केशव उपाध्ये (मुख्य प्रवक्ता, भाजप महाराष्ट्र)
आपल्याप्रमाणे प्रकाश आंबेडकरांनीही काँग्रेस आणि शरद पवारांमागे स्वाभिमान गुंडाळून फरफटत यावे, अशी उद्धव ठाकरेंची अपेक्षा असेल. ही अपेक्षा पूर्ण करण्यास प्रकाश आंबेडकरांनी नकार दिला. आंबेडकरी चळवळ काँग्रेसच्या दावणीला बांधायची नाही, हा भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचा वज्रनिर्धार होता…
श्रीमान उद्धवराव ठाकरे यांनी आपल्या हुकमी खंजीर अस्त्राचा वापर पुन्हा केला आहे. यावेळी त्यांच्या खंजिराचे लक्ष्य होते प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी.
त्याआधीच्या घडामोडी अशा की, आपल्याविरोधात अकोल्यामधून उमेदवार देण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत मांडला होता, असे पत्रकार परिषदेत जाहीर करून प्रकाश आंबेडकरांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. ‘‘संजय राऊत तुम्ही खोटं बोलत आहात,’’ असे थेट सुनावणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना उत्तर देण्याचे धैर्य उद्धव ठाकरे, संजय राऊत या दोघांनीही दाखवले नाही. या घटनेतून उद्धव ठाकरेंच्या खंजीर कल्लोळाचा आणखी एक प्रयोग राज्याच्या राजकीय पटलावर सादर झाला. या ‘संगीत खंजीर कल्लोळ’ नाट्याचा पहिला प्रयोग अद्याप विसरला गेलेला नसताना त्यांनी हे धारिष्ट्य केले आहे.
हेही वाचा >>> चिनी राज्यकर्त्यांविरुद्ध अफवांचा उच्छाद
दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना राजकारणात टिकण्यासाठी आधाराची गरज भासू लागली. याच गरजेपोटी त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीपुढे सहकार्याचा हात पुढे केला. आंबेडकरांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांच्या बरोबरची आघाडी कायम ठेवण्याला प्राधान्य दिले. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांनी जागा वाटपात आमची बाजू काँग्रेस-राष्ट्रवादीला पटवून द्यावी, अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी वारंवार घेतली होती. मात्र जागा वाटपासाठी बैठकांची लगबग सुरू झाल्यावर उद्धव ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांपेक्षा काँग्रेस आणि शरद पवार महत्त्वाचे वाटू लागले. काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जागा वाटपामध्ये आपला योग्य तो सन्मान राखला जात नाही, हे लक्षात आल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी याबद्दलचा संताप जाहीरपणे व्यक्त केला. हा संताप व्यक्त करताना प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंचे सल्लागार संजय राऊत यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. ‘संजय राऊतांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसला,’ अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी आपला उद्वेग जाहीरपणे व्यक्त केला.
विश्वासार्हता राखली पाहिजे…
काँग्रेसने आंबेडकरी चळवळीचा कायमच अपमान केला आहे. कोट्यवधी उपेक्षितांची प्रेरणा असणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेस नेतृत्वाने लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभूत केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसवर अनेकदा कठोर टीकेचे प्रहार केले होते. आंबेडकरी चळवळ काँग्रेसच्या दावणीला बांधायची नाही, हा डॉ.बाबासाहेबांचा वज्रनिर्धार होता. हा निर्धार त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत स्वाभिमानाने जपला. जागा वाटपामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे आम्ही लाचारी पत्करणार नाही, असे प्रकाश आंबेडकरांनी अनेकदा सांगितले. आपल्याप्रमाणे आंबेडकरांनीही काँग्रेस आणि शरद पवारांमागे स्वाभिमान गुंडाळून फरफटत यावे, अशी उद्धव ठाकरेंची अपेक्षा असेल. ही अपेक्षा पूर्ण करण्यास प्रकाश आंबेडकरांनी नकार दिला. राजकारणात दीर्घकाळ टिकायचे असेल तर आपली विश्वासार्हता राखली पाहिजे, हा राजकारणाचा प्राथमिक नियमही उद्धव ठाकरेंना मान्य नसावा. त्यामुळेच त्यांनी प्रकाश आंबेडकरांपेक्षा काँग्रेस आणि शरद पवारांना प्राधान्य दिले असावे.
२०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या साथीने लढविणाऱ्या उद्धवरावांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर मतांचा जोगवा मागितला होता. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने १६१ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. निकाल जाहीर होत असताना उद्धवरावांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेतृत्वाने खुणवाखुणवी चालू केली होती. ‘भारतीय जनता पार्टीबरोबरची युती तोडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनविण्यासाठी पाठिंबा देतो,’ या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमिषाला उद्धवराव सहजी बळी पडले. आपल्याला स्वबळावर लढून मुख्यमंत्रीपद मिळणार नाही, याची खात्री असल्यामुळे त्यांनी ‘वर्षा’प्राप्तीसाठी भाजप नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला. भाजपबरोबरची युती तोडण्यास एकनाथ शिंदे यांच्यासारखे अनेक सहकारी विरोध करीत असताना त्याकडेही उद्धवरावांनी आणि त्यांच्या चिरंजीवांनी दुर्लक्ष केले. अनेकदा विनंती करूनही उद्धवराव काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरची आघाडी तोडण्यास तयार नाहीत, हे पाहून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच्या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला. भारतीय जनता पार्टी नेतृत्वाचा विश्वासघात करून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद मिळवले. मात्र त्याबदल्यात काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमागे फरपटत जाण्याची नामुष्की त्यांच्यावर आली.
हिंदुत्वाची विचारसरणीही विसरले?
वंदनीय बाळासाहेबांनी संपूर्ण हयातीत ताठ मानेने राजकारण केले. २००७ आणि २०१२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत वंदनीय बाळासाहेबांनी काँग्रेसला जरूर पाठिंबा दिला. मात्र त्यांनी हिंदुत्वाचा त्याग केला नाही. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्या यात्रेचा शिवाजी पार्कवर नुकताच समारोप झाला. या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंना, ‘माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो’, हे शब्द उच्चारण्याची हिंमतही झाली नाही. वंदनीय बाळासाहेबांच्या प्रत्येक सभेची सुरुवात याच शब्दांनी आणि त्याला मिळणाऱ्या टाळ्या-शिट्ट्यांच्या प्रचंड प्रतिसादाने होत असे. बाळासाहेबांच्या त्या शब्दांनी उपस्थित जनसागर मंत्रमुग्ध होत असे. उद्धवरावांना आता काँग्रेसची मर्जी राखायची असल्यामुळे त्यांना हिंदुत्वासारखा शब्द उच्चारण्याची परवानगी नाही, हे पाहून वंदनीय बाळासाहेबांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील, याची कल्पनाही करवत नाही.
भारतीय जनता पार्टीशी एकट्याने लढण्याची आपली कुवत नाही, हे उद्धव ठाकरेंना आता लक्षात आले आहे. बुडत्याला काडीचा आधार, म्हणून ते काँग्रेस आणि शरद पवारांचा टेकू घेऊन उभे आहेत. या घडामोडीत आपला स्वाभिमान, हिंदुत्वाची विचारसरणी खुंटीला गुंडाळून ठेवताना उद्धव ठाकरेंना वंदनीय बाळासाहेबांनाही विसरावे लागले आहे. काँग्रेस आणि शरद पवारांची मर्जी राखत आपले उरले-सुरले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करणे, हेच उद्धव ठाकरेंचे प्राक्तन आहे.