लोकसभेतील भाजपचे संख्याबळ २४० वर आणणाऱ्या निवडणुकीनंतर अवघ्या दीड महिन्याने सात राज्यांमधील १३ विधानसभा मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकांचा कलसुद्धा भाजपविरोधात दिसतो. या १३ पैकी इंडिया आघाडी १०, भाजप दोन तर अपक्ष एका मतदारसंघात विजयी झाला. भाजपची सत्ता असलेल्या उत्तराखंडमध्ये काँग्रेसने दोन्ही जागा जिंकल्या. हिमाचल प्रदेशात तीनपैकी दोन जागा जिंकल्यामुळे, काँग्रेस सरकारला निर्माण झालेला धोका दूर झाला आहे. पश्चिम बंगालमधील चारही जागा जिंकताना ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेेसने, भाजपच्या तीन जागा यंदा स्वत:कडे खेचल्या. या पोटनिवडणुकीय पडझडीत भाजपसाठी दिलासादायक बाब अशी की, अन्यत्र हे निकाल जाहीर होत असताना महाराष्ट्रात मात्र विधान परिषदेच्या ११ पैकी ९ जागा महायुतीने जिंकून महायुतीने विरोधकांना- विशेषत: काँग्रेसला- मोठा धक्का दिला.

भाजपची सारी भिस्त ज्या राज्यांवर होती, त्याच उत्तरेकडील राज्यांमध्ये पीछेहाट सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ८० पैकी ३३ जागांवरच समाधान मानावे लागल्याने भाजपची सारी गणिते बिघडली. उत्तर प्रदेशलगतच्या उत्तराखंडमधील पोटनिवडणुकीत भाजपला पराभूत करून काँग्रेसने दोन्ही जागा पटकावल्या. पहाडी हिमाचल प्रदेशमध्येही काँग्रेसने तीनपैकी दोन जागांवर- मन्गलौर व बद्रिनाथ येथे- भाजपचा पराभव केला. उत्तराखंडमध्ये काँग्रेसने जिंकलेल्या या दोन्ही जागांत दलित व मुस्लीम समाजाची मते लक्षणीय ठरल्याचे सांगितले जाते. तर हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसची सहा मते फुटल्याने सरकार अडचणीत आले होते. हे सहाही आमदार पक्षांतरबंदी कायद्यान्वये अपात्र ठरले आणि त्या मतदारसंघात लोकसभेबरोबरच पोटनिवडणूक झाली असता काँग्रेसने चार जागा जिंकल्या होत्या. आता तिघा अपक्ष आमदारांनी राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश करून पोटनिवणूक लढविली, तेव्हाही काँग्रेसने दोन जागा जिंकल्या आहेत. पक्षात फूट पाडून सरकारे पाडायची आणि मग स्वत: सत्ता पटकावयची हे भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ हिमाचलमध्ये यशस्वी झाले नाही. हिमाचलमधील काँग्रेसचे संख्याबळ ४० झाल्याने सरकारवरील गंडांतर तूर्त तरी टळले आहे.

हेही वाचा >>> समोरच्या बाकावरून : मग कोण देणार या प्रश्नांची उत्तरे?

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना अडचणीत आणण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. तृणमूलचे नेते आपल्या बेमुर्वतखोर वृत्तीने भाजपला आयती संधीच देतात. संदेशखालीपासून ते उत्तर दिनाजपूर, कुचबिहार किंवा अगदी अलीकडेच २४ परगणा जिल्ह्यात महिलेस जाहीर मारहाण करण्यापर्यंत तृणमूलच्या स्थानिक नेत्यांची मजल गेली आहे. तरीही भाजपपेक्षा ममता बॅनर्जी यांचे ‘मां, माटी, मानुष’चे राजकारण मतदारांना अधिक जवळचे वाटत असावे. तेथे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा २०१९ पेक्षा १० ने घटल्या. यापाठोपाठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा चारही जागांवर पराभव झाला. विशेष म्हणजे यापैकी राणाघाट दक्षिण, बागदा आणि रायगंज या तीन जागा भाजपच्या तेथील आमदारांनी, तृणमूलच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सोडल्या होत्या! ओडिशाची सत्ता मिळाली तरी शेजारील पश्चिम बंगाल भाजपच्या अजूनही आटोक्यात नाही हाच कल यातून दिसतो. पंजाबमध्ये ‘आप’, तमिळनाडूत द्रमुक, मध्य प्रदेशात भाजप या सत्ताधाऱ्यांनी आपापल्या राज्यात यश मिळविले आहे. पोटनिवडणुका या उत्तरेपासून, दक्षिण ते पूर्वेकडील अशा विविध सात राज्यांमध्ये झाल्या व त्यातील कल हा भाजपच्या विरोधात आहे, हा या निकालांचा ढोबळ अर्थ निघतो. पण अन्य राज्यांत ही पडझड होत असताना महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ पैकी ९ जागा जिंकून सत्ताधारी महायुतीने वर्चस्व कायम राखले. पुरेशी मते नसतानाही तिसरा उमेदवार उभा करण्याचा आगाऊपणा महाविकास आघाडीला चांगलाच नडला. दोनच जागा निवडून येणार होत्या तर निवडणूक बिनविरोध करता आली असती. मग आमदारांच्या पंचतारांकित सरबराईवर झालेला लाखोंचा खर्च तरी वाचला असता. याशिवाय ‘लक्ष्मीदर्शना’वर झालेला कोट्यवधींचा खर्च वेगळाच. राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी थारा दिला नाही. या साऱ्या गोंधळात सहा-सात मते फुटल्याने काँग्रेसची चांगलीच नाचक्की झाली. एकूणच महाविकास आघाडीत समन्वयचा अभाव होता. विधान परिषद निवडणुकीत महायुती वरचढ ठरली असली तरी तीन महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा कल लोकसभेप्रमाणेच कायम राहतो की महायुतीला अनुकूल ठरतो याची उत्सुकता आतापासूनच आहे. भाजपची मदार महाराष्ट्रावरच आहे, हे निव्वळ अंबानी-विवाहानिमित्त मुंबईफेरी न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथे जाहीर कार्यक्रमही केला यातून जसे दिसले, तसेच यापुढेही वारंवार दिसत राहील.