डॉ. उज्ज्वला दळवी
‘ते तामसी मटण-मासे खातोस ना, त्यानेच ब्लड प्रेशर वाढतं तुझं! साखर वज्र्य कर आणि गूळ आणि मधच घे गोडीसाठी. आयुर्वेदात सांगितलं आहे, खजूर फार औषधी असतो. तो भरपूर खा. बघ तुझी साखर खाली येते की नाही. सहा महिन्यांत तब्येत ठणठणीत होईल,’’ बकूआत्यांनी विठ्ठलकाकांचा कान पकडला. आत्यांच्या समस्त नातेवाईकांचे, आप्तेष्टांचे, शेजाऱ्यापाजाऱ्यांचे कान कायमचेच आत्यांच्या शाब्दिक पकडीत असतात.
‘‘सर्दी झाली तर वेखंड लावलेल्या तेलाचे दहा-दहा थेंब दिवसातून तीनदा नाकात घाल’’, ‘‘आईला बरं नाही म्हणून गावाला जायची काही गरज नाही. मी इथूनच रेकी देते तिला. पूर्ण बरी होईल,’’ आत्याच्या जिभेचा पट्टा सतत चालू असतो.आत्यांचं लग्न लवकर झालं. त्यांचं डॉक्टर व्हायचं स्वप्न राहून गेलं. पण पारंपरिक आणि फॅशनेबल अशा दोन्ही प्रकारच्या वैद्यकशाखा खुल्याच होत्या. आत्यांनी अश्वमेधच सुरू केला. आता तर त्यांच्या शोकेसमध्ये ‘घरचा राजवैद्य’, ‘चुंबकचिकित्सा’ वगैरे पुस्तकं दिमाखात उभी असतात. भिंतींवर कसल्या कसल्या ‘जागतिक’ संस्थांच्या विविध वैद्यकीय पदव्या मिरवत असतात. होमिओपॅथी, बाराक्षार, अॅक्युप्रेशर, अॅक्युपंक्चर वगैरे सगळय़ा शास्त्रात आत्या नारदासारख्या सर्वत्र संचार करतात. त्या योगासनांचे क्लास घेतात. ‘‘पश्चिमोत्तानासाठी भर्रकन उठायचं म्हणजे पोहोचतील हात पायाला!’’ असे योगासनांच्या तत्त्वाला चीतपट करणारे मार्ग सुचवतात.
जेव्हा त्यांची नात डॉक्टर झाली तेव्हा तर कामवाली, मासेवाली, भाजीवाली सगळय़ांचे आजार तिला दाखवून घ्यायचा छंदच लागला आत्यांना. तिने त्यांना सांगितलेली नवी औषधं त्यांच्या पोतडीत जमा झाली. पुढे ती सर्जन झाल्यावर, ‘ती कापाकापी करते. औषधांशी संबंध नाही तिचा!’ म्हणून तिच्या साडेचार वर्षांच्या अभ्यासावर काट मारून तिच्याकडून जमवलेली औषधं वापरायला त्या मोकळय़ा झाल्या.
नातीने मासेवालीच्या सर्दीसाठी बॅक्ट्रिम नावाचं औषध दिलं होतं. आत्यांनी ते भाजीवालीच्या सर्दीसाठी दिलं. भाजीवालीचं तोंड फुलून आलं. डोळे लाल झाले, चिकटायला लागले. आत्यांनी दिलेल्या आरारूटच्या पाण्याने आणि तुरटीच्या थेंबांनी ते बरं झालं नाही. तिला गिळायला जमेना. ती ते सांगायला आली तेव्हा नशिबाने नात घरी होती. ‘‘अगं आजी, तिला सल्फाची रिअॅक्शन आली! भयानक असते ती,’’ म्हणत ती भाजीवालीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली.
माळय़ाला गुडघ्यापाशी टेंगूळ आलं. आत्यांनी रक्तचंदन-वेखंडाचा लेप दिला आणि उगाळून पोटात घ्यायला वाकेरीचं भातं दिलं. पंधरा दिवसांनी नात घरी आली. दारातच माळी भेटला. ती तशीच तडक त्याला हॉस्पिटलात घेऊन गेली. तिची भीती खरी ठरली. तो हाडाचा कॅन्सर निघाला. मग मासेवालीला घोटय़ाजवळ तस्संच टेंगूळ आलं. आत्या म्हणाल्या, ‘‘कॅन्सर दिसतो!’’ समस्त कोळीवाडय़ात रडारड, गोंधळ माजला. नातीने ते टेंगूळ दाबल्यावर आतला टूथपेस्टसारखा पांढरा पदार्थ बाहेर पडला. त्या छिद्रापाशी छोटीश्शी कापाकापी केली. आठवडय़ात पाय बरा झाला.मग मात्र आत्यांनी नातीला झाडलंच ! ‘‘ते तुला माहीत होतं तर मला का नाही सांगितलंस? मी मला माहीत असलेलं सगळं इतरांना सांगते.’’ डॉक्टरकीचा अभ्यास, कठीण परीक्षा वगैरे गोष्टी आत्यांच्या लेखी नगण्य होत्या.
शेजारणीच्या नवऱ्याला कावीळ झाली. ‘‘काविळीवर नव्या शास्त्रात औषधच नसतं ना!’’ म्हणत आत्यांनी पंधरवडाभर त्याला विडय़ातून त्रिफळा-अडुळसा-कडुनिंबाची पूड दिली. तो अत्यवस्थ झाल्यावर शेजारणीला मृत्युंजय जपही शिकवला आणि तो गेल्यावर दहा दिवस ‘इतरांना तशी कावीळ लागू नये’ म्हणून पंधरा माणसांचा पथ्याचा स्वयंपाकही पोहोचवला.
कोविडच्या काळात व्हॅक्सिन येईपर्यंत काय करायचं हे कुणालाच कळत नव्हतं. तेव्हा आत्यांनी, ‘‘सकाळ-संध्याकाळ जेवणापूर्वी सुदर्शन काढा घ्या. कोविड तुमच्या वाटेला जाणार नाही,’’ असं ठणकावून सांगितलं. लोकांना काहीतरी केल्याचं समाधान लाभलं. कोविड व्हायचा तेव्हा झालाच. पण ‘काढय़ामुळे तो उशिरा आणि सौम्य झाला,’हे आत्यांचं म्हणणं लोकांना पटलं.
डॉक्टरांच्या उपचारपद्धतीवर सरकारी नियमांची कडक बंधनं असतात. आत्यांसारख्या चुका डॉक्टरांनी केल्या तर त्यांना शिक्षा होते, त्यांचं रजिस्ट्रेशन बाद होतं आणि त्याच्याही आधी रोग्याचे नातेवाईक त्यांना बेदम धोपटतात. पण आत्यांना शिक्षाही झाली नाही आणि त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात आदरच राहिला. तसं का?
डॉक्टर नसलेल्यांनी डॉक्टरकी केली तर त्यांना कायद्याने शिक्षा होऊ शकते. आत्या डॉक्टरांना कमी लेखतात. पण त्या स्वत:ला कधीही डॉक्टर म्हणवून घेत नाहीत. घरावर तशी पाटीही नसते. त्यांचे बहुतेक सल्ले सर्वसाधारण आरोग्यासाठी असतात. अगदी सल्फाच्या गोळय़ा, काविळीवरचे किंवा कॅन्सरवरचे चुकलेले उपचार हेसुद्धा लोकांच्या भल्यासाठी, कसलीही फी न आकारता केलेले होते. त्यामुळे त्या कायद्याच्या कचाटय़ात सापडत नाहीत.
आत्यांची नात डॉक्टर होती म्हणून भाजीवालीचा जीव वाचला, लवकर हॉस्पिटलात नेल्यामुळेच कॅन्सरचा गोळा काढून टाकता आला, माळय़ाचा पाय वाचला, शेजाऱ्याला लवकर हॉस्पिटलात नेलं असतं तर काविळीचं योग्य निदान लवकर झालं असतं, तो जगला असता हे लोक सोयीस्करपणे विसरून जातात. त्यांच्या मते माळय़ाचा कॅन्सर, शेजाऱ्याची भयानक कावीळ हे नशिबाचे खेळ होते. आत्यांनी त्यांच्या परीने मदतच केली होती.
सध्या समाजमाध्यमांवरसुद्धा भरमसाट चुकीची माहिती देणारे अनेकजण असतात. ‘पाणी न पिता झोपलं की हार्ट अॅटॅक येतो’, ‘डोक्यावर टपल्या मारल्याने शरीरातली हॉर्मोन्स वाढतात’, ‘जीभ बाहेर ताणली की स्ट्रोक बरा होतो’, वगैरे चुकीच्या माहितीचा भडिमार होत असतो. जाणकारांनी तसा एक चुकीचा संदेश खोडून काढला तर शंभर नवे संदेश रक्तबीजासारखे डोकी वर काढतात. त्यांच्याबद्दल आभार मानणारे हजार संदेश येतात. जाणकारांच्या लेखण्या थकतात. सर्वसामान्य लोकांची बुद्धी बधिर करायचा तो राजरोस प्रयत्न आहे की काय अशी शंका येते. की लोकांची मती आधीपासूनच बधिर झाली आहे?
सर्वसामान्य लोकांना प्रकृतीविषयीचे प्रश्न पडतात. त्यांना उत्तरं हवी असतात. सगळय़ा प्रश्नांना उत्तरं द्यायला डॉक्टरांना वेळ नसतो. जे समजून घ्यायचं असतं त्या संदर्भात कुणी अधिकारवाणीने काही ठासून सांगितलं की लोकांना ते खरं वाटतं. बकूआत्या काय किंवा समाजमाध्यमांवरचे भामटे काय, कुठल्या तरी मोठय़ा माणसाचं, संस्थेचं, ग्रंथाचं नाव आपल्या बोलण्यात-संदेशात गोवतात. अधिकृतपणाचा आभास निर्माण होतो. अज्ञानामुळे लोकांचा विश्वास बसतो. त्या अज्ञानात आनंदापेक्षा धोकाच अधिक असतो. त्यामुळे विश्वास ठेवणाऱ्यांच्या जिवावरही बेतू शकतं.
सर्वसामान्य लोकांना विश्वसनीय ठिकाणांहून अधिकृत खरी माहिती देणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. सध्या इंग्रजीत तसे‘अप टु डेट’ सारखे विश्वसनीय स्रोत आहेत. ते जसं व्यावसायिक डॉक्टरांसाठी अद्ययावत ज्ञान देतात तशीच सर्वसामान्यांसाठीही, सोप्या भाषेत माहिती समजावून सांगतात. पण ते अतिशय महागडे आहेत. ते डॉक्टरांनाही परवडत नाहीत. त्यासाठी सरकारने आणि तालेवार वैद्यकीय शिक्षणसंस्थांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. त्यांनी वैद्यकशास्त्रातल्या जाणकारांना ते स्रोत खुले करावेत. त्यांना तिथली नेहमीच्या आजारांवरची, नव्या-जुन्या औषधांवरची, आहारातल्या पथ्यावरची अद्ययावत शास्त्रीय माहिती मिळेल. ती त्यांनी सोपी करून जनसामान्यांपर्यंत पोहोचवावी. त्यांच्यातल्या काहीजणांनी तिचं भाषांतर करून ते वर्तमानपत्रांतून किंवा दूरदर्शनसारख्या वाहिन्यांवरून प्रसृत केलं तर इंग्रजी न जाणणाऱ्या लोकांपर्यंतही, अगदी खेडय़ापाडय़ांतही ती माहिती पोहोचेल. खरं काय ते सगळय़ांना तशा विश्वासार्ह माध्यमांतून कळलं की त्यांची माहितीची तहान भागेल. त्यांना समाजमाध्यमांवरच्या किंवा बकूआत्यांच्या माहितीतला खरेखोटेपणा समजेल. त्यांची फसगत होणार नाही.
ज्योतीने ज्योत उजळत गेली की अज्ञानाचा, खोटय़ा माहितीचा अंधार दूर होईल. वैयक्तिक आणि सार्वजनिक आरोग्याविषयीच्या ज्ञानाचा प्रकाश पसरेल. आजारपणामुळे वाया जाणारा वेळ, पैसा आणि कष्ट यांची मोठी बचत होईल. माहिती खुली करण्यासाठी खर्च केलेला पैसा वस्सूल होईल.
लेखिका वैद्यकीय व्यवसायात होत्या, तसेच गेल्या १२ वर्षांत त्यांची दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.
ujjwalahd9 @gmail. com