‘वायुवेगे सुगंधवार्ता…

कालिंदीच्या कानी पडता…’

राधा कृष्णावरी भाळली’ या प्रसिद्ध भावगीतातले हे शब्द. वायूचा वेग हा प्राचीन काळापासून सर्वोच्च मानला जाई. पण तो मोजला मात्र गेला नव्हता. जगभरात वारा हा केवळ एक नैसर्गिक शक्ती नव्हे तर मिथक किंवा प्रतीक बनला आहे. प्राचीन सुमेरियनांनी ‘एनलिल’, इजिप्शियनांनी ‘शू’ ही हवेची मूर्तरूप देवता तर ग्रीकांनी ‘ईओलस’ ही वाऱ्याची देवता वादळे, शीतलहर इ. कारणीभूत मानली. आपल्याकडे वायू हा पंचमहाभूतांपैकी एक मानला असून वायुदेवतेचा उल्लेख वेद, महाकाव्ये, पुराणे व अनेक दंतकथा आणि काव्यात आहे.

पण वाऱ्याकडे वास्तव रूपात पाहण्यास सुरुवात केली ती सागरी व्यापारी व नाविकांनी. पहिल्या शतकात हिप्पालस या ग्रीक नाविकाने मान्सून वाऱ्यांचा शोध लावला. डच भूसंशोधक हॅन्ड्रिक ब्रोवर यांनी सतराव्या शतकात ‘पश्चिमी वाऱ्यांचा’ शोध लावला. तसेच व्यापारी वारे, ध्रुवीय वारे, ईशान्य व्यापारी वारे इ. ग्रहीय वारे आणि खारे व मतलई वारे, डोंगर व दरी वारा, इ. स्थानिक वारे असे अनेक वारेही ज्ञात होत गेले. गतिमान हवेस वारा म्हणतात. पण हवा गतिमान का होते, म्हणजे वारा का वाहतो या साध्या प्रश्नाचे उत्तर समजण्यास १७ वे शतक उजाडावे लागले.

रॉबर्ट बॉईल या संशोधकाने १६६२ मध्ये हवेचे आकारमान व दाब यातील संबंध शोधला. पुढे १७८० मध्ये जॅक्वस चार्ल्स या शास्त्रज्ञाने ‘चार्ल्सचा नियम’ मांडून हवेचे आकारमान व तापमान यातील संबंध स्पष्ट केला. साध्या भाषेत सांगायचे तर बॉईल यांनी सिद्ध केले की आकुंचन पावलेल्या हवेचा दाब जास्त असतो व प्रसरण पावलेल्या हवेचा दाब कमी असतो. तर चार्ल्स यांनी सिद्ध केले की तापलेली हवा प्रसरण पावते व थंड झालेली हवा आकुंचन पावते. या दोन नियमांच्या आधारे वारे का वाहतात हे समजू लागले. ते स्पष्टीकरण असे की पृथ्वीवर सर्वत्र तापमान सारखे नसते. जिथे तापमान जास्त असते, तेथे हवेचा दाब म्हणजे वायुभार कमी होतो. तर जिथे तापमान कमी होते, तिथे वायुभार वाढतो. हवा जास्त वायुभाराकडून कमी भाराकडे जाते. त्यामुळे जिथे वायुभार अधिक असतो तिथून, जिथे वायुभार कमी असतो तिकडे वारे वाहतात. इव्हेंजेलीस टॉर्सेल्ली या इटालियन गणितज्ञाने १६४४ मध्ये पहिला वायुभारमापक तयार केला. हा शोध हवामानशास्त्रात क्रांती करणारा होता. त्या आधारे विविध ठिकाणचे तापमान, वायुभार यांची माहिती घेऊन, वारे कुठून कुठे वाहतील याचा अंदाज बांधणे शक्य झाले. वाऱ्याचा वेग हा दोन ठिकाणच्या वायुभारातील फरकावर अवलंबून असतो. म्हणजे वायुभारात फरक जेवढा जास्त, तेवढा वाऱ्याचा वेग जास्त. यामुळे वायुभारातील फरकावरून वारे किती वेगात वाहतील याचाही अंदाज सांगता येऊ लागला. एखाद्या ठिकाणी तापमान वाढले की तेथील वायुभार कमी होतो. त्यामुळे आजूबाजूस जिथे जास्त वायुभार आहे, तेथील हवा वेगाने त्या ठिकाणी येते. या मूळ तत्त्वाच्या आधारेच हवामान भाकिते सांगितली जातात.

वाऱ्याची दिशा कळण्यासाठी पूर्वी कुक्कुट वातदिशादर्शक वापरत. त्याचाच वापर करून पुढे वाऱ्याची गती मोजण्यात येऊ लागली. त्यात सुधारणा होत, आता आधुनिक अॅनेमोमीटर या यंत्राने वाऱ्याची गती मोजतात. वाऱ्याचा वेग व्यवहारात कि.मी. प्रतितास असा सांगितला जातो.

पूर्वीपासून वाऱ्याचे वर्णन झुळूक, झोत, जोरदार वारे, झंझावात असे केले जाते. हे सर्व शब्द व्यक्तिसापेक्ष आहेत. म्हणजे एकाला ‘जोरदार’ वारा वाटतो, तो दुसऱ्याला फक्त ‘थोडा वेगवान’ वाटू शकतो. पूर्वी नाविक लोक वाऱ्यांची गती नोंदवीत. पण ती व्यक्तिनिष्ठ असून त्यात एकसूत्रता नव्हती. नाविकांना व सर्वांनाच उपयोगी होईल असे वाऱ्याचे वस्तुनिष्ठ वर्णन गरजेचे होते. ते काम इंग्लंडच्या शाही नौदलाचे फ्रान्सिस ब्युफर्ट यांनी केले.

त्यांचा जन्म १७७४ मध्ये आयर्लंडमध्ये झाला. फक्त १४ व्या वर्षापर्यंत शिक्षण घेऊन सागर सफरीवर जाण्यासाठी त्यांनी शाळा सोडली. पण त्यांचे स्वयंशिक्षण अव्याहत सुरू होते. १८०५ मध्ये ते एच. एम. एस. वुलविच या जहाजावर जलवैज्ञानिक आणि नौदल अधिकारी होते. त्या वेळी त्यांनी स्वत:च्या उपयोगासाठी वाऱ्याचा वेग सांगण्याची एक स्केल – श्रेणीपट्टी – तयार केली होती. अनेकजण ती वापरू लागले व तीच पुढे ‘ब्युफर्ट स्केल’ – ब्युफर्ट श्रेणी म्हणून ओळखली जाऊ लागली. ब्युफर्ट आपल्या स्केलमध्ये वरचेवर सुधारणा करीत गेले. १९३० मध्ये हा स्केल रॉयल नेव्हीतर्फे स्वीकारला गेला. त्याचा पहिला अधिकृत वापर चार्ल्स डार्विननी ज्यातून प्रवास केला त्या एच. एम बीगल या जहाजावर नोंदी ठेवण्यासाठी करण्यात आला. १८५३ मध्ये ब्रुसेल्स येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत तो स्केल जागतिक पातळीवर स्वीकारला गेला. त्यानंतरही त्याच्यात बदल व सुधारणा केल्या गेल्या. आज जगभर सर्वत्र त्याचा वापर केला जातो. ब्युफर्ट श्रेणीत शून्य ते १२ अशा १३ श्रेणी आहेत. त्यापैकी काहींचा तपशील असा. त्यात वाऱ्याचा वेग कि. मी. प्रतितासमध्ये आहे. शून्य श्रेणी म्हणजे वाऱ्याचा वेग शून्य ते २. यात धूर सरळ वर चढत जातो. श्रेणी ४ म्हणजे धूळ उडते, कागदाचे तुकडे उडतात. वेग २० ते २८ असतो. तर ६ श्रेणी म्हणजे छत्री वापरणे अवघड ठरते, मोठ्या फांद्या हलतात. तेव्हा वेग असतो ३९ ते ४९. ७ श्रेणी म्हणजे वेग ५० ते ६१. झाडे पूर्ण हलतात, विरुद्ध चालणे अवघड होते. श्रेणी ९ म्हणजे वाऱ्याचा वेग ७५ ते ८८. अशा वेळी छपरावरील कौले उडतात. इमारतींना धोका संभवतो. श्रेणी १० म्हणजे वाऱ्याचा वेग ८९ ते १०२. या श्रेणीत वृक्ष उन्मळून पडतात व इमारतींची हानी होते. श्रेणी ११ हा क्वचित येणारा अनुभव असतो. त्यादरम्यान वाऱ्याचा वेग १०३ ते ११७ असतो. यामुळे प्रचंड नुकसान होते. श्रेणी १२ म्हणजे वाऱ्याचा वेग ११८ हून अधिक असतो. तो प्रचंड विनाश करतो. या स्केलमुळे तुफानी वारे, चक्रीवादळ, इ. प्रसंगी नेमकी कोणती दक्षता घ्यावी हे आधीच कळू लागले. यामुळे ब्युफर्ट खरे ‘वायुदूत’ ठरले. ते पुढे इंग्लिश नौदलाचे रिअर अॅडमिरल झाले. १८४८ मध्ये त्यांना ‘सर’ ( Knight Commander of Bath) पदवी देऊन गौरविण्यात आले. १८५७ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांचे नाव व अजरामर कीर्ती शिल्लक राहिली.

त्यांच्या नावे असणारी ‘ब्युफर्ट सायफर’ ही अंकपट्टीही प्रसिद्ध आहे. इंग्लंडच्या किनाऱ्यावर भरती ओहोटीची वेळापत्रके तयार करण्यास त्यांनी चालना दिली होती. ‘आधुनिक हवामान भाकितांचे जनक’ म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ आर्क्टिक समुद्राच्या एका शाखेस ‘ब्युफर्ट समुद्र’ असे नाव दिले गेले. तर अंटार्क्टिका खंडावरील एका बेटाचे नाव ‘ब्युफर्ट बेट’ आहे. अशा प्रकारे चौदाव्या वर्षी शाळा सोडलेल्या एका मुलाचे नाव वाऱ्याने दोन्ही ध्रुवांवर पोहोचवले. या दोन्ही ध्रुवांवर एका अर्थाने पृथ्वीवरील दिशांचा अंत होतो. दिगंत कीर्ती अजून वेगळी काय असते?

लेखक भूगोलाचे अभ्यासक आणि निवृत्त शिक्षक आहेत.

lkkulkarni@gmail.com

Story img Loader