लहान मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध नसणे, ही भारतातील सगळया शहरांमधील सर्वात मोठी समस्या. या समस्येवर चार दशकांपूर्वी उत्तर शोधून ते प्रत्यक्षात आणण्याचे कार्य श्रीमती शोभा भागवत यांनी केले. पुण्यातील बालभवन हे ३ ते १२ या वयोगटातील मुलांचे रंजनकेंद्र ही त्याची साक्ष. शाळा सुटल्यानंतर मुलांना खेळण्यासाठी या रंजनकेंद्रात अनेकविध उपक्रम राबवले जातात. एवढया मोठया प्रमाणात सातत्याने चाललेला हा उपक्रम देशभरातच नव्हे, तर जगभरातही विरळा म्हणावा असा. केवळ रंजन केंद्र चालवण्याएवढाच हा उपक्रम मर्यादित न राहता वर्षभर असे उपक्रम कसे राबवता येतील, याचे प्रशिक्षणही दिले जात असल्याने सुमारे पंचवीसशेहून अधिक प्रशिक्षणार्थीनी केवळ पुण्यातच साडेतीनशेहून अधिक बालभवन केंद्रे सुरू केली. राज्यातही अशी सुमारे पन्नास केंद्रे सुरू झाली आहेत.
हेही वाचा >>> चिंतनधारा : एक तरी असु दे अंगी कला!
शोभा भागवत यांच्या कार्याचे हे खरे फलित म्हणावे लागेल. लहान मुलांचे भावविश्व जाणून घेणारे त्यांचे लेखन ही त्यांची लेखिका म्हणून असलेली ओळख. आपली मुलं, गारांचा पाऊस, बहुरूप गांधी, देणारं झाड, मांजराची वरात, अशी त्यांची पंधराहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आणि मुलांमध्ये प्रियही झाली. यातील दोन पुस्तकांना उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारही प्राप्त झाले. मुलांसाठी खेळाची मैदाने राखली जावीत, यासाठी त्यांनी जनजागृतीचे काम केले. त्यासाठी राज्य पातळीवर चळवळही सुरू केली. पालकांना मूल समजावून घेण्यासाठी त्यांनी समुपदेशनद्वारे संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केला. असे हजाराहून अधिक कार्यक्रम आयोजित करून शोभाताई सतत कार्यरत राहिल्या. तरुण वर्गासाठी विवाहापूर्व कार्यशाळा आयोजित करून त्यांच्या मनातील भीती, शंका दूर करण्याचे त्यांचे कामही अत्यंत महत्त्वाचे ठरले.
हेही वाचा >>> लोकमानस : .. मग ‘उपराजधानी’ या दर्जाला अर्थ काय?
भारतीय संदर्भात पालकांचे प्रश्न गुंतागुंतीचे असतात, हे लक्षात घेऊन त्यांनी या विषयाची केलेली मांडणी अगदी निराळी होती. त्यासाठी जगातील अनेक देशांना भेटी देऊन तेथे या विषयावरली काम कसे चालते, हे त्यांनी समजावून घेतले. शोभाताईंच्या या कार्याची ओळख सर्वदूर पसरली, त्याबद्दल त्यांना अनेक मानसन्मानही प्राप्त झाले, परंतु त्यांनी अखेपर्यंत या कार्याचा ध्यास मात्र सोडला नाही. लहान मुलांच्या प्रश्नांकडे समाज फारशा गांभीर्याने पाहात नाही, ते सोडवण्यासाठी पुढाकारही घेत नाही आणि प्रयत्नशीलही राहात नाही. शोभाताईंच्या कामामुळे ही कोंडी काही प्रमाणात का होईना फुटली. वाढत्या नागरीकरणामुळे मुलांची खेळण्याची मैदाने आक्रसू लागली आहेत. शहरीकरणाच्या रेटयात आणि बिल्डरांच्या हव्यासापोटी मुलांच्या रंजनाचे प्रश्न निर्माण होऊ लागले. त्यांच्यामध्ये वाढत चाललेला एकलकोंडेपणा ही नवी सामाजिक समस्या बनू लागली. अशा परिस्थितीत शोभा भागवत यांचे कार्य अधिक उजळून समोर येते. त्यांच्या निधनाने बालहक्कांसाठी लढणारी एक कार्यकर्ती आपल्यातून निघून गेली आहे.