एल. के. कुलकर्णी
यस्यां समुद्र उत सिंधुरापो यस्यांमन्नं कृष्टय: संबभूवु:

यस्यांमिदं जिन्वति प्राणदेजत् सा नो भूमि: पूर्वपेये दधातु ।।

जिच्यावर नद्या, समुद्र सरोवरे इ. असून धनधान्य व पिके पिकवणारी माणसे जिथे निर्माण होतात आणि जिथे जे प्राणमय आणि गतिशील आहे, ते जीवन व्यतीत करते, ती भूमी आम्हाला पहिल्या दुग्धपानाचा आनंद देवो.

भूमिसूक्त ( अथर्ववेद)

या भूमिसूक्तात पृथ्वीची सुंदर भौगोलिक वर्णने केली आहेत. पण वरील ऋचेत वर्णन केलेली वसुंधरा जन्मत: खडक वायूचा एक ओसाड ढीग मात्र होती. तिच्या रूपांतरणाचा इतिहास जेवढा रंजक तेवढाच नाट्यमय आहे.

सुमारे ४५० ते ४६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचा जन्म झाला. नवजात पृथ्वी म्हणजे खडक, धूळ व वायू यांचा एक प्रचंड समुच्चय होता. त्यावेळची स्थिती कल्पनातीत भयंकर होती. तिच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतील खडकांचे असंख्य तुकडे उल्केच्या रूपात तिच्यावर येऊन कोसळत होते. त्याच काळात खडकातील किरणोत्सारी द्रव्ये आणि प्रचंड दाब यामुळे तिच्या अंतरंगातील उष्णता प्रचंड वाढून खडक वितळू लागले. खडकांना पडलेले तडे व भेगांतून लाव्हारस बाहेर पडून ज्वालामुखीचे उद्रेक होऊ लागले. तो लाव्हारस साचून भूपृष्ठावर ज्वालामुखी पर्वतांची निर्मिती होऊ लागली. उल्कावर्षाव, भयानक उष्णता व ज्वालामुखींचे अव्याहत उद्रेक ही अशी भयंकर स्थिती सुमारे ५० कोटी वर्षे राहिली. हा उल्कावर्षाव व ज्वालामुखी उद्रेकाचे पर्व थोडे शांत होईपर्यंत चंद्र पृथ्वीपासून वेगळा झाला होता.

हेही वाचा :अन्वयार्थ : हा अट्टहास कशासाठी?

दरम्यान वितळणाऱ्या खडकातील निकेल, लोहासारखी जड मूलद्रव्ये तळाशी जाऊन आणि अल्युमिनियम, सिलकेट्ससारखी हलकी मूलद्रव्ये वर येऊन भूकवच तयार झाले. भेगा व तडे यामुळे भूकवचाचे तुकडे पडले. याच तुकड्यांचे अपवहन होऊन कालांतराने खंडांना आजचे स्वरूप प्राप्त झाले. त्या प्रक्रियेत भूखंडांचे तुकडे – प्लेट्स – एकमेकांवर आदळून घडीचे पर्वत म्हणजे वलीपर्वत, तर जिथे भूकवच खचले तिथे खचदऱ्या व गटपर्वत निर्माण होऊ लागले.

बाल्यावस्थेत पृथ्वीभोवती वातावरण असे नव्हते. खडकांच्या ढिगाऱ्यासोबत धूळ व वायूंचे दाट आवरण होते. त्यात हायड्रोजन, हेलियम, मिथेन व अमोनिया असावा. अव्याहत ज्वालामुखी उद्रेकातून अनेक वायू पृष्ठभागावर आले आणि ते वातावरणाचा भाग बनले. त्या वातावरणात मुख्यत: हायड्रोजन सल्फाइड, अमोनिया आणि सध्याच्या २०० पट कार्बन डाय ऑक्साइड असावा. हायड्रोजन सल्फाइड व अमोनिया हे हळूहळू क्षाररूपात जमिनीत व समुद्रात पोहोचले. पृथ्वीच्या वातावरणात मुळात मुक्त स्वरूपातील ऑक्सिजन नव्हता. कारण जो काही ऑक्सिजन होता, त्याचा हायड्रोजनशी संयोग होऊन पाणी तयार झाले होते. पुढे वनस्पती निर्माण झाल्यावर त्यांच्या अन्ननिर्मिती (प्रकाश संश्लेषण) क्रियेत ऑक्सिजन मुक्त होऊ लागला. त्यामुळे हवेत ऑक्सिजनचे प्रमाण वाढत २० पर्यंत झाले. त्याच वेळी वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड वायू प्रकाश संश्लेषण क्रियेत शोषला जाऊन त्याचे प्रमाण ०.०३ पर्यंत खाली आले. वातावरणाचा मुख्य घटक असलेला नायट्रोजन वायू कमी क्रियाशील तर हेलियम हा एक निष्क्रिय वायू आहे. त्यामुळे हे दोन्ही वायू मुक्त वायुरूपात हवेत शिल्लक राहिले.

पृथ्वीवरचे जलावरण सुमारे ३८० कोटी वर्षांपूर्वी तयार झाले. त्यापूर्वीही पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण आजच्या एवढेच होते. पण सुरुवातीचा काही काळ अतिउष्ण तापमानामुळे हे सर्व पाणी वातावरणात वाफेच्या रूपात होते. नंतर पृथ्वी जसजशी थंड होऊ लागली, तसतशी हवेतील वाफ मुसळधार पावसाच्या रूपात जमिनीवर कोसळू लागली. हा ‘पहिला पावसाळा’ हजारो वर्षे अविरत चालू होता. त्या काळात हवेतील बहुतेक सर्व वाफ पाणी होऊन भूपृष्ठावर पोहोचली. पावसाच्या रूपातील हे पाणी भूकवचातील खोलगट भागात साचण्याची क्रिया हजारो वर्षे होत गेली आणि त्यातून महासागर व समुद्र निर्माण झाले. जमिनीत पोहोचलेले पाणी भूजलाच्या रूपातही साठत गेले. तसेच पर्वतावरून नद्या वाहू लागल्या. त्यांच्यातून वाहून येणारा गाळ साचून मैदाने तयार होऊ लागली. दुसरीकडे पर्जन्य व नद्यांच्या पाण्यात जमिनीवरील क्षार विरघळून हजारो वर्षे सागरात वाहून गेले व सागरजल क्षारयुक्त झाले. अशा प्रकारे जलावरण निर्माण झाले.

हेही वाचा : लोकमानस : मध्यमवर्गीयांना मोठ्या प्रकल्पांचा लाभ मिळत नाही

अशा प्रकारे पृथ्वीवर सुरुवातीच्या ५० कोटी वर्षांत वातावरण व त्यानंतर सुमारे ८० कोटी वर्षांपर्यंत जलावरण, म्हणजे महासागर व समुद्र तयार झाले. आता तिच्यावरील एका अभूतपूर्व नाट्यप्रवेशाची तयारी पूर्ण होत आली होती. तो प्रवेश होता सजीवांच्या आगमनाचा. भूमी, वातावरण व जलावरण हे नेपथ्य तयार होते. हजारो वर्षे अव्याहत तुफान पाऊस, विजांचे थैमान व सागरलाटांचे अखंड नर्तन चालू होते. उच्च ऊर्जा असणारे अतिनील किरण सरळ भूपृष्ठापर्यंत येत होते. त्या ऊर्जेच्या साहाय्याने समुद्र व हवेतील संयुगांची आंतरक्रिया व्हायची फक्त बाकी होती. या अनुकूल स्थितीतही पहिल्या सजीव जन्माची संभाव्यता युगानुयुगे सागरलाटांवर हिंदकळत होती. कधी संयुगे अगदी जवळ येऊन निसटून जात होती. कधी ती जवळ येत होती, तर नेमका त्या क्षणी अतिनील किरणांचा स्पर्श मिळत नव्हता. असा हा शक्याशक्यतेचा खेळ लाखो वर्षे चालला. अचानक कधीतरी एका क्षणी सर्व जुळून आले. आणि समुद्रात पहिली सजीव संयुगे निर्माण झाली. ओसाड निर्जीव धरेवर जीवचैतन्याचा आविष्कार झाला. तेव्हा पृथ्वीचा जन्म होऊन सुमारे १०० कोटी वर्षे होत आली होती. पुढे प्रकाश संश्लेषण करणारे सजीव तयार होऊन पृथ्वीचे वातावरण बदलू लागले. यानंतर त्यांच्यातून एकपेशीय सजीव व पुढे बहुपेशीय सजीव तयार झाले. त्यांच्यातून कोट्यवधी वर्षांच्या लक्षावधी प्रकारच्या सपुष्प अपुष्प इ. वनस्पती तसेच जलचर, उभयचर, डायनोसार वगैरे सरपटणारे प्राणी, पक्षी व सस्तन अशी प्राणिसृष्टी क्रमाने उत्क्रांत होत गेली. या विकास क्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर मानव उत्क्रांत झाला. ही घटना फार अलीकडची म्हणजे फक्त काही लाख वर्षांपूर्वीची. अशा प्रकारे एकेकाळची निर्जीव, रुक्ष, भयंकर व ओसाड पृथ्वी जीवसृष्टीने बहरून गेली.

अमेरिकेच्या फ्रॅंक ड्रेक यांनी १९६१ मध्ये एक प्रसिद्ध समीकरण मांडले. विश्वात जीवसृष्टी किती ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे, हे या समीकरणातून मांडले आहे. प्रत्येक घटक अनुकूल असण्याची शक्यता किमान मानली, तरी आपल्या आकाशगंगेतच जीवसृष्टी असणारे हजारो ग्रह असू शकतील, असे हे समीकरण सांगते. असंख्य विज्ञान कथा व सिनेमांतूनही परग्रहावरील सजीव कल्पिले आहेत. पण प्रत्यक्षात मात्र आजच्या क्षणापर्यंत तरी या संपूर्ण विश्वात पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे, ज्यावर सजीव आहेत आणि त्यांच्यामुळे तिला भूमाता होण्याचे भाग्य लाभले आहे.

हेही वाचा :उलटा चष्मा : सेम टू सेम

पण हे मातृत्व लाभण्यासाठी ज्वालामुखीचे थैमान, उल्कापात, विजांचा कडकडाट, खडक वितळविणारी प्रचंड उष्णता असे कितीतरी भोग तिला भोगावे लागले. तात्पर्य, माता – मग ती कोणतीही असो, पण आधी तिला कितीएक दिव्ये करावी लागतात, वेदना सहन कराव्या लागतात, तेव्हा कुठे मिळते विश्वातले सर्वोच्च पद – मातृत्व. पण तिच्या त्या भोगांची जाणीव कोण आणि किती ठेवेल याबाबतही तिला निरपेक्षच राहावे लागते – मग ती भूमाता असो, की घराघरांतली आई असो.

लेखक भूगोलकोशाचे लेखक आणि भूगोलाचे निवृत्त शिक्षक आहेत.
lkkulkarni@gmail.com