सार्वजनिक जीवनापलीकडे व्यक्तिगत आयुष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कसे होते, याचेही दर्शन या पुस्तकात घडते…
‘बाबासाहेब, माय लाइफ विथ डॉ. आंबेडकर’ हे सविता आंबेडकर यांचे पुस्तक, सध्या पेंग्विन रॅण्डम हाउसच्या बेस्ट सेलर यादीत आहे. डॉ. सविता आंबेडकर यांच्या मूळ मराठी आत्मकथनाचे नदीम खान यांनी केलेले ते इंग्रजी भाषांतर. या भाषांतराला टेक्सास विद्यापीठातील डॉ. आंबेडकरांच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. स्कॉट आर. स्ट्राउड यांची प्रस्तावना आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात’ हे पुस्तक जेव्हा नदीम खान यांच्या हाती प्रथम पडले तेव्हा, तीन दशकांहून अधिक काळ उलटूनही या पुस्तकाचे इंग्रजीमध्ये भाषांतर का झाले नसावे, असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी मग ते स्वत:च भाषांतरित करण्याचा निर्णय घेतला. याचे कारण खासगी आठवणी, दुर्मीळ पत्रे आणि छायाचित्रे या पुस्तकात आहेत आणि हे सगळे त्यांच्या अत्यंत निकटच्या व्यक्तीने कथन केले आहे. या पुस्तकामुळे जगभरातील डॉ. आंबेडकरांच्या अभ्यासकांना काही दुर्मीळ संदर्भ उपलब्ध झाले आहेत.
‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’ हे डॉ. सविता आंबेडकर यांचे मराठी आत्मचरित्र प्रथम १९९० मध्ये प्रसिद्ध झाले. पूर्वाश्रमीच्या डॉ. शारदा कबीर यांचा १५ एप्रिल १९४८ रोजी डॉ. आंबेडकरांशी विवाह झाला. त्यांचा बाबासाहेबांच्या जीवनात प्रवेश झाला तेव्हा बाबासाहेब स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते. म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूपर्यंत माईसाहेबांना नऊ वर्षांचा सहवास लाभला होता. १९४७ ते १९५६ हे दशक डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचे होते. स्वतंत्र भारताची राज्यघटना, हिंदू कोड बिल मंजूर होण्यासाठी केलेला संघर्ष, बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी केलेले अथक कष्ट आणि दीक्षाभूमीवरील धर्मांतर, याशिवाय त्यांच्या राजकारणाला वळण देणाऱ्या अनेक राजकीय घटना याच काळातील आहेत. सार्वजनिक जीवनापलीकडे व्यक्तिगत आयुष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कसे होते, याचे दर्शन या पुस्तकात घडते.
बाबासाहेबांशी पहिली भेट
कृष्णराव विनायकराव कबीर हे शारदा कबीर यांच्या वडिलांचे नाव. ते मुंबई सरकारच्या औषधी विभागात अधिकारी होते. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील डोर्ल हे त्यांचे गाव. कबीर कुटुंब पुढे पुण्यात स्थायिक झाले. शारदा कबीर यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले आणि मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजातून त्या १९३७ मध्ये प्रथम श्रेणीत एमबीबीएस झाल्या (मुंबईत त्यांच्या वसतिगृहाच्या समोरच मणीभवन होते, जिथे आंबेडकरांची गांधीजींशी पहिली भेट झाली. त्या भेटीचा बाबासाहेबांनी सांगितलेला वृत्तान्त त्यांनी या पुस्तकात कथन केला आहे).
मुंबईतील नामवंत धन्वंतरी डॉ. माधवराव मालवणकर यांच्याशी कबीर कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध होते. शारदा कबीर त्यांच्याकडे ज्युनिअर डॉक्टर म्हणून दाखल झाल्या. डॉ. मालवणकर हे त्या काळातील सर्व क्षेत्रातील थोर व्यक्तींचे वैद्याकीय सल्लागार होते. मुंबईतील विलेपार्ले येथील डॉ. एस. राव यांच्या घरी बाबासाहेबांशी शारदा कबीर यांची पहिली भेट होते. डॉ. राव हे बाबासाहेबांचे घनिष्ठ मित्र तर त्यांच्या मुली शारदा कबीर यांच्या मैत्रिणी. १९४७ च्या जानेवारी महिन्यात राव यांच्या घरी झालेल्या पहिल्याच भेटीत त्या दोघांत बौद्ध धर्माविषयी चर्चा होते. घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून दिल्लीत रात्रंदिवस काम करणारे बाबासाहेब प्रकृतिअस्वास्थ्यामुळे डॉ. मालवणकरांकडे येतात आणि त्यांची तपासणी करण्याची जबाबदारी डॉ. शारदा स्वत:कडे घेतात. त्या तपासणीत बाबासाहेबांचे शरीर मधुमेह, रक्तदाब, न्यूरायटिस आणि संधिवातासारख्या आजारांनी ग्रासल्याचे त्यांच्या लक्षात येते. त्यातून बाहेर पडण्यासाठी बाबासाहेबांना तत्काळ रोज इन्शुलिन देणे, नियमित व्यायाम आणि विशिष्ट प्रकारचा आहार देण्याची गरज असते. पण हे सगळे करणार कोण, असा प्रश्न उपस्थित होतो. पुढे असा काही घटनाक्रम येतो की, डॉ. शारदा कबीर यांच्याशी बाबासाहेबांच्या विवाहानेच तो प्रश्न सोडवला जातो.
बाबासाहेबांचे एकटेपण
डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यात डॉ. सविता ऊर्फ माईंची भूमिका पत्नी आणि डॉक्टर अशी दुहेरी होती. डॉ. सविता यांनी त्यांच्या विवाहापूर्वी बाबासाहेबांच्या राजकीय व सार्वजनिक जीवनातील आणि त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील काही घटनांची सविस्तर जंत्रीच या पुस्तकात दिली आहे; ज्यातून बाबासाहेबांचे एकटेपण अधोरेखित होते. विवाहापूर्वी, १९२२ ते १९४७ पर्यंत डॉ. आंबेडकर किती गंभीर आजारी होते, ते त्यांच्या निकटच्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रांचा दाखला देऊन त्या सांगतात आणि त्या दीर्घकालीन प्रकृतिअस्वास्थ्याच्या कारणांचाही त्या शोध घेतात. अस्पृश्यतेमुळे बाबासाहेबांवर ओढवलेल्या बालपणीच्या काही अत्यंत घृणित घटनांचे त्यांच्या मनावर कायमस्वरूपी आघात झाले होते, हे एक त्यापैकी महत्त्वाचे कारण. मसूर रेल्वे स्टेशन ते गोरेगावच्या प्रवासाबद्दल त्या लिहितात, ‘‘ती काळीज फाटणारी आठवण सांगताना डॉक्टरसाहेब अतिशय भावनावश होत असत. त्यांचा आवाज कंपित होत असे व डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागत. तथाकथित उच्चवर्णीय व सवर्ण हिंदूंच्या माणुसकीशून्य वागण्याने पावलोपावली अवहेलनेचे नि विटंबनेचे दाहक चटके सहन करावे लागले, तेही अगदी बालपणापासूनच.’’
वयाच्या पाचव्या वर्षी आईच्या मृत्यूनंतर, नाभिक समाजातील मंडळी अस्पृश्यांचे केस कापत नसत म्हणून ते काम त्यांच्या बहिणींना घरी करावे लागले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या शिरावर आली होती. शाळेतील शिक्षणापासून सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापकी करताना प्रत्येक ठिकाणी त्यांना अस्पृश्य म्हणून अपमान गिळावा लागला होता. १९३५ मध्ये पत्नी रमाबाईंचे निधन हाही एक मोठा आघात त्यांच्यावर झाला होता. त्याआधी चार अपत्यांना मुकावे लागले होते. त्यामुळे ‘‘१९३५ पासून बाबासाहेबांना अक्षरश: एकाकी जगावे लागले, माझी त्यांची भेट होऊन आमचे लग्न होईपर्यंत जिव्हाळ्याचे असे कोणीही त्यांच्याजवळ नव्हते. दिल्लीतही ते एकाकीच होते,’’ असे डॉ. सविता लिहितात.
डॉ. आंबेडकरांनी डॉ. शारदा यांना लग्नाची मागणी घातल्यापासून त्यांच्या लग्न सोहळ्यापर्यंतचा वृत्तांत हा या पुस्तकातील अत्यंत हृद्या मजकूर आहे. बाबासाहेबांची विद्वत्ता व सुसंस्कृतपणा आणि देशाची घटना लिहिण्याची त्यांच्यावरील ऐतिहासिक जबाबदारी, या भावनेने त्या बाबासाहेबांना पत्रातून होकार कळवतात. त्यानंतर त्या दोघात झालेल्या पत्रव्यवहारातून एका आगळ्यावेगळ्या बाबासाहेबांचे दर्शन वाचकांना घडते. ‘‘आमचा पत्रव्यवहार जरी वैयक्तिक स्वरूपाचा असला तरी त्यात एक युगपुरुषाचा संबंध असल्याने तो एक अमूल्य ठेवा आहे,’’ असे त्या लिहितात. बाबासाहेब त्यांना एक सोन्याची साखळी आणि मधोमध कोरलेला, जहाजे नांगरतात तो नांगर त्यांना पाठवतात. ‘‘तू माझ्या भटकणाऱ्या जीवननौकेचा नांगर आहेस’’ अशी त्यामागची भावना ते बोलून दाखवतात. पत्रात ते डॉ. शारदा यांना ‘शरू’ आणि स्वत:ला ‘राजा’ संबोधतात. स्त्री-स्वातंत्र्याचे आग्रही असल्याने डॉ. शारदा यांनी त्यांना एकेरी नावाने संबोधावे असाही आग्रह धरतात.
अखेर १५ एप्रिल १९४८ ही लग्नाची तारीख ठरते. भारताची फाळणी झाली असल्याने असंतोष धुमसत होता. गांधी हत्येने देशभर दंगली उसळल्या होत्या. त्यामुळे लग्नाला फारशी प्रसिद्धी दिली जात नाही. रजिस्ट्रारसह १५-२० लोक उपस्थित असतात. या विवाहप्रसंगी शुभेच्छापत्रात गृहमंत्री सरदार पटेल लिहितात की, गांधीजी असते तर त्यांनी तुम्हाला नक्कीच आशीर्वाद दिले असते. उत्तरादाखल पाठविलेल्या पत्रात डॉ. आंबेडकरही ती गोष्ट मान्य करतात. पुढे डॉ. सविता यांना आशीर्वाद देताना, आज ही क्रांतिकारी घटना पाहण्यासाठी बापू आपल्यात नाहीत, असा खेद पटेल व्यक्त करतात.
अखेरचे दिवस
स्वतंत्र भारताचे कायदामंत्री म्हणून काम करीत असताना वेगवेगळ्या पातळ्यांवर डॉ. आंबेडकरांचा कसा संघर्ष सुरू होता हे सांगतानाच दिल्लीतील त्यांची दिनचर्या, त्यांच्या खाण्यापिण्याच्या, पोशाखाच्या आवडीनिवडी, त्यांचे छंद आणि त्यांचे वाचन-लेखनाच्या सवयी याविषयी अतिशय तपशीलवार माहिती या पुस्तकात येते.
विवाहानंतरच्या काळातील हिंदू कोड बिल, १९५२ व १९५४ च्या निवडणुकीतील पराभव, राजकीय चळवळीतील अंतर्गत वाद, सहकाऱ्यांचे कटू अनुभव आणि अस्पृश्यांवरील सततचे अत्याचार यामुळे डॉ. आंबेडकरांच्या मनावर एकापाठोपाठ एक आघात होत होते. त्याच वेळी शरीर दुर्धर आजारांनी ग्रस्त असतानाही बाबासाहेबांचे रात्रंदिवस वाचन-लेखनही सुरू असायचे. धर्मांतर आणि धम्मप्रसारासाठी डॉ. आंबेडकरांना डॉ. सविता यांची मोलाची साथ होती, हे अनेक प्रसंगांतून लक्षात येते. परंतु बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वाट्याला अपमान व अवहेलना कशी आली, याचेही वेदनादायक कथन या पुस्तकात आहे.
‘बुद्ध अँड हिज धम्म’ हा ग्रंथ डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला. त्याची प्रस्तावना त्यांनी मृत्यूपूर्वीच लिहून ठेवली होती. त्या प्रस्तावनेत पत्नी डॉ. सविता आणि डॉ. मालवणकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती. परंतु पुढे पुस्तकात ती प्रस्तावना छापली गेली नाही, याचा त्यांना धक्का बसला. एवढेच नव्हे तर १९ खासदारांनी बाबासाहेबांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केल्यामुळे चौकशी समिती नेमली जाते, हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात दु:खद प्रसंग असल्याचे त्या सांगतात. या सगळ्यामागे काहींचे राजकीय हेतू कसे होते, तेही अखेरीस त्या लिहितात. त्यामुळे या संपूर्ण आत्मकथनाला वेदनेची किनार आहे आणि आत्मसमर्थनाचे अस्तर आहे, हेही जाणवते.
मूळ मराठी पुस्तकाच्या चार आवृत्त्या आणि त्यातील दुर्मीळ पत्रव्यवहार यामुळे या पुस्तकाचे भाषांतर आणि संपादन ही एक मोठी कसोटी होती. भाषांतरकार नदीम खान यांनी परिशिष्टात अनेक टिपा देऊन बाबासाहेबांवरील जागतिक पातळीवरील एक मौलिक दस्तावेज म्हणून हे पुस्तक समर्थपणे सिद्ध केले आहे.
बाबासाहेब, माय लाइफ विथ डॉ. आंबेडकर
लेखिका : सविता आंबेडकर
अनुवाद : नदीम खान
प्रकाशक : पेंग्विन रॅण्डम हाउस
पृष्ठे : ३६८, किंमत (पेपरबॅक) : ३९९ रु.