महेश सरलष्कर

भाजपच्या ‘ट्रोलिंग’ला प्रत्युत्तर कसे द्यायचे आणि कधी द्यायचे नाही हा खेळ माहीत झालेली काँग्रेस आणि हिंदूत्वाचा खेळ भाजपवरच उलटवू पाहणारा ‘आप’ या दोन्ही पक्षांवर येत्या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजप मात करीलही, पण या पक्षाच्या राजकारणासाठी खरे आव्हान पुढे आहे..

भाजपने काँग्रेसकडे लक्ष देणे सोडून दिले आहे की, भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या ट्रोलचा काँग्रेसवर फारसा प्रभाव पडेनासा झाला आहे, असा प्रश्न पडावा इतका भाजप सध्या शांत झाला आहे. कदाचित दिवाळीच्या दिवसांमध्ये अनेक जण सुट्टी घेतात, तशी भाजपनेही विश्रांती घेतली असावी. तीन दिवसांच्या मध्यंतरानंतर काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा तेलंगणामधून पुन्हा सुरू झालेली आहे. ही यात्रा तेलंगणातील महत्त्वाचा टप्पा पार करत आहे. यात्रेला आंध्र प्रदेशपेक्षा तेलंगणामध्ये अपेक्षेप्रमाणे मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. तसा तो मिळेल याची खात्री असल्याने आपल्या मार्गात थोडा बदल करून आता ही यात्रा हैदराबाद शहरातूनही जाणार आहे. जिथे जिथे काँग्रेस पक्षाची ताकद टिकून आहे वा जिथे जिथे हा पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, तिथे ‘भारत जोडो’ यात्रेची ताकद लोकांना पाहायला मिळू लागली आहे. कर्नाटकनंतर आता तेलंगणामध्ये, त्यानंतर महाराष्ट्रातही यात्रेला गर्दी झालेली दिसू शकेल. ही ‘काँग्रेसवाल्यांनी जमवलेली गर्दी’ आहे असे कुणी म्हटले तरी, यात्रेची वाट बघणाऱ्या सगळय़ांनाच ट्रकमध्ये भरून आणलेले नाही, हे यात्रेत सहभागी झालेल्या कोणालाही समजू शकेल. कितीही प्रयत्न केला तरी ही उत्स्फूर्त गर्दी भाजपला रोखता आलेली नाही.

‘भारत जोडो’ यात्रा सुरू झाली तेव्हा भाजपने काँग्रेस नेत्यांची खिल्ली उडवली होती. राहुल गांधींचा शर्ट किती रुपयांचा, त्यांच्या बुटांची किंमत, मग त्यांची वाढलेली दाढी वगैरे गोष्टींची हेटाळणी केली गेली. अगदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील त्यांच्या शर्ट वगैरेचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला. पण, नंतर ही टीकादेखील बोथट होऊन गेली. ‘भारत जोडो’ यात्रेवर भाजप टीका करत होता, तेव्हा काँग्रेसने भाजपकडे दुर्लक्ष केले. पक्षाचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांना पत्रकारांनी भाजपने केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देण्याचा आग्रह सातत्याने केला; पण रमेश यांनी शर्ट-चड्डी असल्या कुठल्या गोष्टींवर काँग्रेस प्रतिक्रिया देणार नाही, असे सांगून संभाव्य वाद आधीच मिटवून टाकला. प्रक्षोभक भाष्य केले की, समोरची व्यक्ती संतापाच्या भरात प्रत्युत्तर देते, अनेकदा त्याचा लाभ दुसऱ्याच कोणाला तरी होत असतो. काँग्रेसने भाजपच्या टीकेला वा आरोपांना उत्तर दिलेच नाही. ‘भारत जोडो’ यात्रेत कोणीही भाजपच्या नावाचा उल्लेखही करत नाही, इतके काँग्रेसने भाजपकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळेच, यात्रा उत्तरेत आल्यावर भाजप कसा प्रतिसाद देईल हे पाहण्याजोगे असेल.

आपचा आकस्मिक मारा

काँग्रेसवर यापुढे तोफा डागून काही फरक पडत नाही, उलट आम आदमी पक्षाकडून लघुपल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मारा सहन करावा लागत आहे, अशा विचित्र कोंडीत भाजप अडकलेला दिसू लागला आहे. भाजपने काँग्रेसला तर गलितगात्रच करून टाकले. त्यांचे नेते पक्षात आणले. मध्य प्रदेशात काँग्रेसला सरकार गमवावे लागले. राजस्थानमध्ये काँग्रेसअंतर्गत बंडाला अप्रत्यक्ष बळ दिले. गांधी कुटुंबातील सदस्यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू केली. गेल्या आठ वर्षांमध्ये भाजपने विरोधकांची अनेकदा कोंडी केली; पण काँग्रेस आणि ‘आप’पुढे चक्रावून जाण्याची वेळ बहुधा पहिल्यांदाच भाजपवर ओढवली आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्येही विधानसभेच्या निवडणुका होतील. दोन्ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता असून भाजपला ती टिकवताही येईल. पण, त्यानिमित्ताने ‘आप’ने भाजपच्या हिंदूत्वाच्या मक्तेदारीला दिलेल्या आव्हानाला कसे प्रत्युत्तर द्यायचे, हा नवा प्रश्न भाजपसमोर निर्माण झालेला आहे.

भाजपच्या हिंदूत्वाचा मुद्दा आक्रमकपणे निवडणूक प्रचारात मांडण्यामागे ‘आप’चा मुख्य उद्देश भाजपचा राजकीय अवकाश संकुचित करण्याचा नसून काँग्रेसची जागा घेण्याचा आहे. भाजपसमोर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस नसून ‘आप’ असल्याचे या पक्षाचे सर्वेसर्वा अरिवद केजरीवाल यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितलेले आहे. भाजपला पर्याय म्हणून मतदारांनी काँग्रेसपेक्षा ‘आप’चा अधिक विचार करावा, असे केजरीवाल प्रामुख्याने गुजरातमधील निवडणूक प्रचारात आवाहन करत आहेत. काँग्रेसची जागा व्यापून टाकायची असेल तर ‘भाजपसारखा दुसरा पक्ष’ कोणता असू शकेल हे लोकांच्या मनात ठसवावे लागेल, एवढे केजरीवाल यांना अचूक माहीत आहे. म्हणूनच गुजरात निवडणूक तोंडावर आली असताना केजरीवाल यांनी चलनी नोटांवर देव-देवतांच्या चित्रांचा मुद्दा अलगदपणे प्रचारात पेरला. केजरीवाल यांचा राजकीय उद्देश काहीही असो, त्याची थेट झळ भाजपला बसू लागली आहे. त्यामुळे भाजपला काँग्रेस सोडून ‘आप’कडे लक्ष द्यावे लागत आहे.

दोन्ही राज्यांत भाजपच!

काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा, आम आदमी पक्षाचे भाजपच्या हिंदूत्वाचा मुद्दा खेचून घेण्याचा प्रयत्न असा भाजपवर दुहेरी हल्ला होताना दिसतो. पुढील वर्षी कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेसकडून कितपत आव्हान दिले जाईल, याचा अंदाज ‘भारत जोडो’ यात्रा उत्तरेतील प्रतिसादावरही अवलंबून असेल. पण आत्ता हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये भाजपला कदाचित सत्ता राखता येऊ शकेल, त्याचे प्रमुख कारण दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची कमकुवत असलेली संघटना. दोन्ही राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या थेट लढाईत ‘आप’ने उडी घेतली असली तरी, ग्रामीण भागांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व अजूनही पाहायला मिळते. हिमाचल प्रदेशमध्ये तर ‘आप’ने स्वत:च निवडणूक दुसऱ्या क्रमांकावर टाकलेली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पंतप्रधान मोदींपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे दौरे होत असताना ‘आप’च्या नेत्यांचा प्रचाराचा भर गुजरातमध्ये जास्त असल्याचे दिसते. त्यामुळे हिमाचल प्रदेशात प्रथा मोडून सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न भाजपला करता येऊ शकेल. गुजरातमध्ये ‘भारत जोडो’ यात्रा जाणारच नाही, तिथे हार्दिक पटेलसारखे काँग्रेस नेते भाजपमध्ये निघून गेले आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसकडे नेतृत्व करेल असा नवा चेहरा आणि मजबूत संघटना नसल्यामुळे भाजपला सत्ता राखणे सोपे जाईल. पण, अन्य आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आणि दीड वर्षांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मैदान मोकळे मिळण्याची शक्यता नाही. हिमाचल प्रदेश आणि गुजरात जिंकल्यानंतरही भाजपसाठी गेल्या आठ वर्षांतील हा पहिलाच कसोटीचा काळ म्हणावा लागेल.

अखेर मोदीच..

निवडणूक जिंकण्याचे भाजपकडे तीन फंडे आहेत. मोदींची लोकप्रियता, केंद्रीय योजनांचा पाठपुरावा आणि भाजपची विरोधकांना ट्रोल करण्याची क्षमता. भाजपच्या ट्रोिलगला प्रत्युत्तर दिले जाऊ लागले आहे. विरोधकांना भाजपच्या ट्रोलवाल्यांना निष्प्रभ करता आलेले नाही. पण, हा खेळ कसा खेळला जातो, हे विरोधकांच्या लक्षात आलेले आहे. आत्तापर्यंत काँग्रेसला हा खेळ समजलेला नव्हता, ‘भारत जोडो’ यात्रेपासून काँग्रेसने भाजपच्या ट्रोलना जशास तसे उत्तर देणे सुरू केले आहे वा पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. केंद्रीय योजनांचा लाभ उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये भाजपला मिळाला होता, इतर राज्यांमध्येही या योजना पोहोचल्या की नाही, याची मतदारसंघनिहाय चाचपणी केली जात आहे. जिथे योजनांचा लाभ मिळाला नसेल वा मिळूनही मतदार भाजपकडे आकर्षित होत नसतील तर, काय करायचे यावर बराच काळ भाजपमध्ये खल केला जात आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर देशातील राजकीय वातावरणात बदल झालेला आहे. विरोधक थेट मोदींना लक्ष्य न बनवता, मोदी सरकारच्या धोरणावर टीका करू लागले आहेत. महागाई, बेरोजगारी या मुद्दय़ांवर सातत्याने बोलले जात आहे. या लोकांशी निगडित – ‘खऱ्या’ मुद्दय़ांचा थोडाफार परिणाम लोकसभा निवडणुकीत झाला तरी, भाजपला जागा गमवाव्या लागू शकतात. मग, भाजपकडे एकच हुकमी एक्का असेल : पंतप्रधान मोदी. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरातपासून पश्चिम बंगालपर्यंत राज्या-राज्यांमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांऐवजी मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जात असल्याचे दिसतेच आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींचे नेतृत्व असूनही २०१९ मधील प्रचंड बहुमत मिळण्यासाठी भाजपला ‘मिशन १४४’सारख्या नव्या क्लृप्त्या कराव्या लागत असतील तर, २०२४ ची लोकसभा निवडणूक पाच वर्षांपूर्वीइतकी सोपी नसेल, असे दिसते.

mahesh.sarlashkar@expressindia.com

Story img Loader