नाट्यगुरू इब्राहिम अल्काझी यांचं निधन ऑगस्ट २०२० मध्ये झालं. त्यानंतर सुमारे सव्वातीन वर्षांनी त्यांचं चरित्रपुस्तक येतंय आणि ते अल्काझी यांची कन्या अमल अल्लाना यांनी लिहिलं आहे. अल्काझी हे नाट्य दिग्दर्शक आणि दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे आद्या संचालक म्हणून जितके प्रसिद्ध आहेत तितकेच उत्तम छायाचित्र-संग्राहकही होते. हेन्री कार्तिए-ब्रेसाँपासून आजच्या छायाचित्रकारांपर्यंत अनेकांनी टिपलेल्या छायाचित्रांचा मोठा संग्रह त्यांनी केला, तो आता ‘अल्काझी आर्काइव्ह्ज’मध्ये आहे. या अल्काझींनी स्वत:च्या नोंदीही जपून ठेवल्या होत्या, स्वत: केलेल्या नाट्यप्रयोगांची छायाचित्रं, नेपथ्यांची प्रतिरूपं जपली होती… अशा अल्काझी-नोंदींचं प्रदर्शन भरवण्यातही अल्लाना यांचा सहभाग यापूर्वी होता. त्यामुळे हे चरित्र अस्सल तर असणारच, पण अमल अल्लाना या स्वत: अभ्यासू नाट्य दिग्दर्शिका असल्यानं ‘अल्काझी शैली’ असं काही होतं का, नाट्यसंहितेचा दिग्दर्शकीय अभ्यास कसा असतो, यासारख्या प्रश्नांना गेल्या ५० वर्षांत सामोऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे हे चरित्र अधिक वाचनीय ठरेल.
हेही वाचा >>> भूगोलाचा इतिहास : इतिहास घडवायचाय…? भूगोल शिका!
सर्पमित्र आज सर्व शहरांत असतात, पण आधुनिक पद्धतीनं सापांचा अभ्यास करणारे आद्या सर्पमित्र रोम्युलस व्हिटेकर! त्यांच्या पत्नी जानकी लेनिन या सर्पमित्र, प्राणिमित्र आणि वन्यजीवांबद्दल लेखन करणाऱ्या. ‘माय हजबंड अॅण्ड अदर ॲनिमल्स’ या त्यांच्या पुस्तकात रोम्युलस यांचा उल्लेख अटळच होता, पण आता रोम्युलस व्हिटेकर यांचं जानकी यांनी लिहिलेलं चरित्र येतंय. त्यात अमेरिकी आई, भारतात जन्म, पुन्हा अमेरिकेत अशा तरुणपणीच्या प्रवासापासून पुढल्या आठवणी आहेत. पुस्तक रोचक भाषेत लिहिलेलं असणार, यात शंका नाही.
या दोघांइतकं एम. के. नम्बियार यांचं नाव प्रख्यात नाही. पण हे एम. के. नम्बियार निष्णात वकील होते, भारतीय राज्यघटनेचे आणि सांविधानिक कायद्याचे तज्ज्ञ होते. स्वतंत्र भारतातल्या कायद्याच्या वाटचालीत अत्यंत महत्त्वाचा ठरलेला ‘ए. के. गोपालन वि. मद्रास राज्य’ हा खटला त्यांनी लढवला आणि जिंकला होता. कोणाही भारतीय नागरिकाला न्यायालयासमोर उभे केल्याविनाच कितीही काळ कोठडीत डांबण्याची मुभा सरकारला नाही, असा स्पष्ट निकाल या खटल्यातून मिळाला होता. अर्थात, पुढल्या काळात सारेच संदर्भ बदलत गेले. आता तर, न्यायालयात हजर न करताच ९० दिवसांपर्यंत कोठडीत ठेवण्याची मुभा देणारी ‘भारतीय न्याय संहिता’ मंजूर झाली आहे. एम. के. नम्बियार यांचं हे चरित्र के. के. वेणुगोपाल यांनी लिहिलं आहे. हे वेणुगोपाल भारताचे महान्यायवादी (ॲटर्नी जनरल) या पदावर २०१७ ते २२ या काळात होते, हे लक्षात घेता तेही निष्णात वकील आहेत हे निराळं सांगायला नकोच.
ही तिन्ही चरित्रं अगदी जवळच्या नातेवाईकांनी लिहिली असली तरी लिहिणाऱ्यांना चरित्रनायकाचा व्यवसाय अगदी जवळून माहीत असणं, हे या तिन्ही पुस्तकांचं निराळेपण ठरेल.
याखेरीज दोन युरोपीय नेत्यांबद्दलची पुस्तकं, हे २०२४ मधलं आकर्षण ठरेल. यापैकी एक आहेत जर्मनीच्या माजी चॅन्सेलर अँगेला मर्केल! यांचं आत्मचरित्र येत्या काही आठवड्यांत नक्की प्रकाशित होणार आहे खरं, पण त्या आगामी पुस्तकाचं नावसुद्धा अद्याप गोपनीयच ठेवण्यात आलंय. दुसरे युरोपीय नेते अगदी आजकालचे… वोलोदिमिर झेलेन्स्की. रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर सुमारे दोन वर्षांपूर्वी हल्ला केला नसता तर या झेलेन्स्कींना कुणी ओळखतही नसतं आजतागायत. खिसगणतीतही नसलेल्या एका सरकारप्रमुखापासून ते युरोपातल्या एका धीरोदात्त नेत्यापर्यंत झेलेन्स्की यांच्या झालेल्या प्रवासाबद्दलचं हे पुस्तक आहे, त्याचं शीर्षकही ‘शोमॅन- द इन्साइड स्टोरी ऑफ द इन्व्हेजन दॅट शुक द वर्ल्ड ॲण्ड मेड अ लीडर ऑफ वोलोदिमिर झेलेन्स्की’ असं आहे. या पुस्तकाचे लेखक सायमन शूस्टर यांच्या नावाचं साम्य एका प्रकाशन संस्थेच्या नावाशी असलं तरी, हे शूस्टर वेगळे- ते युक्रेनमध्ये पत्रकार म्हणून अनेक वर्षं काम करत आहेत.
हेही वाचा…
लॉस एंजेलिसमधील मांजरी
जोनाथन फ्रॅन्झन हा समकालीन अमेरिकी कादंबरीकार. त्याच्या व्यक्तिरेखा मांजरद्वेष्ट्या असल्या तरी तो नाही. ‘पेटा’च्या मोहिमांसाठी त्याने व्हिडीओद्वारे भटकबहाद्दर मांजरींना रात्री घरातच ठेवण्याचे आवाहन वेळोवेळी केले. हा त्यानंतरचा ‘न्यू यॉर्कर’मधील लेख. कादंबरीकाराच्या नजरेतून शहरी मांजरे आणि मांजरख्याली माणसांविषयी. https://www.newyorker.com/ magazine/2024/01/01/how-the-no-kill-movement-betrays-its-name
वर्षात येणारी २३० पुस्तके
गेल्या वर्षभर वाचलेल्या चाळीस-पन्नास पुस्तकांची इतरांना थकवणारी यादी समाजमाध्यमांवर झळकवून समाधान मानत असाल, तर ही येत्या वर्षात येणाऱ्या निवडक आणि महत्त्वाच्या जगभर नाव असलेल्या लेखकांच्या ग्रंथांची यादी. तीही महत्त्वाच्या प्रकाशनसंस्थांची. इतर प्रकाशनसंस्था आणखी नवे आणतील ती वेगळीच.https://lithub.com/lit-hubs-most-anticipated-books-of-2024/?single= true