कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कुठल्याही प्रशासनाचा एक महत्त्वाचा आणि अपरिहार्य भाग म्हणजे पोलीस. ‘पोलीस’ हा मराठीने पूर्णत: सामावून घेतलेला एक इंग्रजी शब्द. मुळात पोलीस शब्द ‘पॉलिस’ म्हणजे नगर या ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा मूळ अर्थ नगरसेवक. आज मात्र कायद्याची अंमलबजावणी हे पोलिसांचे प्रमुख कार्य मानले जाते. शिपाई (मूळ अरबी रूप – सिपाई) हा शब्दही त्याऐवजी कधी कधी योजला जातो; पण पोलीस शब्दातील नेमकी छटा त्यात येत नाही. त्यामुळे पोलीस हाच शब्द आज मराठीने आणि इतरही बहुतेक भाषांनी आपला म्हणून स्वीकारला आहे.
सर रॉबर्ट पील यांनी लंडनमध्ये १८२९ साली पहिली पद्धतशीर पोलीस यंत्रणा उभारली आणि आजही ती आदर्श मानली जाते. त्यांच्या नावावरूनच इंग्लंडमध्ये पोलिसांना ‘बॉबी’ म्हणायची प्रथा रूढ झाली. कारण इंग्लिशमध्ये ‘बॉबी’ हे रॉबर्टचे लघुरूप आहे. जसे की टेड (एडवर्डचे लघुरूप), बिल (विलियमचे लघुरूप), जिम (जेम्सचे लघुरूप), बेन (बेंजामिनचे लघुरूप), जो (जोसेफचे लघुरूप), माइक (मायकेलचे लघुरूप) इत्यादी.
आज इंग्रजीत तसेच मराठीतही प्रचलित असलेले अनेक शब्द पॉलिस या ग्रीक शब्दापासून तयार झाले आहेत. उदाहरणार्थ, पॉलिसी (धोरण), पॉलिटिक्स (राजकारण), कॉस्मोपॉलिटन (बहुढंगी), मेट्रोपोलीस (महानगर). आपण आयुर्विमा उतरवतो त्यालाही पॉलिसीच म्हणतात.
‘गुंड’ शब्द मराठीत आला तो हिंदीतील ‘गुंडा’ या शब्दावरून. पुढे तो जगभर गेला. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीतही ‘गुंडा’ शब्द १९२० सालापासून समाविष्ट आहे. त्यातूनच पुढे इंग्रजीत ‘गून’ हा त्याच अर्थाचा शब्द तीसच्या दशकात रूढ झाला. भारतात गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून जे कायदे आहेत त्यांनाही ‘गुंडा अॅक्ट’ असे म्हटले गेले आहे. ‘गुंडागर्दी’, ‘गुंडाराज’ ही त्याच शब्दाची रूपे. अर्थात प्रत्येक वेळी ‘गुंडा’ शब्द निंदाव्यजक आहे असे नाही. अनेक घरांत पूर्वी एखाद्या मुलाला प्रेमाने ‘गुंडय़ा’ म्हणून हाक मारली जाई. चिमणराव-गुंडय़ाभाऊ ही निरागस जोडी चिं. वि. जोशींनी अमर केली आहे. ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’ या संतवचनात ‘गुंडा’ शब्दाचा अर्थ कर्तबगार असाच आहे.
भानू काळे