एखादे प्रवासी विमान शत्रूदेशाचे मानले गेल्यामुळे ‘चुकून’ लक्ष्य बनल्याची आणि दुर्घटनाग्रस्त झाल्याची उदाहरणे अलीकडच्या इतिहासात दुर्मीळ आढळतात. अत्याधुनिक रडार यंत्रणा, जीपीएससारखी उपकरणे, उच्च क्षमतेची छायाचित्रण क्षमता हाती असल्यामुळे शत्रू- मित्र- त्रयस्थ ओळख पटवणे तितकेसे अवघड राहिले नाही. तरीदेखील अशी अत्याधुनिक उपकरणे २५ डिसेंबर रोजी अझरबैजान एअरलाइन्सच्या विमानातील ३८ जणांचे प्राण वाचवू शकली नाहीत. कारण ‘चुकून’ विमान पाडले गेल्याचे बहुतेक सर्व प्रकार युद्धखोरी आणि संशयभावनेतून घडतात. काही वेळा अशा कारवाया हेतुत: होतात. नंतर सारवासारव केली जाते. अशी सारवासारव प्रस्तुत विमानाच्या बाबतीत दस्तुरखुद्द रशियाधीश व्लादिमीर पुतिनच करते झाले. त्यातून संशयच अधिक वाढतो. पुतिन यांनी अझरबैजानची माफी मागितली; पण रशियाचे या प्रकरणातील दायित्व थेटपणे कबूल करण्याचे टाळले. हे विमान अझरबैजानचे, निघाले होते रशियाकडे, पण दुर्घटनाग्रस्त झाले कझाकस्तानमध्ये. विमानात ६३ प्रवासी होते, त्यांतील २५ बचावले. विमानाचे दोन्ही ‘ब्लॅक बॉक्स’ हस्तगत झाले असून त्यातून येत्या दोन आठवड्यांत नेमक्या घटनाक्रमाचा छडा लागू शकतो. किंवा, कदाचित लागणारही नाही! कारण हा संपूर्ण युरेशियन टापू एक युद्धक्षेत्र बनला आहे. तरीदेखील त्यावरील रशियाची दहशत आणि प्रभाव कमी झालेला नाही. किंबहुना तो वाढलेला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका तिसऱ्याच देशाच्या विमानास चौथ्या देशात बसला. इंग्रजीत ज्यास ‘कोलॅटरल डॅमेज’ किंवा समांतर विध्वंस म्हणतात, त्याची दुर्दैवी अनुभूती या विमान दुर्घटनेने पुन्हा एकदा आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा