योगेन्द्र यादव
‘भारत जोडो यात्रे’ने काय साध्य केले याचे विश्लेषण करण्याची वेळ अजून आलेली नाही. पण तरीही तिने बदललेली जनमानसातली राहुल गांधी यांची प्रतिमा हे तिचे सगळ्यात मोठे साध्य म्हणता येईल.
‘भारत जोडो यात्रा’ अखेर दिल्लीमध्ये पोहोचली. देशाच्या राजधानीतील तिच्या प्रवेशाबरोबरच राष्ट्रीय पातळीवर तिच्याबद्दल चर्चादेखील सुरू झाली. मुख्य प्रवाहातील बऱ्याच माध्यमांनी उशिरा का होईना तिची दखल घेतल्याबद्दल खरे तर त्यांचे आभारच मानायला हवेत. आणि ही यात्रा फक्त दिल्लीमध्येच नाही, तर राजकीय परिघावरदेखील येऊन पोहोचली आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळेच तिचा प्रवास थांबवण्यासाठी मोदी सरकार कोविडच्या धोक्याचा वापर करू पाहात आहे.
राजधानीत प्रवेश केल्यावर ‘भारत जोडो यात्रे’ला छाननीला सामोरे जावे लागेल. भारतातील आघाडीचे काही विद्वान तिच्यावर गंभीर भाष्य करत आहेत, हे या यात्रेने मिळवलेल्या यशाचे लक्षण आहे. आतापर्यंत, या यात्रेत थेट प्रसारण, अधिकृत कथ्य, काही प्रवासी आणि सहप्रवाशांनी केलेली यात्रेच्या प्रवासाची वर्णने, प्रत्यक्ष रिपोर्ताज आणि अधूनमधून काही व्हिडीओ यांचा समावेश आहे. अलीकडील काही लेखांनी ‘भारत जोडो यात्रे’बद्दलची चर्चा राहुल गांधींचा टी-शर्ट, ते राहतात ते कंटेनर आणि प्रवासाचा मार्ग यापलीकडे वेगळय़ा पातळीवर नेली आहे. ही सगळी चर्चा, वादविवाद आता या विषयाच्या केंद्रस्थानी म्हणजे या यात्रेचा देशाच्या राजकारणावर होणारा परिणाम, विशेषत: आपले प्रजासत्ताक संपुष्टात आणू पाहणाऱ्या वर्चस्ववादी शक्तीला राजकीय आणि वैचारिक प्रतिकार करण्याची तिची क्षमता या मुद्दय़ावर आली आहे.
टीकेकडे सकारात्मकपणे पाहा
या चर्चेसाठी आपण प्राध्यापक सुहास पळशीकर आणि प्रताप भानू मेहता यांच्या ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील अलीकडील दोन लेखांवर लक्ष केंद्रित करू. अर्थात या दोघांवर लक्ष केंद्रित करायचे ते, ते आघाडीच्या राजकीय समीक्षकांपैकी आहेत म्हणून नाही, तर ‘भारत जोडो यात्रे’चे अगदी पहिले गंभीर विश्लेषणदेखील त्यांनीच केले आहे, म्हणून. पळशीकर म्हणतात: ‘‘घटनानिष्ठतेची पुनस्र्थापना करणे, भारतीय स्वत्वाची पुनर्कल्पना करणे आणि लोकशाहीच्या रूपरेषा पुन्हा परिभाषित करणे हे आजचे आव्हान आहे.’’ ‘यात्रे’चे यश हे तिच्यासमोर उभी ठाकलेली आव्हाने किती मोठी आहेत, यावरूनच जोखले पाहिजे.
‘यात्रे’ने आतापर्यंत जे काही साध्य केले आहे, त्यावर या दोघांपैकी कोणीही समाधानी नाही. ‘भारत जोडो यात्रा’ म्हणजे ‘नवीन राजकीय अवकाश निर्माण करण्याचा एक वेगळा प्रयत्न’ आणि ‘द्वेषाच्या राजकारणाविरोधात एक महत्त्वाची कृती’ असल्याचे मान्य करून, प्रताप मेहता म्हणतात की ‘यात्रे’ला अद्याप ‘आशेचे राजकारण’ म्हणता येणार नाही. या ‘यात्रे’ने ‘पक्षाचे पुनरुज्जीवन’ आणि ‘आपल्या लोकशाही राष्ट्रीय स्वत्वाचा पुनशरेध’ या दोन्ही मुख्य उद्दिष्टांसंदर्भात वाईट कामगिरी केल्याचे पळशीकर यांनी निदर्शनास आणून देतात.
‘भारत जोडो यात्रे’मध्ये सहभागी झालेल्या काही जणांना हे मूल्यांकन पटणारे नाही. काही जण असे म्हणू शकतात की ही ‘यात्रा’ ज्या परिस्थितीत सुरू केली गेली किंवा तिच्यासाठीच्या उपलब्धतांच्या तुलनेत समीक्षकांच्या अपेक्षा जास्त आहेत. ‘यात्रे’ने ज्या पद्धतीने आपली वाटचाल केली, त्या तुलनेत समीक्षक तिचे कौतुक करत नाहीत. तिने काय साध्य केले, हे ती संपल्यानंतर बऱ्याच अंशी दिसून येईल, हे खुद्द मेहता यांनी मान्य केले आहे. अर्थात आजघडीला ही सगळी चर्चा व्यर्थ आहे, कारण ‘भारत जोडो यात्रा’ तिच्या शेवटच्या मुक्कामावर अजून पोहोचलेली नाही. खरे तर, ती तिच्या गंतव्यस्थानाच्या म्हणजे श्रीनगरच्या पलीकडे – प्रत्येक भारतीयाच्या हृदयापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचली पाहिजे. त्या दरम्यानच्या जाणकारांच्या या विश्लेषणाकडे मार्गदर्शक दीपगृह म्हणून पाहिले पाहिजे. यात्रेची ‘भौगोलिक, राजकीय आणि बौद्धिक व्याप्ती’ वाढवण्यासाठी पळशीकरांच्या आवाहनाकडे ‘यात्रे’तील सहभागी लक्ष द्यायला हवे. किंवा नवीन वैचारिक दृष्टी निर्माण करणे, राजकीय गती मिळवणे आणि विरोधी ऐक्याचा आधार बनणे या मेहता यांच्या तीन निकषांवर लक्ष द्यायला हवे.
‘भारत जोडो यात्रे’ने आत्तापर्यंत वैचारिक आणि राजकीय या दोन मुख्य आघाडय़ांवर काय केले आहे आणि नवीन वर्षांत पुन्हा काय सुरू केले जाणे आवश्यक आहे, हे खोलवर समजून घेण्यासाठी या गंभीर मूल्यांकनांची मदत झाली आहे.
प्रभावी संदेश, पोहोच वाढवणे
‘भारत जोडो यात्रे’ने घेतलेले वैचारिक आव्हान ही तिची सर्वात कठीण कसोटी आहे. त्यामुळेच अनेक जनआंदोलने आणि संघटना तिच्यामागे उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे ‘यात्रे’ला मिळणारे कोणतेही यश फक्त काँग्रेसलाच नाही तर सगळय़ा विरोधकांना लाभदायक ठरेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भारतीय जनता पक्षाच्या वैचारिक वर्चस्वाला थेट आव्हान देणे, हे या ‘यात्रे’चे मुख्य यश आहे. विरोधकही भाजपच्या ‘हिंदूत्वा’ची नक्कल करत आहेत, अशा वैचारिक वातावरणात ‘भारत जोडो यात्रे’ने घटनात्मक मूल्यांची आठवण करून दिली आणि धर्मनिरपेक्षतेसाठी उभे राहण्याचा संकल्प दाखवला. बऱ्याच काळानंतर एखाद्या राजकीय नेत्याने सार्वजनिक व्यासपीठावर येऊन भांडवलशाहीच्या पित्त्यांचा निषेध केला आहे. व्यासपीठावरून किंवा पत्रकार परिषदेत सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींपुरता ‘यात्रे’चा संदेश मर्यादित नाही. काही न बोलताही ही यात्रा संवाद साधते. तिचे यात्रेसारखे स्वरूप, तपस्येचे आवाहन आणि त्यातून निर्माण झालेली एकता यामुळे भाजपचे वैचारिक वर्चस्व कमी करण्यात तिला यश आले आहे. प्रेम आणि एकता यांसारख्या शब्दांचा पुन्हा उच्चार करून तिने शेतकरी, कामगार आणि गरिबांचा भारत पुढे नेला आहे. त्यामुळे द्वेषाच्या विरोधात बोलणे शक्य झाले आहे. ही काही किरकोळ गोष्ट नाही.
राष्ट्रीय पातळीवर कथ्य बदलण्यासाठी आणखी बरेच काही करण्याची गरज आहे. अनेकदा असे होते की संदेश देणारा जास्त दृश्य असतो आणि संदेश कमी. काही वेळा असे घडणे आवश्यक होते. कारण संदेश देणाऱ्याला बदनाम करणे हा भाजपचा मुख्य डाव होता. पण आता ‘भारत जोडो यात्रे’ला आपला संदेश अधिक प्रभावी करण्यासाठी आणि त्याचा पोहोच वाढवण्यासाठी नवे आणि वेगवेगळे मार्ग शोधावे लागतील. प्रताप मेहता उल्लेख करतात त्याप्रमाणे या ‘यात्रे’बद्दल उलटसुलट दोन्ही बाजूंनी बोलले जाणे ही समस्या नाही, तर तिच्याबाबत ज्या अनेकविध गोष्टी बोलल्या जात आहेत, त्यामुळे तिला जो संदेश द्यायचा आहे, तो विसविशीत होऊ शकतो, ही खरी समस्या आहे.
दुसरीकडे, अगदी थेट राजकीय आघाडीवरही, यात्रेने काही दुर्मीळ गोष्टीदेखील साध्य केल्या आहेत. शेवटी, प्रजासत्ताक टिकून राहते ते, लोक ते वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरतात, तेव्हाच. भारत जोडो यात्रेने त्याची झलक दाखवली आहे.
मोदींचे सर्वात मोठे अस्त्र बोथट
भारतातील कोणताही नागरिक काँग्रेसच्या भवितव्याबद्दल उदासीन राहू शकत नाही. या वेळी देशाचे भवितव्य काँग्रेसच्या भवितव्याशी जोडलेले आहे. ‘यात्रे’ने यासंदर्भात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. काँग्रेसच्या सहानुभूतीदार आणि निष्ठावंत मतदारांना पक्षावर विश्वास ठेवण्याचे कारण मिळाले आहे. पक्षाचे कायर्कर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आता काहीतरी सकारात्मक करायचे आहे. पक्षाचा आपल्या नेतृत्वावर विश्वास निर्माण झाला आहे. राहुल गांधींचा आत्मविश्वास दिसतो आहे. या सर्व काँग्रेसअंतर्गत गोष्टी आहेत आणि पक्षाचे निवडणुकीतील भवितव्य बदलण्यास अपुऱ्या आहेत. पण ही अत्यंत आवश्यक आणि बहुप्रतीक्षित अशी पहिली पायरी होती.
काँग्रेसच्या बाहेरही ‘भारत जोडो यात्रे’चा परिणाम झाला आहे. त्यामुळे भाजपविरोधी पण काँग्रेसेतर छावणीत काँग्रेससाठी अनेक नवे मित्र तयार झाले आहेत. या यात्रेत शेकडो जनआंदोलने आणि संघटना सहभागी झाल्या असून काँग्रेसभोवती एकजूट होऊ लागली आहे. त्यांची मने जिंकण्यात राहुल गांधी विशेष प्रभावी ठरले आहेत. ‘भारत जोडो यात्रे’मुळे झालेला मोठा बदल म्हणजे तिने घडवलेली राहुल गांधींची वैयक्तिक प्रतिमा. त्यांच्यावर असलेले पप्पू हे लेबल उतरले आहे. मोदींचे सर्वात मोठे अस्त्र बोथट झाले आहे. त्याचा फायदा केवळ काँग्रेसलाच नाही तर सर्व विरोधकांना होऊ शकतो.
अर्थातच, ही फक्त सुरुवात आहे. ‘भारत जोडो यात्रा’ यशस्वी झाली म्हणजे काँग्रेस पक्षाला निवडणुकीतही यश मिळेल असे काही नाही, तशी हमी कोणीच देऊ शकत नाही. त्यासाठीची पहिली पायरी म्हणजे गैरराष्ट्रीय पक्षांची लोकशाही आघाडी स्थापन करणे. आपल्याला सगळय़ा विरोधी पक्षांच्या निवडणूक महाआघाडीची गरज नसली तरी हेतूपूर्वक केलेल्या एकजुटीची नितांत गरज आहे. कुंपणावरच्या मतदाराला पटवून देण्याचे आणि आपल्याकडे वळवून घेण्याचे आव्हान अजूनही संपलेले नाही.
लबाडी आणि द्वेषाच्या भिंतीला छिद्र पाडण्यात ‘भारत जोडो यात्रा’ यशस्वी झाली आहे. त्यामुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे आणि दरवाजा किलकिला होऊन थोडी ताजी हवा आत आली आहे. मात्र खरे काम ‘भारत जोडो यात्रे’नंतर सुरू होईल. सुहास पळशीकर म्हणतात त्याप्रमाणे ‘भारत जोडो’ हा केवळ इव्हेंट राहू नये. ती एक चळवळ झाली पाहिजे.
लेखक ‘जय किसान आंदोलन’ आणि ‘स्वराज इंडिया’चे संस्थापक आहेत. yyopinion@gmail.com