महाराष्ट्रातील कीर्तनाने जनमानसात जी प्रचंड लोकप्रियता मिळवली, ती केवळ बुद्धिमान कीर्तनकारांमुळे. निळकंठ ज्ञानेश्वर गोरे म्हणजेच बाबामहाराज सातारकर, हे याच परंपरेची पताका खांद्यावर घेऊन गेली अनेक दशके मराठी जनांच्या कानामनापर्यंत पोहोचले. हरिभक्तपरायण हे मानाचे बिरुद संपन्नतेने मिरवणाऱ्या धुंडामहाराज देगलूरकर यांच्यापासून ते सोनोपंत दांडेकर, तनपुरे महाराज, वासकरमहाराज, गोविंदस्वामी आफळे, भाऊसाहेब शेवाळकर यांच्यासारख्या अनेक कीर्तनकारांनी ही परंपरा नुसती टिकवून ठेवली नाही, तर ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवली. त्यामुळेच तर आज चैतन्यमहाराज देगलूरकर, चारुदत्त आफळे यांच्यासारखे नव्या पिढीतील कीर्तनकारही ही दिंडी पताका घेऊन आजही कीर्तन लोकप्रिय करीत आहेत. भारतीय भक्तीपरंपरेत भक्तीच्या नऊ प्रकारच्या उपयोजनांना अधिक महत्त्व. कीर्तन हे या नवविधा भक्तीतील महत्त्वाचे साधन. संगीत आणि शब्द यांचा एक सहजसुंदर आंतरसंबंध निर्माण करत सामान्यजनांना लोकशिक्षण देण्यासाठी या प्रकाराचा जेवढा वापर महाराष्ट्रात झाला, तेवढा अन्यत्र क्वचितच असेल. तेराव्या शतकात महाराष्ट्रात त्याची सुरुवात संत नामदेव यांनी केली. नंतरच्या काळात त्यांच्यामुळेच ती पंजाब व अन्य प्रांतातही पोहोचली. गेली आठ शतके, कीर्तनाच्या या परंपरेने येथील लोकजीवनात अनन्यसाधारण महत्त्व निर्माण केले. ग्रामीण आणि शहरी असा भेदभावही राहू नये, इतका कीर्तन हा भक्तीचा मार्ग जनमानसात पोहोचला. कीर्तनकाराला भवतालाचे, तेथील घडामोडींचे, समाजमनाच्या सद्या:स्थितीचे आणि समाजकारणाचे भान तर असावेच लागते. परंतु त्याबरोबरच समाजात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधून ती कीर्तनाच्या माध्यमातून पोहोचवण्याची कलाही अवगत असावी लागते. संगीत हा प्रत्येकाच्या जगण्याचा एक आधार असतो. त्यामुळेच कीर्तनात संगीताचा सहभाग त्याला कलेचा दर्जा प्राप्त करून देतो. निरूपण करताना, मध्येच सुंदर लकेर घेऊन, भजनी ठेक्यात एखादा अभंग, त्याची ओवी म्हणावी आणि सहजपणे समेवर येत पुन्हा निरुपणाला सुरुवात करावी, हीच कल्पना मराठी नाट्यसंगीतासाठी अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी उपयोगात आणली आणि स्वरशब्द संवादाचे एक नवे रंगपीठच स्थापन झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा