आहे की ‘‘डावीकडे आहेत त्या मूळ प्रतिमा. त्या डौलदार आहेत. त्यांच्या ठायी आत्मविश्वास भरलेला दिसतो आहे. तर उजवीकडे मोदी सरकारने आणलेल्या संसदेच्या नवीन इमारतीच्या वर ठेवलेल्या प्रतिमा आहेत. त्या गुरगुरत आहेत अशा वाटणाऱ्या, उगाचच आक्रमक आणि बेडौल आहेत.’’

सिंहांच्या या नवीन प्रतिमा म्हणजे राष्ट्रीय चिन्हाचा अपमान आहे की नाही या तांत्रिक वादात मला शिरायचे नाही. मला आवडलेली गोष्ट म्हणजे अर्थामध्ये झालेला बदल. अशोकस्तंभावरचे सिंह धर्मचक्रावर उभे आहेत, त्यांना धर्मातून ताकद मिळते. तर सेंट्रल व्हिस्टावरील सिंह धर्मचक्रावर पाऊल ठेवून उभे आहेत. ते स्वत:च ताकदीचे प्रतीक आहेत. आधीच्या हनुमानाच्या प्रतिमेऐवजी नवी रौद्र हनुमानाची प्रतिमा किंवा आताच्या राजवटीत बुलडोझर हे जसे नवे प्रतीक आहे, तसेच हे आहे.

ध्वजाचा संकेत बदलतो आहे

हे एवढेच बदल नाहीत. आपल्या राष्ट्रीय चिन्हांमधला एक बदल तर फारशा कुणाच्या लक्षातही आलेला नाही. अलीकडेच, सरकारने मशीनवर तयार केल्या जाणाऱ्या पॉलिस्टरच्या कापडाच्या तिरंग्याला परवानगी दिली आहे. ध्वजसंहितेतील या बदलामुळे राष्ट्रध्वजाचा महात्मा गांधींशी असलेला दुवा निखळला गेला. गांधीजींनी आधीच्या ध्वजांच्या स्वरूपात बदल केले आणि मग आजचा तिरंगा अस्तित्वात आला आहे, हे सगळय़ांना माहीत आहे. त्यांनी त्याच्या मध्यभागी चरखा ठेवला होता. घटना समितीने चरख्याच्या जागी चक्र आणले. हे चक्र अशोकाच्या धर्मचक्रापासून घेतले होते.  ‘‘भारताचा राष्ट्रीय ध्वज हाताने कातलेला आणि हाताने विणलेल्या लोकरीचा/ रेशीम/ खादीचा बनलेला असेल.’’ या मुद्दय़ातून  ध्वजसंहितेने गांधीवादाशी एक धागा जोडून ठेवलेला होता. 

इतर सर्व संहितांचे होते, तसेच ध्वजसंहितेचेही सतत उल्लंघन होत गेले. बीटी कापसापासून कापडगिरणीत तयार केल्या जाणाऱ्या कापडापासून तयार केलेले तसेच मुख्यत: चीनमध्ये बनवलेल्या प्लास्टिकचे तिरंगे देशभर सगळीकडे दिसतात. सरकार आणि इतर अधिकृत यंत्रणा अजून तरी ध्वजसंहिता पाळतात आणि खादीचा तिरंगा वापरतात. कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघाकडून या ध्वजांचे उत्पादन आणि पुरवठा केला जातो. खादीच्या ध्वजाला प्रतीकात्मक आणि भावनिक मूल्य आहेच, पण त्याचबरोबर त्यातून हजारो कुटुंबांना रोजगारही मिळतो. त्यामुळे ‘इंडिया हँडमेड कलेक्टिव्ह’ने पॉलिस्टरच्या ध्वजांना परवानगी देण्याच्या कृत्याचा निषेध केला आहे.

अवाढव्य राष्ट्रध्वजाची प्रतीकात्मकता

यातली कायदेशीर बाजू, अर्थशास्त्र आणि व्यावहारिकता हे मुद्दे आपण थोडे बाजूला ठेवू या आणि त्याऐवजी त्यातल्या प्रतीकात्मकतेवर लक्ष केंद्रित करूया. गेल्या काही वर्षांत मोदी सरकारने महत्त्वाच्या ठिकाणी अवाढव्य राष्ट्रध्वज लावण्यास प्रोत्साहन दिले आहे. दिल्लीतील आम आदमी पार्टी (आप) सरकारनेही या बाबतीत लगोलग मोदी सरकारच्या पावलावर पाऊल ठेवले. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ज्याप्रमाणे जन गण मन राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले नाही, तसेच तिरंग्यालाही राष्ट्रध्वज म्हणून अनेक वर्षे मान्यता दिली नाही. स्वातंत्र्याच्या अर्धशतकापर्यंत संघाच्या नागपूर मुख्यालयात तिरंगा लावला गेला नव्हता हे तर उघड गुपित आहे.

आता तिरंगा एवीतेवी स्वीकारलाच आहे, तर त्याचा पोत बदलून त्याच्या अर्थाशी छेडछाड करणे ही नवीन राज्यकर्त्यांची गरज आहे. खादीच्या कापडाचा जाडेभरडेपणा, खरबरीतपणा  हा तेव्हाच्या लोकांच्या जीवनाशी साधम्र्य सांगणारा होता. त्यामुळे खादीचा ध्वज लोकांना भावला, आपला वाटला. तो वसाहतवादाच्या विरोधीतील कठोर संघर्षांची आठवण करून देणारा होता. तात्त्विक पातळीवर सांगायचे तर तो श्रमाला प्रतिष्ठा देणारा होता. नवे चमकदार, गुळगुळीत आणि मोठे सिंथेटिक ध्वज नव्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहेत. ग्रामीण भागातील एखाद्या तरुणाला बंगलोरला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या त्याच्या चुलत भावाविषयी जे वाटत असते, तसे या नव्या ध्वजाविषयीच्या भावना आहेत.

दिपवण्यातून खऱ्या प्रश्नांचा विसर

‘द पिंट्र’च्या ओपिनियन एडिटर रमा लक्ष्मी यांनी मोदींच्या या सगळय़ा अट्टहासाचे ‘‘आकाराने मोठा म्हणजेच सर्वोत्तम, गॅजेटचे, भव्यदिव्याचे आग्रही’’ असे वर्णन केले आहे. आपण कसे सामर्थ्यशाली आहोत, याची मोदींनी जी काळजीपूर्वक प्रतिमा तयार केली आहे, तिचे ते प्रतीक आहे. राष्ट्रीय युद्ध स्मारकाबाबत जे केले गेले तो जर लोकांचे लक्ष स्वातंत्र्यलढय़ापासून स्वातंत्र्यानंतरच्या युद्धांकडे वळवण्याचा प्रयत्न असेल, तर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आणि आंबेडकर स्मारकाच्या माध्यमातून सध्याचे राज्यकर्ते स्वातंत्र्यपूर्व काळातून कशाची उचलेगिरी करू शकतात, ते लक्षात येते. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे उद्घाटन अजून व्हायचे आहे, परंतु वाहवा मिळवण्याच्या अपेक्षेने तो कसा भव्यदिव्य केलेला असेल याचा आपण अंदाज करू शकतो. ‘राजकारणाचे सौंदर्यीकरण’ याचा वॉल्टर बेंजामिनला बहुधा हाच अर्थ अभिप्रेत असेल! लोकांच्या मनरंजनासाठी आणि त्यांचे डोळे दिपवून टाकण्यासाठी कलेची निर्मिती केली जाते, तेव्हा त्यामागे लोकांना त्यांचे जगण्यातले खरे प्रश्न विसरायला भाग पाडले जात असते.

इतर अनेक राजकीय नेत्यांच्या तुलनेत मोदींना प्रतीकात्मकता जास्त प्रमाणात कळते. स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रे आणि व्याख्याने यांचा वापर करून लोकांना राज्यव्यवस्थेच्या साच्यात कसे बसवायचे, हे त्यांना नीट माहीत आहे. प्रचंड, अवाढव्य गोष्टी लोकांची वाहवा मिळवतात. रोजच्या जगण्यामधली क्षुद्रपणाची भावना कमी करतात.  रोजचे जगणे कितीही धोपट असले तरी तांत्रिक उपकरणे प्रगतीची खात्री देतात. सिंथेटिक कापड सुरकुत्या घालवून खऱ्या जीवनातही गुळगुळीतपणाचा आभास निर्माण करते. आक्रमकता न्यूनत्वाची खोलवर असलेली भावना घालवून सामूहिक आत्मविश्वास निर्माण करते. शांत रसातून रौद्र रसाकडे, अंतरंगातून बाह्यंगाकडे होत असलेले संक्रमण हे नवीन राजकीय समुदायाला दिलेले आमंत्रण आहे. त्यालाच ते ‘नवा भारत’  म्हणतात.