पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका आणि इजिप्त दौरा भलताच यशस्वी झाला असे म्हणायला हरकत नाही. विशेषत: अमेरिका दौऱ्यादरम्यान काही महत्त्वाचे करार आणि वाटाघाटी झाल्या. अमेरिकी काँग्रेससमोर दुसऱ्यांदा भाषण करण्याचा दुर्मीळ मान मोदी यांना मिळाला. काही महत्त्वाच्या सहकार्य गटांमध्ये अमेरिकेने भारताला सामावून घेण्याच्या करारांवर शिक्कामोर्तब झाले. विद्यमान पंतप्रधानांसाठी दुर्मीळात दुर्मीळ अशा पत्रकार प्रश्नांचाही अंतर्भाव या दौऱ्यात करण्यात आला. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल यांनी एखाद्या जवळच्या मित्रासारखे मोदींना वागवले आणि अमेरिकेच्या जुन्या सामरिक मित्रासारखा त्यांचा मानही राखला. भारत-अमेरिका संबंधांना या दौऱ्याने नवा आयाम नक्कीच प्रदान केला. इतके सारे उत्तम बेतून-जुळून येत असताना, देशातील सत्तारूढ भाजप नेत्यांनी मात्र माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केलेल्या काही मतांविषयी आक्रमक आणि आक्रस्ताळी भूमिका घेणे काहीसे अस्थानी ठरते. पाश्चिमात्य विचारवंत आणि माध्यमे नेहमीच भारतासारख्या विकसनशील लोकशाहीविषयी भाष्य, टिप्पणी करतात. परिपक्व शब्दांमध्ये त्यांचा प्रतिवाद करणे किंवा काहीही न बोलणे ही खरी सहिष्णुता. त्याऐवजी अनेकदा आपल्या प्रतिक्रियांमधूनच असहिष्णुतेचे दर्शन घडते. शिवाय संदर्भ आणि सत्य समजून न घेताच संबंधितांवर एकसाथ तुटून पडण्याची झुंड- वैचारिकताही टाळली तर बरे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यानिमित्ताने ओबामा नेमके काय आणि कशासंदर्भात बोलले, याची उजळणी आवश्यक. धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्याकांचे हक्क अबाधित राहिले नाहीत, तर भारताचे ऐक्य धोक्यात येऊ शकते, असा इशारा ओबामा यांनी ‘सीएनएन’ वाहिनीच्या ज्येष्ठ पत्रकार ख्रिस्तियान आमनपोर यांच्याशी वार्तालापादरम्यान दिला. परंतु त्यांना प्रश्न विचारण्यात आला तो संदर्भ वेगळा होता. ‘‘बायडेन हे जगातील लोकशाही रक्षणाविषयी आग्रही असतील आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना ‘हुकूमशहा’ म्हणण्यावर ठाम राहणार असतील, तर सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेले मोदी यांच्याशी त्यांनी बोलायला हवे की नको? कारण मोदी हे काही प्रमाणात हुकूमशाही बाजाचे किंवा असहिष्णू नेते म्हणून ओळखले जातात,’’ असा आमनपोर यांचा प्रश्न होता. त्यावर उत्तर देताना, हा प्रश्न गुंतागुंतीचा असल्याचे ओबामा यांनी सुरुवातीलाच कबूल केले. बायडेन यांनी मोदींशी बोलले पाहिजे असे सांगताना, ओबामा यांनी धार्मिक अल्पसंख्याकांविषयी मतप्रदर्शन केले. मी मोदींना चांगला ओळखतो आणि मुस्लीम भारताचे हितसंबंध हिंदू भारतीयांशी संबद्ध आहेत, असे मी त्यांना सांगेन या ओबामांच्या विधानामध्ये कुठेही मोदींविषयी किंवा भारताविषयी निर्भर्त्सनात्मक मतप्रदर्शन आढळत नाही. मोदींच्या दौऱ्याच्या वेळी अमेरिकी काँग्रेसच्या डझनावरी सदस्यांनीही भारतातील धार्मिक असहिष्णुतेविषयी मुद्दा मोदींकडे उपस्थित करावा, अशी मागणी बायडेन यांच्याकडे केली होती.

बायडेन यांनी त्याविषयी जाहीरपणे कोणतेही भाष्य केलेले नाही. उलट मोदी यांच्यावर बायडेन प्रशासन आणि विरोधी रिपब्लिकन पक्षांतील काहींनी स्तुतिसुमनेच उधळली. पत्रकार परिषदेत दोन मोजके प्रश्न विचारण्यात आले, त्याची उत्तरेही मोदींनी विनाअवघडता दिलीच की. इतके सगळे झाल्यानंतर आपल्याकडे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा, भाजपचे उपाध्यक्ष जय पांडा आणि निर्मला सीतारामन व राजनाथ सिंह यांनी पाठोपाठच्या दिवसांमध्ये ओबामांवर टीका केली. आसामच्या सर्मा यांनी त्यांच्या बौद्धिक पातळीशी इमान राखत केलेली दर्जाहीन टीका बरीचशी अपेक्षित. परंतु सीतारामन यांनी ओबामांच्या ‘मुस्लीम’ राष्ट्रांवरील बॉम्बफेकीचा उल्लेख केला. त्यांच्यासारख्या विचारी राजकारणी व्यक्तीकडून अधिक सखोल अभ्यासाची अपेक्षा आहे. त्यांनी उल्लेख केला ती  सहा मुस्लीम राष्ट्रे म्हणजे सीरिया, इराक, अफगाणिस्तान, लिबिया, येमेन आणि पाकिस्तान! या कारवाया सुरू असताना या देशांच्या मुस्लीम असण्याविषयी स्मरण आपण करून दिले नव्हते. दुसरी बाब म्हणजे, अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन हे त्या वेळी उपाध्यक्ष होते. मग सीतारामन यांच्या टीकेचा रोख त्यांच्याकडेही होता का? ओबामांना मोदी घनिष्ठ मित्र मानतात. आम्ही एकेरी नावांनी परस्परांना संबोधतो, असे मोदींनीच म्हटले आहे. किमान या व्यक्तिगत मैत्रीला स्मरून तरी ओबामांचा प्रतिवाद करण्याची जबाबदारी सीतारामन प्रभृतींनी मोदींवरच सोडायला हवी होती. २०१४ ते २०१६ या काळात मोदी आणि ओबामा परस्परांना चार वेळा भेटले. ओबामा यांनी २७ जानेवारी २०१५ रोजी दिल्लीत केलेल्या भाषणातही मोदींना धार्मिक एकजुटीकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला होताच. त्या वेळी ‘मित्रा’चा सल्ला झोंबला नाही, मग आताच तो का बरे झोंबू लागला?

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leaders aggressive against barack obama for criticizing narendra modi during us visit zws