आज आपल्यासमोरील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा औरंगजेबाचा पराभव कसा करायचा हा आहे. औरंगजेब ३०० वर्षांपूर्वी होऊन गेला. त्याचा आता काय संबंध, असे म्हणणे आज आपल्यातील काही लोकांसाठी गैरलागू आहे. आता तीन-चारशे वर्षांपूर्वीचा इतिहासदेखील अगदी काल परवा घडल्यासारखा वाटू लागला आहे. हातात मोबाइल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची आयुधे घेऊन आम्ही मध्ययुगातील लढाया लढतो आहोत आणि त्या लढायांचे आकलनदेखील इतिहासावरच्या तज्ज्ञांच्या पुस्तकांतून नाही तर व्हॉट्सअॅप विद्यापीठातील संशोधनामुळे होत आहे. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी हे सर्व प्रश्न तर नेहमीचेच. त्यांची काय चर्चा करायची? आता आमच्यासमोरील महत्त्वाचा प्रश्न औरंगजेब हा आहे.
अशा मानसिकतेत आपण असताना आपण अशी एक कल्पना करू या- मध्ययुगात ज्याला हिंदुस्थान म्हणून जगभर ओळखले जात असे त्या हिंदुस्थानची आज जशी आपल्या देशाला आहे तशी भौगोलिक सीमा होती. त्या सीमेचे रक्षण करणारे आपले सैन्य होते आणि तशीच सीमा उझबेकिस्तानचीदेखील होती आणि उझबेकिस्तानातून निघालेला तेथील राष्ट्राचा प्रतिनिधी औरंगजेब हिंदुस्तानात शिरला. त्याने हिंदुस्थानच्या केंद्रीय शासनसंस्थेवर विजय मिळवून राज्य केले आणि मग हिंदुस्थानी जनतेने त्याच्याविरुद्ध लढा दिला आणि त्याला हा देश सोडण्यास भाग पाडले. पण मधल्या काळात औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्याची कबर हिंदुस्तानात राहिली पण त्याचे सर्व सैन्य, नातेवाईक उझबेकिस्तानला परत गेले. समजा इतिहास असा असता तर औरंगजेब हा आपल्याला (आपल्यातील काहींना) अस्वस्थ करणारा मुद्दा ठरला असता का? त्याची कबर हा आपल्या राजकारणातील महत्त्वाचा मुद्दा झाला असता का? त्याचे उत्तर नाही असे आहे.
हा प्रश्न अर्थातच जर तरचा आहे. पण अप्रस्तुत नाही. कारण अगदी तसेच ब्रिटिशांच्या बाबतीत घडले. आज आपण ३०० वर्षांपूर्वीच्या औरंगजेबाची चर्चा करत आहोत, पण औरंगजेबानंतर केवळ ८० वर्षांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वरूपात भारतात आले. ईस्ट इंडिया कंपनी ही ब्रिटन या देशाची प्रतिनिधी होती. या कंपनीने खऱ्या अर्थाने संपूर्ण देशावर प्रभुत्व स्थापन केले. हिंदुस्तानचे प्रचंड शोषण केले.
अर्थतज्ज्ञ उत्सा पटनायक यांच्या अभ्यासानुसार १७६५ ते १९३८ या कालखंडात ब्रिटिशांनी केलेली लूट ४५ ट्रिलियन डॉलर्स इतकी होती. म्हणजे आजच्या ब्रिटनच्या आणि भारताच्या जीडीपीच्या दहापटींहून अधिक. ही लूट त्यांनी भारतीयांकडून कर रूपाने वसूल केलेल्या पैशांतून भारतीय लोकांकडूनच स्वस्तात विकत घेतलेल्या वस्तू परदेशी पाठवून केली. तशीच त्याच वस्तू पुन्हा भारतीयांना विकूनदेखील केली. या लुटीचा मोठा आणि दीर्घकालीन फटका भारताला बसला.
आज आपण औरंगजेबाच्या हिंसेबद्दल चर्चा करतो. पण ब्रिटिशांची हिंसा काही कमी नव्हती. जालियनवाला बाग हे केवळ एक उदाहरण. १८५७च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर भारतीयांवर जरब बसावी म्हणून जी क्रूरता ब्रिटिशांनी दाखवली ती वाचताना अंगावर शहारे येतील. अशी अनेक उदाहरणे. कित्येक निष्पाप लोकांचे बळी गेले. भारताची एवढी मोठी संपत्ती ब्रिटनने भारताबाहेर नेली आणि प्रचंड हिंसा केली. एवढे सारे होऊनदेखील आपल्याला ब्रिटिश अधिकाऱ्यांची थडगी उखडावीत असे वाटत नाही. आपण ब्रिटिशांचा द्वेष करत नाही.
याचे कारण आपल्या स्वातंत्र्यलढ्यात आहे. स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व ज्यांच्याकडे होते त्यांनी अन्याय्य ब्रिटिश सत्तेविरुद्धचा लढा ब्रिटिशद्वेषापासून मुक्त ठेवला. त्यांची दृष्टी भविष्याचा वेध घेणारी होती. भारतीय मानसिकता इतिहासात अडकवून ठेवणे हे त्यांचे ध्येय नव्हते. आपल्या देशाचे प्रचंड शोषण, जुलूम केलेल्या ब्रिटिशांचा द्वेष जनतेत बिंबवणे स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या आपल्या नेत्यांना अशक्य नव्हते. या नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग केला होता. त्या त्यागाच्या प्रभावळीचा उपयोग करून, लोकांचे मन ब्रिटिशद्वेषात आणि इतिहासात अडकवून ठेवून आपली हुकूमशाही स्थापन करणे त्यांना अशक्य नव्हते. पण त्यांनी तसे न करता आपल्यावर अन्याय केलेल्या लोकांकडूनच चांगल्या गोष्टी घेतल्या आणि भारतात लोकशाही व्यवस्था, उदारमतवाद रुजवण्याचा प्रयत्न केला. भारतीयांची मने सदैव अन्यायग्रस्त, अस्वस्थ ठेवली नाहीत.
आता आपल्यासमोरचा प्रश्न औरंगजेबापासून मुक्ती कशी मिळवायचा हा आहे. ब्रिटिशांप्रमाणे जर औरंगजेब उझबेकिस्तान या राष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून भारतात आला असता आणि भारतावर त्याचे म्हणजेच उझबेकिस्तानचे राज्य असते आणि मग हिंदुस्तानच्या लोकांनी त्याचाशी संघर्ष करून त्याचा पराभव केला असता तर आज आपण ‘औरंगजेबग्रस्त’ राहिलो नसतो.
पण मुळात औरंगजेब किंवा मुघल हे उझबेकिस्तानच्या केंद्रीय सत्तेचे प्रतिनिधी नव्हते. त्या काही टोळ्या होत्या. मुघल साम्राज्य हे ब्रिटिश साम्राज्याप्रमाणे हिंदुस्तानबाहेरील राजकीय सत्तेकडून नियंत्रित होणारे साम्राज्य नव्हते. ब्रिटिश सैनिक जसे ब्रिटनच्या केंद्रीय सत्तेशी एकनिष्ठ होते तसे इथे काही नव्हते. हिंदुस्तानची निश्चित राजकीय सीमा आणि त्याचे रक्षण करणारे सैन्य अशी परिस्थिती नव्हती. हिंदुस्तानातील सैनिक विविध राजांसाठी लढत होते. ते आपल्या निष्ठा बदलतदेखील होते. या पार्श्वभूमीवर औरंगजेब किंवा इतर मुघल राजे यांचे हिंदुस्तानवर राज्य होते म्हणजे नेमके काय होते? ब्रिटिश राज्य हे आपल्यावर जीवनाच्या विविध क्षेत्रांवर प्रभाव टाकणारे होते, जसे सर्व आधुनिक शासनसंस्थांचे असते तसे. फक्त करवसुलीच नाही तर व्यापार, अर्थकारण, पोलीस, शिक्षण, न्यायदान, सार्वजनिक बांधकाम अशा सर्व व्यवस्थांद्वारे ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते. तसे मध्ययुगीन राजांचे नव्हते. लोकांच्या जीवनाच्या अगदी काही क्षेत्रांवरच या राज्यांचा प्रभाव होता. त्यामुळे औरंगजेब, मुघल किंवा इतर मध्ययुगीन राजांचे राज्य आणि ब्रिटिशांचे राज्य यातील मोठा फरक लक्षात घेतला तर आपल्यातील मध्ययुगीन इतिहासाबद्दलची सल कमी होईल. आपल्याला वाटतो तसे आपण कोणाचे गुलाम नव्हतो.
‘मध्ययुगीन इतिहास लक्षात ठेवला पाहिजे, नाही तर आपण परत कोणाचे तरी गुलाम होऊ,’ अशी महान वचने अलीकडे सारखी ऐकवली जातात. ही वचने पोकळ अशासाठी आहेत की मध्ययुगीन इतिहासातील ‘आपण’ आणि आधुनिक काळातील ‘आपण’ मूलत: वेगळे आहोत. जेव्हा राष्ट्र ही कल्पना नव्हती, राष्ट्राच्या सीमा नव्हत्या, त्याचे रक्षण करणारी सैन्य नावाची गोष्ट नव्हती तेव्हा आपण एक नव्हतो म्हणून परकीय आक्रमणे झाली असे म्हणणे हास्यास्पद आहे. कारण त्यावेळेस ‘आपण’ आजचे ‘आपण’ नव्हतो. आज आपल्या संरक्षणाबद्दल जर काही धडा घ्यायचा असेल तर तो १९६२ च्या चिनी आक्रमणापासून आणि १९९९च्या कारगिलमधील पाकिस्तानच्या आक्रमणापासून घेता येईल. मध्ययुगीन काळातील टोळ्यांच्या आक्रमणापासून नव्हे.
खरे तर औरंगजेबापासून मानसिकदृष्ट्या मुक्त होणे सहज शक्य आहे. पण ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यातून उदयास आलेल्या राष्ट्रवादाची आज पीछेहाट झाली आहे. मध्ययुगीन इतिहासावर आधारित राष्ट्रवादाची आज चलती आहे. हा राष्ट्रवाद आपल्याला नेहमी अस्वस्थ ठेवणारा राष्ट्रवाद आहे आणि तो खूप काळ आपल्यावर प्रभाव गाजवणार आहे, अशी आजची परिस्थिती आहे. थोडक्यात औरंगजेबाचे आपल्या मानसिकतेवरील राज्य खूप काळ राहणार आहे.
milind.murugkar@gmail.com
© The Indian Express (P) Ltd