न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानांवर सलग तीन कसोटी सामन्यांत आणि ऑस्ट्रेलियात गेल्यावर पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर पुन्हा तीन सामन्यांत मार खाल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे वाभाडे निघणे स्वाभाविकच. आपल्याकडे घरोघरी असलेले क्रिकेटतज्ज्ञ आपापल्या परीने या पराभवाचे विश्लेषण करतच आहेत. त्यातले अनेक समाजमाध्यमांच्या विविध मंचांवर भाष्य करून आपल्यातील ‘तज्ज्ञता’ प्रकटही करत आहेत. विराट कोहली, रोहित शर्मादी वरिष्ठ खेळाडूंवर तुटून पडून, कसे यांनी आता निवृत्त होणेच भारतीय संघासाठी हितावह आहे, याचेही अनेक जण तर्कट मांडताहेत. हे भारतीय क्रिकेटला नवीन नाही. पण, ज्यांनी क्रिकेटचे धोरण ठरवायचे, नवीन संघबांधणी करायची, पराभवाचे खेळाच्या अंगाने विश्लेषण करायचे, त्यांनीही या मार्गाने जावे, हे आश्चर्यकारकच. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतरच्या पराभवाचे विश्लेषण करतेवेळी परदेश दौऱ्यांत क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि मैत्रिणींना बरोबर नेण्यास परवानगी दिल्याने खेळावर परिणाम झाला, असे या धोरणकर्त्यांनी म्हटल्याने चांगलीच चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खेळाडूंची तंदुरुस्ती, संघातील एकोपा, काही वरिष्ठ खेळाडूंनी करणे आवश्यकच असलेली तंत्रातील सुधारणा, देशांतर्गत स्पर्धात खेळून पुन्हा एकदा सर्व मूलभूत कौशल्ये, तंत्रांचा सराव करणे असे मुद्देही पराभव विश्लेषणाच्या बैठकीत चर्चिले गेलेच असणार. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात काही खेळाडू एका सामन्यानंतर दुसऱ्या सामन्याच्या ठिकाणी प्रवास करताना संघाच्या बसऐवजी कुटुंबीयांबरोबर प्रवास करत होते, हा आक्षेपही घेण्यात आला आणि तो योग्यही. परंतु, खेळाडूंच्या कामगिरीत पत्नी वा मैत्रिणींच्या उपस्थितीने फरक पडला, असा निष्कर्ष काढून त्यावरून परदेश दौऱ्यांत कुटुंबीय किती काळ खेळाडूबरोबर राहू शकतात, याचे नियम ठरवणे जरा अतिच झाले.

हेही वाचा >>> लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!

यापुढे ४५ दिवसांच्या दौऱ्यात पत्नी, मुले वा मैत्रीण दोन आठवडेच खेळाडूसोबत राहू शकतील, असा नियम करायचे  ‘बीसीसीआय’ने ठरवले आहे. दौरा त्याहून कमी असेल, तर हा ‘सोबतीचा करार’ आठवडाभराचाच राहील, अशीही पुष्टी याला जोडली आहे. या प्रस्तावित नियमाच्या समर्थनार्थ जे काही म्हटले जाते, त्यात करोनापूर्व काळात असेच नियम होते, असा युक्तिवाद केला जातो आहे. तथापि, करोनोत्तर जगात बऱ्याच दिवसांच्या परदेश दौऱ्यांत कुटुंबीय हा खेळाडूसाठी भावनिक आधार होऊ शकतो, म्हणून या नियमाला फाटा देण्यात आला. लांबच्या दौऱ्यांत कुटुंबीयांपासून येणारे तुटलेपण जाणवू न देण्यासाठी केलेला हा बदल होता. भारतीय संघ जिंकत होता, तोवर याबाबत फार कुणी काही बोलले नाही. आता मात्र, याच कारणामुळे क्रिकेटपटूचे खेळावरील लक्ष विचलित होते, असे म्हणण्यास सुरुवात झाली! यात जाहीर चर्चा केली गेली, ती विराट कोहलीच्या अपयशाला अनुष्का शर्मा जबाबदार असल्याची. तो खेळत असताना अनुष्का प्रेक्षकांत असेल, तर त्याच्या धावा होत नाहीत, असे यावरचे कथ्य. यातील विरोधाभास असा, की या दौऱ्यातील ज्या सामन्यात कोहलीने शतक ठोकले, तेव्हाही अनुष्का प्रेक्षकांत होतीच! या पार्श्वभूमीवर, एखादा खेळाडू चांगली कामगिरी करत नसेल, तर त्याचे अपयश त्याच्या कुटुंबीयांवर कसे ढकलले जाऊ शकते, हा यातील कळीचा प्रश्न.

खेळाडूच्या कामगिरीतील कमतरता त्याच्या तंत्रातील सुधारणेने, तंदुरुस्तीच्या समस्या सोडवून किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने थोडी शैली बदलून दूर केली जाणे अपेक्षित आहे. शिवाय, मानसिक पातळीवर कोणत्याही कारणाने लक्ष विचलित होत असेल, तर संघाबरोबर मानसोपचारतज्ज्ञ असतात. आणि त्याही पुढे जाऊन हे तिढे प्रत्येकालाच, मग तो खेळाडू असो, वा एखाद्या कंपनीतील कर्मचारी, वैयक्तिक पातळीवर सोडवावे लागतात. नोकरीतसुद्धा अलीकडे काम आणि वैयक्तिक आयुष्य यात समतोल साधण्याला प्राधान्य मिळते. खेळाडू लांबच्या आणि बऱ्याच दिवसांच्या दौऱ्यांवर जाताना पत्नी व कुटुंबीयांच्या उपस्थितीमुळे तेच साधत असेल, तर त्यावर बंधने लादण्याने नक्की काय साधणार आहे? कुटुंबीय कमी दिवसांसाठी क्रिकेटपटूबरोबर गेल्याने त्याची कामगिरी अमुक इतकी सुधारेल, असे त्याचे थोडेच कोष्टक मांडता येणार आहे? त्यामुळे या कारणांपेक्षा खेळाशी संबंधित इतर कारणांवर अधिक चर्चा झाली, तर अधिक चांगले. ‘बीसीसीआय’ असा नियम करत असल्याचे समजल्यावर त्यावर ज्या प्रतिक्रिया उमटल्या, त्यातील काही प्रतिक्रियांत सध्या चर्चेत असलेल्या ‘एल अँड टी’च्या प्रमुखांच्या, आठवडयात ९० तास कामासंदर्भातील विधानांचाही गमतीशीर आधार घेतला गेला. काहींनी तर म्हटले, की ‘एल अँड टी’चे हे महाशय बहुधा ‘बीसीसीआय’मध्ये रुजू झाले आहेत! यातील गमतीचा भाग सोडल्यास क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर चर्चा करताना त्यात क्रिकेटेतर कारणांना किती महत्त्व द्यायचे, याचे ताळतंत्र सुटता कामा नये हा मुद्दा महत्त्वाचा.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci ban wives girlfriends and other family members from accompanying cricketers on foreign tours zws