गावोगावी कावळे मरून पडू लागले आहेत. मिथकांमध्ये ‘अमर’ असणाऱ्या कावळ्यांपासून ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग वाढू लागला आहे. चिऊ-काऊच्या गोष्टीतील ‘कावळ्याची शाळा’ तशी शहरात दिसेनाशी झाली आहे. कावळ्यांची संख्या कमी होत आहे, असे नाही. पण कावळा आवश्यक असतो कारण तो स्वच्छतेस हातभार लावतो. मानवी वस्तीमधील खरकट्यापासून ते मेलेल्या उंदरांपर्यंत सारे तो खातो. शहराबाहेरच्या कचराभूमीवर जाऊन बघा. कावळे सतत घिरट्या घालत असतात. घारी, गिधाडे हेसुद्धा स्वच्छतेसाठी आवश्यकच. उपयोगी प्राणी आणि पक्ष्यांना देवाच्या जवळ नेऊन ठेवण्याची रीत तशी जुनी. मानवी वस्त्यांच्या जवळ राहणारा हा पक्षी धर्मशास्त्रात कमालीचा महत्त्वाचा मानला गेला.
अंतराळात हरवलेल्या सुनीता विल्यम्स ज्या दिवशी पृथ्वीवर परत आल्या, त्या दिवसाची गोष्ट. पैठणमध्ये गोदातीरी घाटावर खूप वेळ वाट पाहूनही पिंडास कावळा काही शिवेना. सारे नातेवाईक धावा करू लागले. ‘जीव अडकला असेल कशात तरी… असं म्हणू लागले. शेवटची इच्छा काय असू शकेल याचे अंदाज बांधले जाऊ लागले. मृत व्यक्तीचा कोणावर अधिक जीव होता का, त्याला कोणाची भीती वाटत होती का, आपल्या माघारी आपल्या पत्नी व मुलाचे काय होईल या शंकेमुळे तो जीव घुटमळत असेल का, शेवटी मृत व्यक्तीच्या भावाने म्हटले, ‘तुझ्या संसारातील सुतळीच्या तुकड्यालासुद्धा हात लावणार नाही. तुझ्या मुलीचे लग्न लावून देईन..’ वगैरे आश्वासन दिल्याची चर्चा सुरू झाली. पण कावळा काही खाली उतरेना. त्या पिंडावर थोडे दही टाकले. कावळा आला त्याने टोचा मारला आणि साऱ्या नातेवाईकांनी हुश्श.. असा सुटकेचा नि:श्वास टाकला. हा हुश्श मानसिकतांमध्ये कसा येतो?
दान केलेलं पिंड कावळ्यानेच का शिवायचं? समजा कबूतर, चिमणी, पोपट या पक्ष्यांनी पिंडाला चोच लावली तर ते आपल्या पितरांपर्यंत का नाही पोहोचणार? कोणी कितीही पापी असो. त्याच्या मुलाबाळांसाठी तो पुण्यात्माच. तो नरकात जाणारच नाही, याची खात्री असते त्यांना. मग तरीही परलोकी गेलेल्या आपल्याच आई-वडिलांना मृत्युछायेशी साधर्म्य बाळगणाऱ्या काळ्या कावळ्यानेच का शिवावे? कावळाच इहलोक आणि परलोकातील वाहक कसा असतो?
मृत्यूचं सावट दिसतं कुठे? एका गूढ, अगम्य वाटचालीत बरोबर असतो तो फक्त अंधार. त्याचा रंग काळा. ही रंगसंगती एवढा एकच आधार आहे, कावळ्याला मृत्यूशी जोडण्याचा. बाकी मग साऱ्या कथा आणि मिथकं. खरंतर मनुष्यवस्तीमध्ये राहणाऱ्या कावळ्याविषयीची काळी प्रतिमा अगदी लहानपणापासून गडद होणारी. ‘एक होती चिमणी, एक होता कावळा. चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं शेणाचं. मोठा पाऊस झाला आणि कावळ्याचं घर वाहून गेलं’ ही गोष्ट आठवली तरी ती काळी नकारात्मक बाजू समोर येते. अशुभ शकुनातील कावळा आदिवासी कथांमध्ये मात्र पृथ्वीच्या निर्मितीमधील वाहक असल्याची एक कथा आहे. संस्कृती कोशात ती नमूद आहे – ‘प्रलयजळातल्या कमळावर महादेव होता. त्याला पृथ्वी निर्माण करायची होती. त्याने आपल्या अमंगळापासून एक कावळा निर्मून त्याला मातीच्या शोधात पाठवले. कावळा उडून एका ठिकाणी बसला. तो नेमका एका खेकड्याच्या आकड्यात सापडला. बऱ्याच दिवसाने भक्ष्य मिळाले आहे, असे खेकडा म्हणाला. पण त्याला कावळ्याने उत्तर दिले, ‘माझ्या बापाने मला तुझ्याकडे मातीसाठी पाठवले आहे. मग कावळा आणि खेकडा मिळून नलराजाकडे गेले. त्याने थोडीशी माती कर्जाऊ दिली. ती घेऊन कावळा महादेवाकडे गेला आणि त्यातून महादेवाने पृथ्वी निर्माण केली. हाच कावळा दहाव्या दिवशी जेव्हा पिंडाला शिवतो तेव्हा मृतात्म्यास गती लाभते अशी आपली समजूत आहे.’ या सगळ्या गोष्टींमध्ये कावळा वाहक असतो अशी समजूत. ही कधीपासून आपण पाळतो काय माहीत? पण अंत्यविधीच्या संस्कारात कावळा शिवला का, हा प्रश्न दु:खद प्रसंगी चर्चेत असतो. या सर्व कर्मकांडाच्या गोष्टी. पण जर कावळा शिवलाच नाही तर आत्मा भटकत राहील का? मुळात असे घडले असते तर युद्धात मृत्यू पावलेल्या लाखो सैनिकांचे आत्मेसुद्धा एकमेकांच्या जिवावर उठले असते. हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर जेव्हा बॉम्बहल्ले झाले होते, तेव्हा मृत झालेल्या ४४ हजार आणि ६० हजार जणांच्या आत्म्यांचे किती तरी तळतळाट हिटलरला लागले असते. पण किल्लारीच्या, भूजच्या भूकंपानंतर मृत झालेल्या आत्म्यांचा तळतळाट कोणाला लागेल काय माहीत? मृत्यूनंतर आपले काय होते, या कल्पनाविलासाला आवश्यक असणाऱ्या कथा आणि मिथकं ही मृत्यूभोवतीच्या बाजारपेठेसाठी रचलेली आहेत. समुद्रमंथनातून निघालेलं अमृत कावळ्याच्या चोचीला लागलं होतं म्हणून त्याची चोच लागली की माणूस स्वर्गात जातो, अशीही धारणा आहे. अशा गोष्टी या आपल्या मनोव्यापारातील मृत्यूच्या भीतीला सकारात्मक बनवतात. महिला रजस्वाच्या वेळी तिला कावळ्याने शिवले आहे, असं लहान मुलांना सांगतात. ते का, याचीही एक कथा आहे. त्याची चिकित्साही करून झाली आहे. घराजवळ कावळा ओरडला तर पाहुणा येतो, तो घरावर बसून ओरडला तर अशुभ काही तरी घडतं अशा अनेक अवैज्ञानिक गोष्टींनी आपले जगणे व्यापले आहे. त्यातूनच कावळ्याला एक डोळा असतो, त्यातून त्याला स्वर्ग आणि नरक दिसतात म्हणे. कावळ्याने सीतेची अभिलाषा धरली म्हणून रामाने त्याचा डोळा फोडला अशीही एक कथा आहे. या सगळ्या कथा चमत्काराला पूरक ठराव्यात म्हणून रचलेल्या.
यातून कावळा शिवला का पिंडाला हा प्रश्न आपण अजून विचारतो आहोत. सश्रद्ध माणसाला या सगळ्या कर्मकांडातील नीतिशास्त्र समजून घेता यायला हवं. मूळ तत्त्व काय, तर आपल्या आई-वडिलांची आठवण ठेवा. त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी जपलेल्या मूल्यांकडेही सजगपणे पाहा. मात्र ही मूल्यव्यवस्था समजून घेण्याऐवजी आपला सारा भार त्यातील रूढ पाळण्याकडे असतो. त्यातून मग पुढे येतात, श्राद्ध-पक्ष. पुढे ज्या पितरांनी आपल्याला जन्माला घातलं आहे, आपल्यावर अतोनात प्रेम करणारे पितर कर्मकांड केलं नाही म्हणून रुसतात, क्रोधित कसे होतात? मग पितृदोष असा शब्दप्रयोग तयार होतो. त्याची एक बाजारपेठ तयार होते. त्यात नारायण नागबळीसारखे प्रकार केले जातात. काळी जादू हा शब्दप्रयोग अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणातही चर्चेत होता. ज्योतिष पाहण्यासाठी आणि त्यांनी सांगितलेल्या पूजांचा आधार घेत फिरणारे नेतृत्व बहरत आहे. अशा काळात नदीकाठी मोठे घाट असणाऱ्या गावांमध्ये याचं एक मोठं अर्थकारण दडलेलं आहे. १४ दिवसांचा दुखवटा त्यानंतरचे पिंडदान केल्यानंतर दरवर्षी श्राद्ध घालणारी मंडळी आहेत. पक्ष पंधरवाड्यात अनेक गोष्टी त्याज्य ठरवल्या जातात. पण श्राद्ध म्हणजे पितरांना संतुष्ट करण्याचा विधी. मूळ शब्द श्रद्धा. आणि त्यातून पुढे आलेला शब्द श्राद्ध. वैदिक वाङ्मयात हे शब्द पहिल्यांदा आले. प्राचीन काळी पिंडपितृयज्ञ असेही श्राद्धास म्हणत. श्राद्धाची परिभाषा, श्राद्धभेद, श्राद्धदिनकृत्ये, श्राद्धकर्ता आणि श्राद्धभोक्ता याचे विधिनिषेध असा मजकूर पोथ्यापुराणात सापडतो. आमश्राद्ध म्हणजे न शिजवलेले अन्न देऊन श्राद्ध करणे, हरिण्यश्राद्ध असाही एक प्रकार यात दिसतो. यात ब्राह्मणास सोने देऊन श्राद्ध करावे असेही सुचविण्यात आले आहे. बाजारपेठ ही अशी सोन्यापर्यंत पोहोचवली जाते. या सगळ्या कर्मकांडाचा प्रभाव देशभर कायम दिसतो. त्यातून कावळा आपल्यासमोर येत राहतो. हे सारे विधी दु:खद प्रसंगात घडतात. मृत्यूचं गूढत्व उकलावं म्हणून हे सारे घडत नाही तर त्याच्याविषयी असणारं अगम्य वाढतं. अलीकडच्या काळात यात बरेच बदल घडत आहेत. तसे हे बदल एकेक कृती वजा करत जाणारे आणि सकारात्मक असल्याचेही दिसू लागले आहेत. आता अनेकजण अवयव दान करू लागले आहेत. आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींना दान करण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणी भुकेला राहू नये असा माणसूपणाचा भावही वाढला आहे. हे सारे ‘आत्मा’ शब्दाच्या भोवती फिरणारे. हिंदू धर्मात शरीर सोडून गेलेल्या आत्म्यास पुनर्जन्म लाभावा यासाठी कावळा हे वाहक. त्रिशंकू अवस्थेत लटकलेल्या या आत्म्याला स्वर्गात किंवा नरकात पोहोचविणारा पक्षी. खरंतर कावळ्याचं वजन २५० ते ५०० ग्रॅमपर्यंतचे. तसे पाच प्रकारचे कावळे भारत आणि भोवतालच्या देशांत आढळतात. त्यातल्या त्यात डोमकावळा जरा मोठा. काळाकुळकुळीत. मानेच्या भोवती असणारा राखाडी भागही त्याला नसतो. वजन थोडेसे जास्त असते. हा मनुष्यवस्ती व जंगल या दोन्हीच्या मध्ये राहतो. एक रावणकावळाही असतो म्हणे. ५८ सें.मी. लांबीचा. हा सिंध, बलुचिस्तानात दिसतो. हा खूप वर्षे जगतो. साधारणत: २८ ते ३० वर्षांपर्यंत कावळे जगतात. पण एका पक्ष्याला एवढ्या रूढीत गुंतवून ठेवले आहे की, तो आता घाटाघाटावर दिसतो.
आत्मा नक्की कसा, तो कसा बनतो, तो अस्तित्वात असतो का, याची चर्चा हिंदू, जैन, बौद्ध धर्मग्रंथात केली आहे. आत्मा असतो असे म्हणणाऱ्यांचा एक गट, नसतो म्हणणाऱ्यांचा दुसरा. एक तिसराही विचार आहे. दु:खाचे मूळ हे तृष्णेत आहे, असं सांगणारी बौद्ध उपासना पद्धती. अन्य कोणत्याही धर्मात कावळा तसा मध्यवर्ती नाही. हिंदूंमध्ये मात्र कावळा असतोच. त्याचे अस्तित्व मृत्यूनंतरच्या विधीशी जोडलेले. काळ जेव्हा अचानक झडप घालतो ना, दिसणारा रंग नुसता आठवला तरी कावळाच का, हे समजेल. पण आता विज्ञान युगात कावळा शिवला नाही, याचं वाईट वाटून घेण्यापेक्षा या पक्ष्यांविषयीच्या जाणिवा बदलायला हव्यात.