संपूर्ण आशिया खंडातील पुस्तक बाजारपेठांचा आकार भारत आणि चीन या दोन राष्ट्रांमध्येच एकवटलेला असला, तरी वाचन आणि लेखन व्यवहाराबाबत जपान या चिमुकल्या राष्ट्राच्या जवळपासदेखील कुणी पोहोचू शकत नाही. सिंगापूर, थायलंड या पर्यटनव्यापी राष्ट्रांत गेल्या दोनेक दशकात बदल होतायत. हाँगकाँगदेखील त्यांच्या मागोमाग सुधारतोय. परवा न्यूू यॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झालेला हा मजकूर तेच सांगतोय. हाँगकाँगला ‘कुंगफू’ आणि मार्शल आर्ट्सच्या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर दृश्यपरिचित केले आहे. त्यापेक्षा वेगळे या मजकुरातून सापडेल.

https://tinyurl.com/mr2zcewn

जपानी काय वाचतायत?

हल्ली आपल्या रेल्वे स्थानकांजवळील पुस्तक विक्रेत्यांकडे कोणती पुस्तके येतायत त्याची पडताळणी करा. त्यांत एक खास दालन ‘जापनीज मंगा’ पुस्तकांचे असते. १०० रुपयांपासून ते १५०-२०० रुपयांपर्यंत जपानी कॉमिक्सचे हे अनुवाद वाचणारी कित्येक लोक असल्यामुळे या मंगांची तिथली उपस्थिती वाढत आहे. या मंगानिर्मात्या देशात त्यांची मागणी किती असावी? तर गेल्या वर्षभरात पुस्तक, टॅब्ज, ई-रीडर आणि मोबाइलमध्ये यांची वाढलेली बाजारपेठ ७ अब्ज येन इतकी आहे. २०२३ सालच्या जपानी जनगणनेनुसार (१२.४५ कोटी) वाचणाऱ्यांची संख्या इतकी आहे. निरर्थकता जोपासणारी न वाचणारी लोकसंख्या आपल्या भोवती किती आहे, याचा तुलनाबोध या वृत्तातून घेता येईल.

https://tinyurl.com/mr3cp2bs

लिहिण्याने बचावलेली…

मराठीत काही लगदा कागदावर लिहिणाऱ्या लोकप्रिय लेखकांनी असे म्हटले आहे की, कादंबऱ्या लिहिल्या नसत्या तर जगताच आले नसते. हे पैशांबाबत नव्हते, तर लिहिण्याच्या वेडाबाबत होते. ‘सेव्हन इलेेव्हन’ म्हणजे आपल्या सुपर मार्केटसारख्या दुकानामध्ये अंशकालीन काम करणाऱ्या सायाका मुराता या मुलीने तिथल्या वातावरणावरच एक कादंबरी लिहिली. त्यानंतर तिच्या सगळ्याच कादंबऱ्या आंतरराष्ट्रीय पटलावर गाजत आहेत. तिची ही मुलाखत ‘सबटायटल्स’सह ऐकता-पाहता येईल. ही लेखिकादेखील कथाकौशल्यामुळे शब्दश: बचावली कशी हे समजूून घेण्यासाठी.

https://tinyurl.com/mwvw9ypa