‘मी कोण?’ हे राजाराम रंगाजी पैंगीणकर यांचे १९६९ ला प्रकाशित आत्मचरित्र. त्याचे परीक्षण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘नवभारत’ मासिकाच्या एप्रिल, १९७० च्या अंकात लिहिले आहे. त्यात त्यांनी स्पष्ट केले आहे की, ‘‘खासगी जीवन हा या आत्मचरित्राचा मुख्य विषय नाही. हिंदू समाजात अवमानित असलेल्या जमातीत जन्मलेल्या या सुपुत्राने १९११ ते १९६८ पर्यंतच्या कालखंडात आपल्या जमातीस मोठ्या हिमतीने वेश्या व्यवसायातून मुक्त करून शिक्षणाद्वारे आत्मोद्धाराची प्रेरणा कशी दिली व ऊर्जित दशेस कसे आणले, याची साद्यंत कथा या आत्मचरित्रात प्रामुख्याने ग्रथित केली आहे.’’
आत्मचरित्रकाराने आपला जन्म कलावंतिणीच्या पोटी झाला, हे प्रांजळपणे प्रारंभीच सांगून टाकल्याने मुख्य सूत्रच वाचकांच्या हाती येते. जन्मलेले निरागस बालक बुद्धीचा पवित्र प्रकाश घेऊन येत असते, भले त्या बालकाचा जन्म वैवाहिक संबंधाने होवो वा विवाहबाह्य संबंधाने. या बालकाचे वडील सारस्वत ब्राह्मण. त्यांनी या पुत्राला अर्जित संपत्तीचा वाटा तर नाकारलाच, शिवाय स्वतःचे नाव लावण्यासही मनाई केली. तसेच ‘‘यांना बाप तरी कसे म्हणावे?’’ असा सवाल त्याने जन्मदात्या आईस टाकला. या मुलाने तरीही आकस न ठेवता जन्मदात्या बापाशी सौहार्द जपले.देवदासी ही सरंजामशाहीतील देहविक्रयाची पद्धत होती. तिचा प्रारंभ भक्तिभाव, तंत्रसाधना इत्यादींतून झाला. पुढे ही प्रथा पुरुषसत्ताक समाजाच्या शोषणाचे साधन बनली. गोवा, सिंधुदुर्ग, कारवार भागात देवळात सेवा देणाऱ्या कलावंत, देवळी, भाविणी, पेर्णी, बंदे, फर्जंद, चेडवा इ. जमाती अशा सेवा देणाऱ्यांच्या पोटजातीसमूहास देवदासी जमात संबोधले गेले. या काळात ‘शेंसविधी’ने देवदासी बनविले जात. वेश्या व्यवसाय हा देव, धर्मांनी दिलेला आहे, अशा अंधश्रद्धेने या व्यवसायातील गुलामीचे पोषण केले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नवजागृतीची जी पहाट उजाडली, तिने या व्यवसायाच्या मुक्ती आंदोलनास बळ दिले. विसाव्या शतकात गोमंतकांत राजाराम रंगाजी पैंगीणकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
या आंदोलनपर्वाचा इतिहास या आत्मचरित्रामध्ये आहे. ही एका बिनीच्या शूराची कहाणी आहे. पतित गोमांतक कलावंत जमात व त्या पातित्यास जबाबदार सारस्वत ब्राह्मण जमात यांच्यातल्या विग्रहाचा इतिहास या आत्मचरित्रात आहे. या आत्मचरित्रास श्री. सुकेरकर यांची प्रस्तावना आहे. त्यात त्यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘‘हा संभवतः प्रतिगामी व पुरोगामी प्रवृत्तीच्या विग्रहाचा इतिहास आहे, हे प्रत्ययास येते. अनेक पुरोगामी उदारमतवादी सारस्वतांनी श्री. पैंगीणकरांना या आंदोलनात प्रोत्साहन दिले. मदतही केली. एवढेच नव्हे, तर सारस्वतांचे धर्मगुरू श्री. रमाकांत स्वामी यांनी एका सत्यनारायण प्रकरणात पैंगीणकरांचाच पक्ष सत्याचा आहे, असा निर्णय दिला.’’या समाजसुधारणेच्या आंदोलनात पैंगीणकरांवर अनेकदा सामाजिक बहिष्कार पडले. जिवावर बेतणारे प्रसंगही ओढवले. त्या खडतर प्रसंगांना त्यांनी शौर्याने आणि युक्तिबुद्धीने तोंड देत व मोर्चे बांधत यशस्वीपणे कूच केली. या समरप्रसंगात त्यांच्यात वसत असलेल्या गुणांची कसोटी लागली आणि ते गुण प्रकाशात आले. त्यांनी सामाजिक समतेच्या उच्च ध्येयवादावर शुद्ध निष्ठा राखली. त्यांना उच्च जातीबद्दलच्या स्वाभाविक सुडांची भावना बाधली नाही.
‘मी कोण?’ या प्रश्नाचे यथार्थ उत्तर या आत्मचरित्रात मिळते. थोर समाजसुधारकांचा आत्मा व समाजाचाही आत्मा प्रतिबिंबित झालेला हा मोलाचा आरसा आहे. प्रथितयश साहित्यिकांनी अनेक आत्मचरित्रे मराठीत लिहून प्रसिद्ध केली आहेत. त्यांपैकी अनेकांत आत्मवंचनेचा ललितविस्तार पुष्कळ मिळतो. परंतु त्यात आत्माच तेवढा गमावलेला असतो. या पुस्तकाच्या शैलीत प्रौढता वा लालित्य नाही. त्याची शैली साधी आणि सरळ आहे. यातील तात्पर्य मात्र अत्यंत लक्षणीय आहे.तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी हे परीक्षण लिहून आपण पुरोगामी समीक्षक असल्याचे सिद्ध केले. नृत्य, नाट्य, वाद्यवादन आणि गायन करणाऱ्या जमातींनी देवाची सेवा करीत उच्चवर्णीयांच्या रंगेल विषयवासनांची पूर्तता करण्याची धर्मसंस्थेने केलेली ही व्यवस्था धर्मशास्त्राचा उलट न्याय असल्याचे या परीक्षणाने अधोरेखित केले आहे. जन्माने मोठेपणा येत नसतो. तो येतो केवळ स्वकर्माने संपादिलेल्या गुणकर्मांनीच.
drsklawate@gmail.com