बँकांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर वादाचा धुरळा उठल्यावर मनसेने अपेक्षेप्रमाणे आंदोलन मागे घेऊन पुन्हा एकदा धरसोड वृत्तीचे दर्शन घडवले. राज ठाकरे या एकाच वलयांकित नावाभोवती फिरणाऱ्या या पक्षाला १८ वर्षांत राजकारणाची योग्य दिशा सापडली नाही हेच यातून दिसले. मुळात नवा पक्ष स्थापन करायला एक निश्चित विचार लागतो. तो पुढे नेण्यासाठी हातात कार्यक्रम असावा लागतो. मनसेची स्थापना झाली तेव्हाच याचा अभाव त्यात प्रकर्षाने दिसला. भावाचा राग आला म्हणून पक्ष काढणे एकदाचे समजून घेता येईल; मात्र तो चालवताना आपण शिवसेनेचीच नक्कल करतो हे जनता कितीकाळ सहन करणार? म्हणूनच २००९ मध्ये पक्षाला जे १३ आमदारांचे पाठबळ मिळाले ते पुढे टिकवता आले नाही.
महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरणे योग्यच; पण सामान्यांच्या उपजीविकेशी संबंध नसलेले असे अस्मितेचे मुद्दे दीर्घकालीन राजकारणात टिकणारे नसतात. शिवसेनेने प्रारंभीच्या काळात दाक्षिणात्यांच्या विरोधात ‘हटाव लुंगी’चा नारा दिला, पण सोबतीला नोकरीतील मराठी टक्का वाढावा म्हणून स्थानीय लोकाधिकार समितीतर्फे प्रयत्नही केले. असे नोकरीशी निगडित मुद्दे मनसेने कधी हाताळले? कधी परप्रांतीय तर कधी टोलचा मुद्दा हाती घ्यायचा. खळ्ळखटॅक करून प्रसिद्धी मिळवायची व नंतर अचानक शांत व्हायचे. इतके की अनेकांना संशय यावा. यामुळेच हा पक्ष लोकांच्या मनात विश्वास निर्माण करू शकला नाही. त्याला जोड मिळाली ती खुद्द राज ठाकरेंनी निवडणुकीच्या राजकारणात वारंवार बदललेल्या भूमिकांची. आधी मोदींची तारीफ. त्यासाठी गुजरातचा दौरा. नंतर त्यांना टोकाचा विरोध करून ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत घेतलेल्या प्रचारसभा. मग पुन्हा त्याच मोदींची स्तुती करत जाहीर पाठिंबा हे सारे अतर्क्यच. इतका भूमिकाबदल करूनही रंजक भाषणशैलीमुळे सभांना गर्दी होते, पण लोकांच्या मनात पक्षविषयक विचार रुजवला जात नाही. पुढाकार व माघार असेच या पक्षाच्या कृती कार्यक्रमाचे स्वरूप राहिल्याने कधी एक तर कधी कुणीच आमदार नाही अशी वाईट अवस्था या पक्षावर आली. याच काळात विनय कोरे, राजू शेट्टी, महादेव जानकर यांसारख्या नेत्यांचे पक्ष उदयाला आले व एक-दोन आमदारांच्या बळावर दबावाचे राजकारण करण्यात यशस्वी झाले. प्रश्न हाच की अशी क्षमता असूनही मनसेला ते का जमू शकले नाही?
राजकीय पक्ष स्थापन करणे तसे सोपे. मात्र, ज्या विचारांच्या आधारावर तो स्थापन झाला तो यशापयशाची पर्वा न करता पुढे नेत राहणे तेवढेच जिकिरीचे. मनसे असे जिकिरीचे काम करायला कधी धजावलाच नाही. प्रत्येकवेळी नवे व तात्कालिक मुद्दे हाती घेत राजकारण करणे व नंतर शांत बसण्यामुळे पक्षाला स्थैर्यच प्राप्त होऊ शकले नाही. अशा अवस्थेचा फायदा मोठे पक्ष घेतात व लहानांचा चतुराईने वापर करुन घेतात. तो होऊ द्यायचा की नाही हे सर्वस्वी पक्षाच्या नेत्यांवर अवलंबून, पण तिथेही ठाकरेंना चातुर्य दाखवता आले नाही. त्यामुळे कुणाच्या तरी हातचे बाहुले अशी टीका वारंवार सहन करण्याची वेळ मनसेवर आली. निश्चित दिशा व ध्येयधोरण नसले की काय होते याचे उत्तम उदाहरण म्हणून या पक्षाकडे बघता येईल.
निवडणुकीचे निकाल कसेही लागलेले असोत, पण राज्यात ठाकरे या नावाभोवती आजही जनमानसात वलय आहे. त्याचा फायदा घेत पक्षाचा विस्तार करण्याची नामी संधी राज ठाकरेंना होती, पण प्रत्येक वेळी त्यांनी ती वाया घालवली. मराठीच्या प्रश्नावर हा पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून आक्रमक आहे. मात्र, नुसते आंदोलन करून तो सुटणारा नाही तर खासगी आस्थापनांमध्येही मराठीचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यावर मनसे काहीच करताना दिसत नाही. बँक कर्मचारी संघटनेने नेमके यावर बोट ठेवले. फळविक्रेते, सुरक्षारक्षक, बँकेचे कर्मचारी या उपजीविकेसाठी येणाऱ्या लहान माणसांना मारहाण करून हा प्रश्न सुटणारा नाही याची जाणीव मूळचे कलावंत असलेल्या राज ठाकरेंना नसावी हे दुर्दैवीच. यापेक्षा हाच न्याय इतरांना लागू करायचा असेल तर मुंबईत अनेक उद्याोगपती राहतात. त्यातले अनेक ठाकरेंच्या घरी पायधूळ झाडतात. त्यातले कुणीही मराठी बोलत नाहीत. सिनेसृष्टीतील अनेक कलावंत मराठीपासून दूर आहेत. मग मध्यमवर्ग व गरिबांचाच अपमान करण्याचा मक्ता या पक्षाला दिला कुणी? त्यामुळे आतातरी राज ठाकरेंनी सवड काढून पक्षाचे कधी पुढे, कधी मागे होणारे इंजिन विचारांच्या रुळांवर आणावे.