वास्तुरचनाकारांचं जीवनकार्य सांगणारी पुस्तकं एरव्ही ‘कॉफीटेबल’ प्रकारात शोभणारी असतात. तसाच तो आडमाप आकार, गुळगुळीत पानांवरली रंगीत छपाई, गरजेपुरताच मजकूर… वगैरे. त्यामुळेच ती महागसुद्धा असतात. पण दिवंगत चार्ल्स कोरिआ यांची ओळख करून देणारं हे अवघ्या २९९ रुपये छापील किमतीचं पुस्तक निराळं आहे. मुस्तनसीर दळवी हे स्वत: (कवी म्हणूनही परिचित असले तरी) वास्तुरचनाकार आणि आधुनिक भारतातल्या वास्तू हा त्यांचा अभ्यासविषय. त्या विषयात मुंबईच्या आयआयटीतून पीएच.डी.सुद्धा मिळवलीय त्यांनी. या दळवींनी चार्ल्स कोरिआ यांच्याबद्दल लिहिलेलं हे पुस्तक, केवळ व्यावसायिक किंवा अभिकल्पकार म्हणून कोरिआ यांची महती सांगणारं नसून ‘सिटिझन चार्ल्स’ या नावाला जागणारं आहे. चार्ल्स कोरिआ म्हटलं की अनेकांना चटकन आठवते ती पेडर रोडची ‘कांचनजंगा’ इमारत… व्हरांड्यासारख्या मोठमोठ्या गॅलऱ्या आणि लाल-पिवळे रंग ही धनिकवणिकांच्या त्या इमारतीची खासियत. पण याच कोरिआंनी भोपाळचं भारत भवन आणि तिथलंच मध्य प्रदेश विधान भवन, जयपूरचं जवाहर कला केंद्र, दिल्लीची ब्रिटिश कौन्सिलची वास्तू, पुण्याची आयुका अशा इमारतींचीही रचना केली.

हेही वाचा : कलाकारण: काश्मीरची पिछवाई…

नवी मुंबईची संकल्पनाच कोरिआ, शिरीष पटेल आणि प्रविणा मेहता यांनी मांडली होती. गिरण्यांच्या जमिनींचा न्याय्य विकास कसा व्हावा, म्हणून राज्य सरकारनं नेमलेल्या समितीचे प्रमुख कोरिआच होते. सरकारनं हा अहवाल पायदळी तुडवला- पण ही समिती नसती तर कॉटन ग्रीन भागातल्या म्हाडाच्या इमारतीही कदाचित उभ्या राहिल्या नसत्या. दळवी यांचं वास्तुरचनाविषयक याआधीचं लिखाण हे त्या क्षेत्रातल्यांना अधिक सजग करणारं ठरलं आहे. पण हे पुस्तक मात्र ‘नियोगी बुक्स’च्या ‘पायोनिअर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ या चरित्रमालेचा भाग असल्यानं स्वत:ला ‘सामान्य वाचक’ म्हणावणारे वा वरच्या इयत्तांतले- वास्तुरचना क्षेत्राची आवड असलेले विद्यार्थी, नगररचनेचे प्रयत्न इथे होतच नाहीत का असा प्रश्न पडणारे करदाते, यांपैकी प्रत्येकाला काही ना काही देणारं ठरलं आहे.