पी. चिदम्बरम

अखेरच्या टप्प्यात असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेने लोकांना काय दिले? राहुल गांधींना त्यातून काय मिळाले?

एखादा राजकीय नेता कोणत्याही राजकीय उद्दिष्टाशिवाय एखाद्या यात्रेला निघू शकतो यावर विश्वास ठेवणे लोकांना कठीण जाऊ शकते, हे मला माहीत आहे. अशा यात्रा अगर मोर्चाची आदि शंकराचार्य (धार्मिक), माओ झेडोंग (१९३४-३५, लष्करी), महात्मा गांधी (१९३०, सविनय कायदेभंग) आणि मार्टिन ल्यूथर किंग (१९६३, १९६५, नागरी हक्क) ही इतिहासातील उदाहरणे आहेत.

रविवार, २९ जानेवारी २०२३ रोजी तुम्ही हा स्तंभ वाचाल तेव्हा, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने १३५ दिवसांत जवळपास चार हजार किलोमीटरचे अंतर कापलेले असेल. कोणाचीही राजकीय भूमिका, मत काहीही असो, किंवा एखाद्याला विशिष्ट राजकीय भूमिका- मत नसेलही, पण राहुल गांधी यांची भारत जोडो ही यात्रा म्हणजे धैर्य, दृढनिश्चय आणि शारीरिक क्षमतेचे अतुलनीय दर्शन आहे याबाबत दुमत असू शकत नाही.

भाजपला का चिंता?

आपल्या या दौऱ्यामागे कोणताही राजकीय उद्देश नाही किंवा तो कोणत्याही निवडणुकीसाठी वगैरे नाही. प्रेम, बंधुता, जातीय सलोखा आणि एकतेचा संदेश पसरवणे हा आपला एकमेव उद्देश आहे, असे राहुल गांधी यांनी वारंवार सांगितले आहे. त्यांच्या या उद्देशांना ‘राजकीय’ म्हणता येत नाहीत; त्यामुळे भाजपसह अन्य टीकाकारांची धुसफुस होते आहे. शेवटी यात्रेवर टीका करण्यासाठी भाजपला अगदीच अतार्किक कारण सापडले. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा थांबवावी यासाठी ‘करोना विषाणूचा प्रसार व्हायचा धोका’ असल्याची बालिश कल्पना आरोग्यमंत्र्यांनी मांडली.

अशा गोष्टींमुळे राहुल गांधी खचले नाहीत. या सगळय़ा टीकेला न जुमानता भारत जोडो यात्रा सुरूच आहे. ते लोकांपर्यंत, विशेषत: तरुण, महिला, मुले, शेतकरी, मजूर आणि समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचले आहेत. भारतभर दारिद्रय़ आणि बेरोजगारी किती खोलवर पसरलेली आहे ते त्यांना पाहता आले; समाजातील प्रत्येक वर्ग महागाईच्या ओझ्याखाली दबला आहे; समाजात द्वेषाचे दूत आहेत; आणि भारतीय समाज आताच्या काळात पूर्वीपेक्षा जास्त दुभंगलेला आहे, असे त्यांना आढळून आले आहे. रस्त्यावर लोकांबरोबर मारलेल्या गप्पांमधून आणि मोठय़ा सभांमधून त्यांनी समाजात खोलवर पडलेल्या- पडत चाललेल्या दरीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

राहुल गांधींना या दौऱ्यादरम्यान खरेच उदंड प्रतिसाद मिळत आहे, हे मी प्रत्यक्ष पाहिले. मी त्यांच्यासोबत कन्याकुमारी, म्हैसूर आणि दिल्ली असा प्रवास केला. सगळीकडे प्रचंड गर्दी होती. प्रत्येक राज्यात हीच परिस्थिती होती. मी त्यासंबंधीची छायाचित्रे आणि दृश्यफितीही पाहिल्या आहेत. संबंधित मार्गावर कोणत्याही ठिकाणी, कोणालाही अधूनमधून बससेवा देण्यात आली नव्हती. यात्रेत सहभागी होण्यासाठी कोणालाही पैसे दिले गेले नाहीत. कोणालाही जेवण मिळेल वगैरे आश्वासन दिले गेले नव्हते. हजारो तरुण या यात्रेत चालत होते. रस्त्याच्या दुतर्फा शेकडो मध्यमवयीन व वृद्ध माणसे आणि मुले उभी होती. ती हात वर करून अभिवादन करत होती, फुले उधळत होती आणि जल्लोष करत होती. जवळपास प्रत्येकाकडे मोबाइल फोन होता आणि प्रत्येक जण छायाचित्र घेत होता.

या यात्रेत कलाकार, लेखक, अभ्यासक, राजकारणातील व्यक्ती, अपंग व्यक्ती असे सर्व प्रकारचे लोक सहभागी झाले होते. माझ्या माहितीप्रमाणे, सामान्य लोक हा या यात्रेतील सर्वात महत्त्वाचा घटक होता. भारतात लोकांमध्ये द्वेष आणि हिंसाचाराची मोठी दरी निर्माण केली गेली आहे. प्रेम, बंधुता, जातीय सलोखा आणि एकता निर्माण करणे, हे या सामाजिक पतनाला उत्तर आहे, हे राहुल गांधी यांचे म्हणणे आपण ऐकले आहे आणि आपल्याला ते समजले आहे असा मूक संदेश ते देत होते.

गरिबांची उपस्थिती

यात्रेदरम्यानची गरीब लोकांची संख्या ही मला सर्वात जास्त प्रभावित करणारी गोष्ट ठरली. भारतात गरिबी आहे, ही गोष्टच नाकारणारे तिथे उपस्थित असते तर हजारो गरीब आहेत आणि त्यांच्या गरिबीचे कारण बेरोजगारी आहे, हे त्यांच्या लक्षात आले असते. जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक २०२२ (ग्लोबल मल्टिडायमेंशनल पॉव्हर्टी इंडेक्स २०२२)नुसार, भारतातील गरिबांचे प्रमाण लोकसंख्येच्या १६ टक्के म्हणजे २२.४ कोटी आहे. याचा अर्थ बाकीचे लोक श्रीमंत आहेत असा नाही. दरमहा १२८६ रुपये (शहरी भागात) आणि १०८९ रुपये प्रति महिना (ग्रामीण भागात) मिळवणाऱ्याला गरीब मानले जाते. डिसेंबर २०२२ मध्ये बेरोजगारीचा दर ८.३ टक्के होता.

या गर्दीमध्ये असलेल्या शेकडो लोकांनी गेल्या निवडणुकीत भाजप किंवा बिगरकाँग्रेस पक्षाला मत दिले असणार याची मला खात्री आहे. पण त्यांच्या कुणाच्याच चेहऱ्यावर मला वैर दिसले नाही. त्यांच्यापैकी अनेकांना उत्सुकता होती, कुतूहल होते. पण जवळजवळ प्रत्येकाच्या डोळय़ात आशेचा एक किरण दिसत होता. त्यात एक प्रश्न होता की भारत जोडो यात्रा या देशाचे भविष्य अधिक चांगले घडवेल का?

भाजपचा विरोध का?

प्रेम आणि जातीय सलोखा पसरवणे या गोष्टीला भाजपचा विरोध का आहे? कारण, ‘सबका साथ सबका विकास’अशी भाजपची घोषणा असूनही भाजपने पद्धतशीरपणे मुस्लीम आणि ख्रिश्चनांना डावलले आहे आणि इतर अल्पसंख्याकांना तुच्छ लेखले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात एकही मुस्लीम व्यक्ती नाही. भाजपच्या ३०३ लोकसभा आणि ९२ राज्यसभेच्या खासदारांपैकी एकही सदस्य मुस्लीम नाही. सर्वोच्च न्यायालयातील एकमेव मुस्लीम न्यायाधीश ५ जानेवारी २०२३ रोजी निवृत्त झाले. हिजाब घालणे, आंतरधर्मीय विवाह करणे, तथाकथित लव्ह जिहाद करणे, गायींची वाहतूक पळवणे, वसतिगृहात मांसाहार देणे यांसारख्या गोष्टींवरून भाजप समर्थक हिंसाचार माजवतात. लोकांच्या सामूहिक हत्या केल्या जातात. चर्चची तोडफोड केली जाते. बहुसंख्य आणि अल्पसंख्याक समुदायांचे मिश्रण असलेल्या भागातील कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला विचारा. तो किंवा ती तुम्हाला सांगेल की परिस्थिती कधीही स्फोटक होऊ शकेल, ही शक्यता गृहित धरून ते लक्ष ठेवून असतात.

राहुल गांधी यांच्याबाबत काय? भारत जोडो यात्रेचा त्यांच्यावर परिणाम झाला असेलच, परंतु त्याचबरोबर मला माहीत आहे की लोकांच्या त्यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातही या यात्रेमुळे लक्षणीय बदल झाला आहे. राहुल गांधी यांचे धैर्य, जिद्द आणि शारीरिक ताण सहन करण्याची तयारी या गोष्टी भाजपमधले लोकही नाइलाजाने का होईना मान्य करतात. माझ्या ओळखीच्या डझनभर लोकांनी (ज्यांनी काँग्रेसला मत दिलेले नाही) मला सांगितले की आता ते राहुल गांधींकडे एका नव्या दृष्टीने पाहतात. राहुल गांधी यांचा संदेश समाजातील सगळय़ा वर्गामधल्या लोकांपर्यंत पोहोचला आहे, हे मला यातून समजले.

भारत जोडो यात्रेतून राहुल गांधींनी सन्मान कमावला आहे. त्यांची ही यात्रा यशस्वी ठरली आहे, यात कोणतीच शंका नाही. त्यांचा संदेश दूरवर पसरला आहे, हीच सध्यासाठी चांगली गोष्ट आहे.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.
संकेतस्थळ : pchidambaram.in
ट्विटर : @Pchidambaram_IN