‘युटोपिया’ ईश्वरदत्त असो किंवा आणखी कसाही… त्यात माणसाला माणूसपणाचं समाधान मिळेल?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तत्त्वज्ञान म्हणजे फक्त ‘अफलातून’ लोकांच्या डोक्यात निर्माण होणाऱ्या विचार लहरी नव्हेत. तत्त्वज्ञान सगळ्यांच्याच जगण्याशी संबंधित असतं. तत्त्वज्ञान सामाजिक आणि राजकीय जीवनाचं अविभाज्य अंग असतं. प्रत्येक माणूस ‘वांच्छित जगाची’ कल्पना बाळगून असतो. त्याच्या वांच्छित जगाच्या कल्पनेचा स्रोत कधी अबोध युटोपियाअसतो, तर कधी धर्मश्रद्धा असते. तर कधी त्यानं पाहिलेली स्वप्नं असतात. थोडक्यात, माणूस हा प्राप्त जग आणि वांच्छित जग यांत ताणला गेलेला असतो. हा ताण असह्य होतो तेव्हा बहुतेक एका जगाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. पण मुळात उपरोक्त ताण टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नाला आल्बेर काम्यू तत्त्वज्ञान म्हणतो.

मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे ‘काय आहे’ आणि ‘काय असायला पाहिजे’ यांत निर्माण होणाऱ्या ताणाची चिकित्सा करण्यासाठी तत्त्वज्ञानात्मक अवकाशाची अर्थात ‘एटोपिया’ची आवश्यकता असते. एटोपिया असा अवकाश असतो जिथून प्राप्त जगाकडे तटस्थपणे पाहता येतं, चिकित्सा करता येते, परिवर्तनाची आणि पर्यायी जगांची शक्यता वर्तवता येते. ‘जग हेटरोटोपिक अर्थात बहुजिनसी आहे’ ही एटोपिक तत्त्वज्ञांची ग्राह्य भूमिका असते.

फुकोने प्रचलित केलेल्या ‘हेटरोटोपिया’ या शब्दाचा अर्थ इतर-जग, उपेक्षित-जग, नाकारलेलं जग, बहिष्कृत-जग इत्यादी होतो. ग्रीक कवी पिंडार म्हणतो त्याप्रमाणे एटोपिक तत्त्वज्ञ ऐहिक जगाबाहेर आंधळी उडी न घेता बुद्धीच्या प्रकाशात इथंच असंख्य शक्यतांचा शोध घेतात. त्यामुळे प्राप्त जग आणि वांच्छित जग यांत ताण असला तरी तो विनाशवादी ( nihilistic) नसून रचनात्मक ठरतो.

मानवी स्वातंत्र्य अबाधित ठेवूनच बुद्धीच्या प्रकाशात पर्यायी जगांची शक्यता शोधणाऱ्या प्रत्येक तत्त्वज्ञाला ‘एटोपिक’ हे विशेषण लागू पडतं.

पाश्चात्त्य वैचारिक परंपरा संपृक्त बिंदू गाठते तेव्हा या ‘एटोपिक’ तत्त्वाला मध्यवर्ती स्थान प्राप्त होतं. मात्र काही तत्त्वज्ञ ‘लोगोस’चा समग्र प्रवास आणि इतिहासाच्या शेवटच्या थांब्याविषयीदेखील अचूक आणि अंतिम ज्ञानाचा दावा करतात. बुद्धीच्या प्रकाशाला विझवून ‘एटोपिया’ला अनावश्यक समजणारे असे समग्रलक्ष्यी युटोपिक तत्त्वज्ञ धर्मश्रद्धा आणि तत्त्वज्ञान यांमधील भेद धूसर करतात.

युटोपिया या संकल्पनेचं विश्लेषण केलं तर स्वर्ग, ईडन गार्डन, जन्नत यांसारख्या धर्मश्रद्धांमध्ये कल्पिलेल्या वांच्छित जगांना युटोपिया म्हणता येणार नाही. युटोपियाचा शब्दश: अर्थ ‘अस्तित्वात नसलेलं जग’ असा होतो. मात्र धर्मश्रद्धांमधलं वांच्छित जग अस्तित्वात आहे, असा प्रत्येक धर्मातल्या श्रद्धाळूचा ठाम विश्वास असतो. धार्मिक साहित्यात तर दु:खी, पीडित, खचलेल्या मानवी मनाला सहजपणे आकृष्ट करण्यासाठी वांच्छित जगाविषयी तपशीलवार माहिती दिलेली असते. श्रद्धाळू एकवेळ, प्राप्त जगाला ‘असत्’ घोषित करेल; पण धर्मशास्त्रांमधील ‘सत्’ जगाच्या अस्तित्वाविषयी शंका उपस्थित करणं हे मात्र त्याला निधर्मीपणाचं लक्षण वाटेल.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मश्रद्धांमधलं जग अस्तित्वात असतं, असा विश्वास असल्यानं ते जग अस्तित्वात आणण्यासाठी मनुष्याला काहीही करावं लागत नाही. त्या सत् परिपूर्ण, अनादि, अनंत जगात प्रवेश मिळवण्यासाठी मनुष्याला फक्त पत्ता शोधावा लागतो आणि पात्रता कमवावी लागते. पाश्चात्य परंपरेत सोळाव्या शतकातल्या लुथरच्या क्रांतीपर्यंत

‘सत्’ जगाचा पत्ता शोधण्यासाठी आणि पात्रता कमावण्यासाठी अपरिहार्यपणे कॅथोलिक चर्चवर अवलंबून राहावं लागत असे. प्राप्त जग आणि धर्मश्रद्धेतलं कल्पित परिपूर्ण जग यांत मध्यस्थी करणारा अवकाश ‘एटोपिक’ नसून श्रद्धात्मक होता आणि श्रद्धेची मक्तेदारी कॅथोलिक चर्चनं स्वत:कडे राखून ठेवली होती.

धर्मश्रद्धांमध्ये कल्पिलेल्या जगात मनुष्याला काहीही करावं लागणार नाही, कारण सगळं अंतिम रीतीनं ईश्वरनिर्मित असतं. उलटपक्षी, तत्त्वज्ञानातलं वांच्छित जग अस्तित्वात नसतं – म्हणून मनुष्याला त्याची कल्पना, आकृतीबंध तयार करून त्याला अस्तित्वात आणण्यासाठी निर्मिकाची भूमिका घ्यावी लागेल. अठराव्या शतकात फ्रेंच विचारवंत व्होल्टेर उपरोक्त ‘धार्मिक युटोपिया’ आणि तत्त्वज्ञानातील समग्रलक्षी धर्मश्रद्धासदृश युटोपियांचा फोलपणा अधोरेखित करताना लिहतो की मनुष्याचं सारतत्त्व त्याच्या निर्माण करण्याच्या क्षमतेत आहे. मनुष्याची निर्माण करण्याची क्षमता काढून घेतली तर त्याचं युटोपिक सुखासीन जीवन त्याला नरकासारखं खायला सुटेल.

ईश्वरी प्रयोजनाला कँडिडप्रश्न

अठराव्या शतकात फ्रेंच फिलॉसॉफर व्होल्टेरने ‘कॅन्डिड’ नावाची तत्त्वज्ञानात्मक कथा लिहिली आहे. या छोटेखानी कथेतील सतरावं प्रकरण ‘एल्दोरादो’ या युटोपिक स्वर्णनगरी विषयी आहे. तसं पाहिलं तर अठरावं शतक म्हणजे प्रबोधनयुग. आर्थिक, सामाजिक, राजकीय पातळींवर क्रांतिकारक परिवर्तनाचा काळ. या आशावादी वातावरणात साहजिकच युटोपिक साहित्याचं भरघोस पीक येतं. व्होल्टेरनं त्याच्या कथेत युटोपियाच्या संकल्पनेला विविध दृष्टिकोनांतून तपासून पाहिलं आहे. कथेचं मुख्य पात्र कॅन्डिड नावाचा एक सरळमार्गी अनाथ मुलगा आहे. तो इतका भोळा आहे की त्याचा गुरू पॅन्ग्लोसनं जे सांगितलं ते तो अंतिम सत्य म्हणून स्वीकारतो.

खरंतर, व्होल्टेरने पॅन्ग्लोस हे पात्र जर्मन तत्त्वज्ञ लायबनिच्झच्या समग्रलक्ष्यी, स्थितिशील, ईश्वरवादी तत्त्वज्ञानाची टर उडविण्यासाठी रेखाटलेलं आहे. लायबनिच्झच्या मते प्राप्त जगच सर्वोत्कृष्ट जग आहे. कारण प्राप्त जग ‘ईश्वराची निवड’ आहे आणि ईश्वर आपल्या निवडीत चुकू शकत नाही. त्यामुळे वेगळ्या जगाची इच्छा बाळगणंच ईश्वराच्या निवडीच्या विरोधात जाणं ठरतं. म्हणून प्राप्त जगात जो जिथं जन्माला येतो तिथंच त्यानं आपल्या जीवनाचं प्रयोजन शोधलं पाहिजे. तत्कालीन युरोपियन समाजातली कमालीची गरीबी, विषमता, अन्याय, अत्याचार, रोगराई आणि सतत चालणाऱ्या युद्धांमुळे सरासरी आयुर्मान ३५ ते ४० वर्षांचंच होतं. भोळ्या कॅन्डिडला वाटतं की हे यातनामय, अन्यायी आणि क्षणभंगुर जीवन कसं काय ईश्वराची निवड आणि इच्छा असू शकतं. पण गुरू पॅन्ग्लोस म्हणतो तर बरोबरच असेल.

कॅन्डिड लहानपणापासून एका उमरावच्या पोरीवर लपूनछपून प्रेम करायचा. तीही प्रेम करायची. एके दिवशी तो बागेत तिचा मुका घेताना पकडला जातो. त्याच्या ढुंगणावर लाथा घालून त्याला हद्दपार केलं जातं. तेव्हा पहिल्यांदा त्याला आपल्या गुरूच्या तत्त्वज्ञानविषयी प्रश्न पडतो. या ‘सर्वोत्कृष्ट जगात’

प्रेमासारख्या सुंदर गोष्टीचं बक्षीस ‘ढुंगणावर लाथा’ आणि बेघर होणं कसं काय असू शकतं! मात्र परत त्याला वाटतं की यामागे देखील काहीतरी ईश्वरनियोजित अगम्य प्रयोजन असावं.

त्यानंतर कॅन्डिडची युरोपभर भटकंती सुरू होते. तो लिस्बनचा भुकंप अनुभवतो. संपूर्ण शहर भुईसपाट होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडतात. मात्र तिथं देखील पॅन्ग्लोसला काहीतरी ईश्वरी प्रयोजनच दिसतं. नंतर कॅन्डिडला युरोप सोडून ‘नव्या जगा’त अर्थात अमेरिकेत आश्रय घ्यावा लागतो. (खरंतर, इतर जगांसारखं अमेरिका देखील जुनंच जग होतं!) त्या काळी युरोपियन समाज या नव्या जगाला युटोपिक प्रयोगांची प्रयोगशाळा समजत असे.

जगभर भटकंती करत, अनुभव घेत कॅंडिड हळूहळू स्वत:चं आकलन विकसित करतो. आपल्या पोथीनिष्ठ गुरूविषयी शंका उपस्थित करायला सुरुवात करतो.

अमेरिकेविषयी बिंबवलेलं युटोपिक चित्र त्याला फसवं दिसतं. जुन्या जगातील अन्याय, अत्याचार, दांभिकपणा नव्या जगात देखील त्याला दिसतो. युरोपमध्ये परलोकवादी तत्त्वज्ञान शिकवणारे जेजुइट्स अमेरिकेत सत्तापिपासू राज्यकर्ते झालेले दिसतात.

कँडिडला भटकंतीदरम्यान सुरिनाम इथं दयनीय अवस्थेत एक माणूस दिसतो. हा निग्रो गुलाम- साखर खाल्ल्याची शिक्षा म्हणून त्याचा एक हात, एक पाय कापलेला असतो. हे अमानुष दृश्य पाहिल्यावर कॅन्डिड विचार करतो की ‘ब्लॅक कोड’ ( le Code Noir 1685) अंतर्गत ज्या जगात लोकांना विकलं जातं, गुलाम केलं जातं, त्यांनी गुलामी नाकारण्याचा प्रयत्न जरी केला तर हात पाय कापून अमानुष शिक्षा केली जाते, जिथं बहुसंख्य लोकांच्या श्रमावर मोजकेच ऐश्वर्यात जगतात असं जग सर्वोत्कृष्ट असूच शकत नाही. आणि तो आपल्या गुरुच्या सावलीबाहेर पडतो.

कँडिड त्याच्या भटकंती दरम्यान अपघातानं ‘एल्दोरादो’ या स्वर्णनगरीत जाऊन पोहचतो. तिथं सगळे सुखी, समृद्ध असतात. सगळं मुबलक असतं. कुठल्याही प्रकारचं द्वंद्व नसतं. तिथं खासगी संपत्ती नावाची संकल्पनाच नसते. ज्या गोष्टींसाठी जगात कलह, द्वेष आणि युद्धं निर्माण होतात त्या गोष्टी एल्दोरादोत दगडधोंड्यां सारख्या आढळतात. कुणालाही काहीही करण्याची आवश्यकता नसते. सुरूवातीला, कॅन्डिडला वाटतं की आपण शेवटी युटोपियात येऊन पोहोचलो आहोत जिथं सगळं अस्तित्वात आहे आणि काही निर्माण करायची आवश्यकता नाही. पण काही दिवसांतच त्याला कळतं की काहीही निर्माण करायला मिळू नये, ही तर मोठी शिक्षा आहे. त्याला एल्दोरादोचा कंटाळा येतो आणि तो त्याच्या प्रेमिकेच्या शोधात मानवी जगात परततो.

या तत्त्वज्ञानात्मक कथेत व्होल्टेर स्पष्ट करतो की मनुष्याचं सारतत्त्व त्याच्या निर्माण करण्याच्या क्षमतेत आहे. त्याची निर्माण करण्याची क्षमता त्याच्याकडून काढून घेतली तर त्याचं माणूसपण नाकारलं जातं. लायबनिच्झच्या स्थितिशील सर्वोत्कृष्ट जगात मनुष्याला राबवलं जातं पण निर्मिक होऊ दिलं जात नाही. दुसऱ्या बाजूला, परलोकवादी वांच्छित जगात सगळंच अस्तित्वात असल्यानं तिथं देखील मनुष्याचं सारतत्त्व नाकारलेलं आहे. थोडक्यात, मनुष्याचा ‘एटोपिक’ युटोपिया बुद्धीचा प्रकाश तेवत ठेवण्यात, अर्थपूर्णपणे कृतीशील राहण्यात आहे.

फ्रेंच साहित्य-तत्त्वज्ञानाचे अभ्यासक

sharadcrosshuma@gmail.com