बदलापूरमधील दोन शाळकरी बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीला पाच पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी काढल्याने या पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, असे मत उच्च न्यायालयाने नोंदविले. तसेच कोणत्या यंत्रणेमार्फत या चकमकीची चौकशी करणार याची माहिती दोन आठवड्यांत सादर करण्याचा आदेशही दिला. हा एक प्रकारे राज्याच्या पोलीस दलाला हा मोठा धक्काच. दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या या गुन्हेगाराबाबत सहानुभूती बाळगण्याची अजिबात गरज नाही. उलट त्याला कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा होणे अपेक्षितच होते. पण त्याला चकमकीत ज्या पद्धतीने मारण्यात आला तीच मुळात चुकीची. या बनावट चकमकीवरून न्यायालयाने पोलिसांचे कान टोचले ते योग्यच झाले. बदलापूरमधील या शाळेत जो प्रकार घडला त्यात वास्तविक शाळा व्यवस्थापनाची मोठी चूक. लहानग्या मुलींवर देखरेख ठेवण्यासाठी महिला कर्मचारी नेमणे आवश्यक असताना तेथे अक्षय शिंदेला नेमले होते. हा प्रकार उघड होताच बदलापूरमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. पालक व नागरिक रस्त्यावर उतरले. आरोपीला अटक झाली पण शाळेचे विश्वस्त आणि मुख्याध्यापिका मात्र बेपत्ता होते. न्यायालयाने येथील तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर नापसंती व्यक्त केली होती. तळोजा कारागृहात असलेल्या अक्षय शिंदेला सायंकाळी साडेपाचनंतर अधिक चौकशीसाठी पोलीस ठाण्याला घेऊन जात होते. मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर ही कथित चकमक झाली. ‘आरोपीने पोलिसांची बंदूक खेचली, मग स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी ठार झाला’, असा कोणत्याही चकमकीबाबत पोलिसांकडून केला जातो, तसाच दावा अक्षय शिंदेच्या चकमकीबाबत केला गेला. धावत्या पोलीस वाहनात चार-चार पोलीस असताना आरोपी त्यांची बंदूक खेचून घेत असेल, तर बाकीचे पोलीस काय करीत होते? आरोपींची ने-आण करणाऱ्या पोलिसांना परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण दिलेले असते. न्यायदंडाधिकाऱ्यांनीही ‘पोलीस योग्यपणे ही परिस्थिती हाताळू शकले असते. बळाचा वापर करणे चुकीचे होते’ असा निष्कर्ष काढला. पोलीस राजकारण्यांच्या हातचे बाहुले झाल्यावर काय होऊ शकते याचे हे उदाहरण. विधानसभेची निवडणूक तेव्हा जवळ आली होती व सत्ताधाऱ्यांना योग्य ‘संदेश’ द्यायचा होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा