सई केसकर
आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर, कधीतरी हातातलं सगळं सोडून कुठेतरी पळून जावंसं वाटतं. आपल्या आयुष्याला काही अर्थ नाही; आजवर आपण निवडलेले सगळेच रस्ते चुकीचे होते; आपल्याला जे व्हायचं होतं ते होताच आलं नाही – अशा विचारांच्या भोवऱ्यांत सापडलेला माणूस पळून जायचा कोणताही मार्ग निवडू शकतो, अगदी मरणही पत्करू शकतो. अशा परिस्थितीत अडकलेली एक स्त्री मात्र तिच्या आजूबाजूच्या सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारा मार्ग निवडते. ऑस्ट्रेलियन लेखिका शार्लट वूडच्या ‘स्टोन यार्ड डिव्होशनल’ या कादंबरीची नायिका, (जिच्या नावाचा उल्लेख कादंबरीत केलेला नाही) अचानक आलेल्या हताशेमुळे एका कॅथलिक कॉन्व्हेंटचा (कॅथलिक आश्रमाचा) रस्ता धरते. एखाद्या श्रद्धाळू व्यक्तीनं अशी निवड केली तर नवल नाही; पण नायिका बुद्धिवादी आहे, पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणारी आहे आणि नास्तिकही आहे. अशा व्यक्तीनं आयुष्याच्या कोणत्याही पेचप्रसंगात एखाद्या धार्मिक संस्थेचा आधार घ्यावा हे सुरुवातीला अनाकलनीय वाटतं. लेखिका मात्र तिच्या कथेच्या मुळाशी असलेल्या या विसंगतीचा एक एक धागा शांतपणे सोडवू लागते आणि वाचक प्रत्येक पानागणिक अंतर्मुख होऊ लागतात.

आईच्या मृत्यूनंतर, सिडनी सोडून काही दिवस ती तिच्या जन्मगावाजवळच्या या आश्रमात राहायला जाते. आपल्याला थोडी शांतता हवी आहे या एकाच उद्देशानं ती त्या जागी येते. तिथल्या बायकांच्या, लौकिक अर्थानं क्षुल्लक, दुर्लक्षित आयुष्यालाही एक लय असणं, त्यांच्या रोजच्या आयुष्यात संगीत असणं याचं तिला अप्रूप वाटतं. तिथून काही दिवसांनी ती परत शहरात येते आणि मग आश्रमाकडे परतते ती कायमचीच. हा निर्णय घेण्यामागचं नेमकं कारण काय ते कायमच अस्पष्ट राहतं. वाचकाला केवळ अंदाज बांधता येतो. सुरुवातीच्या, परतीपूर्वीच्या तिच्या आश्रमामधल्या वास्तव्यात तिथल्या प्लास्टिकच्या वेष्टनात मिळणाऱ्या खाद्यापदार्थांची तिला सतत चीड येते. अशा निर्जन, निर्मनुष्य आणि दुर्लक्षित जागीदेखील भुकेला भांडवलशाहीच असते, याचा तिला मनस्वी संताप येतो. अधूनमधून, व्यावसायिक भरारी घेण्यासाठी दूरदेशी गेलेल्या तिच्या नवऱ्याचीही तिला आठवण येत असते आणि त्याच्याकडे जायचं नाही हा तिचा निग्रह घट्ट होत असतो. कथा उलगडू लागल्यावर मात्र तिचं त्या जागी येऊन वसण्याचं कारण शोधण्याची ओढ कमी होते आणि तिच्या तिथल्या प्रवासाबद्दल कुतूहल वाटू लागतं.

loksatta editorial on ratan tata
अग्रलेख: जीवन त्यांना कळले हो…
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
nobel prize han kang
बुकबातमी: कोरियन साहित्याचा विस्तारवाद…
Haryana and jammu Kashmir assembly election
अग्रलेख: अ-पक्षांचा जयो झाला…
AI godfather Geoffrey Hinton
अग्रलेख : प्रज्ञेचे (अ)प्रस्तुत प्राक्तन!
israeli attacks targeting hamas and hezbollah fighters
अग्रलेख : अधर्मयुद्धाचा अंत?
make in india
अग्रलेख: मंदावले ‘मेक इन…’!
supreme court strikes down rules enabling caste discrimination in prisons
अग्रलेख : जातीचा तुरुंग आणि तुरुंगातील जात!

हेही वाचा : संविधानभान : वित्त आयोगाची भूमिका

तिथे गेल्यानं तिच्या नास्तिक असण्यात काही फरक पडत नाही. एखाद्यानं जेवावं, झोपावं तशी ती प्रार्थना करत असते. पण तिचं आचरण दांभिकही नसतं. कोणत्याही निष्कर्षाची घाई न करता एखाद्यानं समोर असलेल्या गोष्टीचा अभ्यास करत जावं तसा तिचा वावर असतो. तिच्या आजूबाजूच्या प्रत्येक साध्वीकडे ती संशयमिश्रित कुतूहलानं बघत असते. हळूहळू त्यांतल्या काहींची तिच्याशी आणि तिची त्यांच्याशी मैत्री होते. त्या मैत्रीला देवाची अडचण वाटत नाही.

लवकरच, आपण आपलं भौतिक आयुष्य सोडून इथं आल्यानं आपल्याला मन:शांती मिळेलच असं काही नाही, हे तिच्या लक्षात येऊ लागतं. किंबहुना एका प्रकारचं भौतिक आयुष्य सोडल्यानं सगळेच भौतिक प्रश्न आपली पाठ सोडत नाहीत याचा प्रत्यय लवकरच तिला येतो. आश्रमामध्ये उंदरांच्या झुंडी उच्छाद मांडू लागतात. आधी छपरावर, व्हरांड्यात दुडुदुडु धावणारे उंदीर झपाट्यानं सबंध इमारतीत पसरू लागतात. स्वयंपाकघरातल्या विजेच्या उपकरणांच्या तारा कुरतडू लागतात, तिथे घरं करू लागतात, सगळी उपकरणं बंद पाडू लागतात. येशूच्या अनुकंपेची थोरवी गाणाऱ्या साध्वी मग उंदीर पकडण्याचे पिंजरे, त्यांना खाऊ घालायचं विष यांवर संशोधन करू लागतात. रोज सकाळी उंदरांची असंख्य प्रेतं गोळा करून त्यांच्यासाठी चुन्याच्या साग्रसंगीत सडा घातलेल्या कबरी खणू लागतात.

उंदरांचं जगणं, मरणं, झपाट्यानं प्रजनन करणं आणि उंदरांच्या संख्येचा कडेलोट होऊ लागल्यावर त्यांनी एकमेकांचंच भक्षण करणं – या सगळ्याचं भीषण वर्णन कादंबरीत वारंवार येतं. कधी उंदीर हव्यासाचं रूपक होतात, कधी अगतिकतेचं, कधी इतरांच्या डोक्यावर पाय देऊन जगत राहण्याचं. त्यांच्याशी सतत द्याव्या लागणाऱ्या लढ्यामुळे, शरीरापलीकडे जाऊ पाहणाऱ्या साध्वींना शारीर अस्तित्वाची जाणीव सतत होत राहते. सिडनी, ब्रिसबन, मेलबर्न अशी ठरावीक मोठी शहरं वगळता ऑस्ट्रेलिया रणरणत्या उन्हाचा, शुष्क जमिनीचा आणि मानवाची अजिबात भीती नसणाऱ्या वन्य जिवांचा देश आहे. त्या भूभागाचं हे रानटीपणही हळूहळू कथेत उतरत जातं. आणि मूठभर अबला स्त्रियांना गिळू पाहणाऱ्या रौद्र निसर्गाचंच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पण अथांग हताशेलादेखील कृतिशीलतेचा उ:शाप असतोच. त्या कृतिशीलतेला आशावाद म्हणवत नाही, पण हळूहळू नायिका आश्रमाच्या आजूबाजूला एक छोटीशी बाग फुलवते. सुरुवातीला प्लास्टिकच्या डब्यांमधून येणारं तयार अन्न सोडायला कुरकुर करणाऱ्या बायका बागेतून येणाऱ्या ताज्या भाज्यांना सरावतात. ही लय सापडते न सापडते तोच, एक नवीन आव्हान समोर येऊन उभं ठाकतं.

परदेशात धर्मप्रचारासाठी गेलेली आणि शोषित स्त्रियांसाठी काम करणारी त्यांच्यातली एक ‘सिस्टर जेनी’ अनेक वर्षांपासून बेपत्ता असते. एका महापुरामुळे, तिच्या मृतदेहाचे अवशेष सापडतात आणि तिचा खून झाल्याची बातमी येते. तिला मायदेशी परत आणून तिच्यावर रीतसर अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी आश्रमातल्या सगळ्या बायका प्रयत्न करू लागतात. या निमित्तानं ‘हेलन पॅरी’ ही नायिकेच्या बालपणातली एक दुखरी आठवण तिच्या आयुष्यात परत येते. आणि तिच्या पूर्वायुष्यातल्या, न कळत्या वयातल्या क्रूर वागण्याचं अपराधीपण पुन्हा जागं करते. एखाद्याला माफ करणं हा तर कॅथलिक धर्माचा पायाच आहे. पण एखाद्याला दुखवून खंतावणाऱ्या व्यक्तीच्या अपराधीपणाचे अनेक पैलू लेखिका उलगडून दाखवते.

हेही वाचा : व्यक्तिवेध: दीपा कर्माकर

एखाद्याकडून दुखावलं जाणं अधिक सुसह्य की एखाद्याला दुखवणं? कथेच्या निमित्तानं वाचकांसमोर ‘चूक-बरोबर’च्या परिघाबाहेरचे असे अनेक प्रश्न उभे करणं हेच या कादंबरीचं बलस्थान आहे. देवाला शरण जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची प्रार्थना तिच्या बौद्धिक आणि आध्यात्मिक कुवतीप्रमाणे कशी बदलते याचा साक्षात्कार होत असताना नायिकेसमोर तिच्याच आजूबाजूच्या आस्तिक बायकांची उदाहरणं असतात. कुणी येशूवर प्रेम आहे म्हणून प्रार्थना करतात; कुणासाठी प्रार्थना हा अहंकारातून सुटका करून घेण्याचा एक मार्ग असतो, तर कुणासाठी ती केवळ निर्विचार एकाग्रता असते. यातली कोणती प्रार्थना ह्यआपलीह्ण आहे हे शोधताना नायिकेला धार्मिक आचरणातून मन:शांती का मिळते या कोड्याचं उत्तर मिळत जातं. ती मिळवायचे मार्ग आणि आपल्या हताशेवर आपण अनुभवातून शोधलेली उत्तरं समांतर आहेत याचा उलगडा तिला होत जातो. तिचं तर्काच्या मार्गावर चालणारं मन मग प्रार्थना आणि मानसोपचार यांच्यातली साम्यस्थळं शोधू लागतं. तिनं दुखावलेली माणसं, तिनं बघितलेले मृत्यू, तिच्या पूर्वायुष्यातल्या अनेक व्यक्तींचे अनुभव मग तिच्यासमोर एका नव्या दृष्टिकोनातून उभे राहत जातात आणि तिच्या निमित्तानं आपल्याही.

या गोष्टीच्या मुळाशी असलेला अजून एक विरोधाभास असा की कॅथलिक धर्मात हताश होणं हेच पाप मानलं जातं. पण पाप आहे म्हणून एखादी पोखरून टाकणारी भावना झिडकारून टाकता येत नाही. ज्या जगापासून नायिका पळून जाते, त्या जगात ती हताशा उत्पन्न करणाऱ्या अनेक गोष्टींशी लढत असते. त्यात तिच्या व्यक्तिगत आयुष्यातले अनुभव असतीलच पण गोष्टीतल्या बारीकसारीक तपशिलांमधून वाचकाला तिच्या मन:स्थितीचा अंदाज येतो. निसर्गाचा ऱ्हास, युद्ध, हिंसा, समाजमाध्यमांचे पिंजरे अशा अनेक गोष्टींपासून तिला पळून जावंसं वाटत असावं. ही गोष्ट आजच्या काळात जगणाऱ्या कोणत्याही विचारी व्यक्तीची असू शकते. एक स्वतंत्र प्रौढ व्यक्ती म्हणून जगणंदेखील हताशेचं कारण असू शकतं. कशावरच विश्वास ठेवता न येणं हेदेखील. अशा वेळी आपल्या मनाचा तळ कसा शोधायचा? एक व्यक्ती आणि समूह म्हणून आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे आणि अजाणतेपणे केलेल्या प्रत्येक कृतीचे काहीतरी परिणाम असणारच. ते परिणाम बघत, अनुभवत जगण्यासाठी असंवेदनशील होत जाणं हा एक मार्ग, किंवा आपल्याला हवं तेच दिसेल, अनुभवता येईल अशी बेटं तयार करत जाणं हा दुसरा मार्ग. प्रत्येकाचे मार्ग वेगळे. ज्यांना देवावर विश्वास ठेवता येतो आणि कोणतेही प्रश्न न विचारता त्याला शरण जाता येतं, ते त्यातल्या त्यात नशीबवान! त्यांचा संघर्ष कदाचित कमी असावा. जगाची चिंता देवावर सोपवण्याचा मार्ग त्यांच्याकडे आहे. पण समोर येणाऱ्या प्रत्येक अनुभवाची तर्काच्या आधारे चिकित्सा करणाऱ्यांचं काय?

हेही वाचा : अन्वयार्थ: हा राजकीय क्षुद्रपणाच

आधुनिक, व्यक्तिकेंद्री आणि अमर्याद निवडस्वातंत्र्य उपभोगणाऱ्या माणसालाही कधीतरी समूहाचा आधार हवासा वाटतो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचं खरं रूप उलगडत जाऊ लागतं तेव्हा हताश होण्यातली अपरिहार्यता त्याच्या समोर येऊ लागते. तिचा ‘आहे हे असं आहे’ म्हणत शांतपणे स्वीकार करणं हाच मन:शांतीचा मार्ग! जगण्यातून निर्माण होणाऱ्या या हताशेबद्दल ‘स्टोनयार्ड डिव्होशनल’ एक मुक्त चिंतन आहे. ही कादंबरी वाचताना, मनाचा वेगही थोडा कमी होतो हा प्रत्यक्ष अनुभव.

‘स्टोन यार्ड डिव्होशनल’

लेखक : शार्लट वूड

प्रकाशक : स्टॉटन

पृष्ठे : ३२०

मूल्य : १,४५० रुपये