महाराष्ट्रातील कीर्तनाने जनमानसात जी प्रचंड लोकप्रियता मिळवली, ती केवळ बुद्धिमान कीर्तनकारांमुळे. निळकंठ ज्ञानेश्वर गोरे म्हणजेच बाबामहाराज सातारकर, हे याच परंपरेची पताका खांद्यावर घेऊन गेली अनेक दशके मराठी जनांच्या कानामनापर्यंत पोहोचले. हरिभक्तपरायण हे मानाचे बिरुद संपन्नतेने मिरवणाऱ्या धुंडामहाराज देगलूरकर यांच्यापासून ते सोनोपंत दांडेकर, तनपुरे महाराज, वासकरमहाराज, गोविंदस्वामी आफळे, भाऊसाहेब शेवाळकर यांच्यासारख्या अनेक कीर्तनकारांनी ही परंपरा नुसती टिकवून ठेवली नाही, तर ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवली. त्यामुळेच तर आज चैतन्यमहाराज देगलूरकर, चारुदत्त आफळे यांच्यासारखे नव्या पिढीतील कीर्तनकारही ही दिंडी पताका घेऊन आजही कीर्तन लोकप्रिय करीत आहेत. भारतीय भक्तीपरंपरेत भक्तीच्या नऊ प्रकारच्या उपयोजनांना अधिक महत्त्व. कीर्तन हे या नवविधा भक्तीतील महत्त्वाचे साधन. संगीत आणि शब्द यांचा एक सहजसुंदर आंतरसंबंध निर्माण करत सामान्यजनांना लोकशिक्षण देण्यासाठी या प्रकाराचा जेवढा वापर महाराष्ट्रात झाला, तेवढा अन्यत्र क्वचितच असेल. तेराव्या शतकात महाराष्ट्रात त्याची सुरुवात संत नामदेव यांनी केली. नंतरच्या काळात त्यांच्यामुळेच ती पंजाब व अन्य प्रांतातही पोहोचली. गेली आठ शतके, कीर्तनाच्या या परंपरेने येथील लोकजीवनात अनन्यसाधारण महत्त्व निर्माण केले. ग्रामीण आणि शहरी असा भेदभावही राहू नये, इतका कीर्तन हा भक्तीचा मार्ग जनमानसात पोहोचला. कीर्तनकाराला भवतालाचे, तेथील घडामोडींचे, समाजमनाच्या सद्या:स्थितीचे आणि समाजकारणाचे भान तर असावेच लागते. परंतु त्याबरोबरच समाजात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधून ती कीर्तनाच्या माध्यमातून पोहोचवण्याची कलाही अवगत असावी लागते. संगीत हा प्रत्येकाच्या जगण्याचा एक आधार असतो. त्यामुळेच कीर्तनात संगीताचा सहभाग त्याला कलेचा दर्जा प्राप्त करून देतो. निरूपण करताना, मध्येच सुंदर लकेर घेऊन, भजनी ठेक्यात एखादा अभंग, त्याची ओवी म्हणावी आणि सहजपणे समेवर येत पुन्हा निरुपणाला सुरुवात करावी, हीच कल्पना मराठी नाट्यसंगीतासाठी अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी उपयोगात आणली आणि स्वरशब्द संवादाचे एक नवे रंगपीठच स्थापन झाले.

हेही वाचा >>> उलटा चष्मा: औटघटकेचे नाट्य

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण
anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
kaanchi re kaanchi re
कांची रे कांची गाण्यांवर सरांनी केला भन्नाट डान्स, “तुमच्या शाळेत डान्स करणारे शिक्षक होते का?” पाहा Viral Video
India China soldiers Dance Fact Check Video
चीन अन् भारतीय सैन्याने आनंदात केला भांगडा डान्स! Video व्हायरल; पण खरी घटना काय? वाचा
Rebel Vani Umarkhed, Mahayuti Vani, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडी, महायुतीतील बंडखोरांना घरचा रस्ता

बाबामहाराज सातारकर यांचे या अशा प्रदीर्घ परंपरेत येणे ही शुभघटना होती. सातारच्या गोरे सातारकर यांच्या घराण्यातील त्यांचा जन्म. या घराण्यात कीर्तन, प्रवचनांची दीर्घ परंपरा. निळकंठ ज्ञानेश्वर गोरे म्हणजेच बाबामहाराज सातारकर यांनी वकिलीची पदवी मिळवली, तरीही आयुष्याचे ईप्सित सामान्यांच्या जगण्यात बदल घडण्यास कारणीभूत ठरण्याचेच होते. कीर्तनाच्या परंपरेत दाखल होत असताना, अभिजात संगीताचे रीतसर शिक्षण घेताना, मूळच्या सुरेल आवाजावर संगीताच्या अलंकारांचे संस्कार घडवून बाबामहाराज ही परंपरा पुढे नेण्यास सज्ज झाले. सुरेल आवाज, स्वच्छ वाणी, अतिशय बोलके डोळे आणि विषयावर प्रभुत्व हे त्यांच्या कीर्तनाचे वैशिष्ट्य. मध्येच एखादी सुंदर लकेर घेत ते जेव्हा समेवर येऊन थांबत, तेव्हा गाणे संपूच नये, असे वाटे. पण स्वरांप्रमाणेच, शब्दांचा नेमका वापर करत, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा संदर्भ देत ते जेव्हा निरुपण करायला सुरुवात करत, तेव्हा समोर बसलेले हजारो श्रोते अक्षरश: मंत्रमुग्ध होऊन जात. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून मान्यता पावलेल्या सातारकर फडाचे वंशज म्हणून बाबामहाराजांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी होती. ती त्यांनी अतिशय निष्ठेने पार पाडली. आपल्या खास कीर्तन शैलीने त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आणि त्यांच्या कीर्तनाला हजारोंचा समुदाय जमू लागला. या समुदायाला आपल्या शब्दांनी आणि स्वरांनी मोहित करून टाकत ते आपले कीर्तन असे काही रंगवत, की श्रोते त्यामध्ये तल्लीन होऊन जात. सामान्यांचे प्रश्न समजावून घेतल्याशिवाय त्यांची उत्तरे शोधता येत नाहीत. बाबामहाराज त्यासाठी सतत चिंतनात मग्न असत आणि त्यासाठी ते प्रचंड वाचनही करीत.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : शरीफ, भारत नि ‘उम्मीदएशराफत’!

कॅसेट आणि सीडीच्या जमान्यात बाबामहाराजांची प्रवचने घरोघरी ऐकली जात. आपले प्रत्येक कीर्तन हा एक ‘परफॉर्मन्स’’ असतो, याची जाणीव ठेवून ते श्रोत्यांना सामोरे जात. ज्ञानेश्वरी हा त्यांचा प्राण. या ज्ञानेश्वरीला चंदनाच्या पेटीत ठेवून ती घरोघरी पोहोचवण्यासाठी त्यांनी ‘ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी’’ प्रकाशित केली. सारे आयुष्य समाजाच्या उन्नतीसाठी वेचण्यासाठी त्यांनी कीर्तनाचा मार्ग निवडला आणि त्यामध्ये स्वत:ची शैली निर्माण करून ती श्रीमंत करण्याचे त्यांचे कार्य महत्त्वाचे ठरले. त्यांच्या निधनाने, कीर्तनातील एक सुरेल स्वर थांबला आहे!