महेश सरलष्कर

मोदींच्या नेतृत्वाची जादू, शहांचे संघटनात्मक कौशल्य, ‘आप’मुळे झालेली मतविभागणी एवढेच ऐतिहासिक विजयाचे कारण असते तर, भाजपचे कौतुक करता आले असते. पण संपूर्ण निवडणुकीत गायब झालेल्या काँग्रेसकडे आता तरी लक्ष दिले पाहिजे.

shetkari kamgar paksh break in alibaug
मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
kalyan mcoca act news in marathi
कल्याणमधील माजी भाजप नगरसेवकासह पाच जणांची मोक्का आरोपातून मुक्तता, व्यापाऱ्यावर हल्ला केल्याचा झाला होता आरोप
nashik BJP rebels girish mahajan
बंडखोरांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश अवघड
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
cm devendra fadnavis address party workers at bjp state convention
सत्तेमुळे सुखासीन झाल्यास जनतेशी द्रोह ठरेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परखड मतप्रदर्शन
devendra fadnavis sanjay raut
“संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने जागा जिंकण्याचे सगळे विक्रम मोडले आहेत. १८२ जागांपैकी १५३ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. २००२ मध्ये मोदींनी १२७ जागा जिंकल्या होत्या, १९८५ मध्ये माधवसिंह सोळंकींनी १४९ जागा जिंकल्या होत्या. आता भूपेंद्र पटेल यांनी १५३ जागा जिंकल्या आहेत. मोदी आणि सोळंकी या दोघांनी स्वत:च्या कर्तृत्वावर यश मिळवले होते. भूपेंद्र पटेलांचे यश कोणामुळे हे मोदींनी दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयातील भाषणात सांगितले आहे. ‘भूपेंद्रसाठी नरेंद्रने कष्ट घेतले’, असे मोदी म्हणाले. पण, या यशामध्ये मोदी काँग्रेसचे नाव घ्यायला विसरले असे दिसते. खरेतर या विजयात काँग्रेसच्या नाकर्तेपणाचा वाटा मोठा आहे.

काँग्रेसमधील विश्लेषकांनी भाजपच्या ऐतिहासिक विजयाला आणि काँग्रेसच्या दारुण पराभवाला आम आदमी पक्षाला (आप) जबाबदार धरले आहे. पण, त्यांचे विश्लेषण पूर्णसत्य नव्हे. गुजरातमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली असती तर, मतांचे विभाजन झाले नसते हे खरे. त्यामुळे कदाचित काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या असत्या आणि भाजपला ऐतिहासिक विजयाला मुकावे लागले असते, हेही खरे. पण, मतांच्या विभाजनामध्ये भाजपची मते ‘आप’कडे गेलेली नाहीत. उलट, गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा भाजपची मते तीन टक्क्यांनी वाढलेली आहेत आणि ही सगळी मते काँग्रेसकडून मिळालेली आहेत. एखाद्या पक्षाच्या मतांमध्ये दोन-तीन टक्क्यांची वाढ झाली तर, मिळणाऱ्या जागांमध्येही मोठी वाढ होत असते. गेल्या वेळी शतकही (९९) पार करू न शकणाऱ्या भाजपने या वेळी दीडशतकी खेळ केला आहे. मोदी-शहांनी अचूक पूर्वनियोजन केल्याचे फळ गुजरातमध्ये मिळाले, असे भाजपच्या विश्लेषकांचे म्हणणे आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्र्यांसह अख्खे मंत्रिमंडळ बदलण्यात आले. प्रदेशाध्यक्ष बदलून सी. आर. पाटील यांच्याकडे संघटनेची जबाबदारी दिली गेली. मोदी-शहा आणि पाटील या तिघांनी मिळून बुथ स्तरापर्यंत नियोजन केले. उमेदवार बदलले, अखेरच्या टप्प्यात प्रचाराची दिशाही बदलली. भाजपने संघटनात्मक कौशल्यावर जबरदस्त विजय मिळवला हेही खरे. पण, भाजपला दीडशेहून अधिक जागा मिळतील असे पक्षांतर्गतही कोणाला वाटले नव्हते. १४० जागांपर्यंत मजल जाईल असा अंदाज होता. भाजपविरोधात काँग्रेसने लढाई लढली नसल्याने भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले आहे. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत पराभव होणार हे भाजपला माहीत होते, तरीही पक्षाने योगी आदित्यनाथ, हिमंत बिस्वा-शर्मा हे हुकमी एक्के प्रचारात उतरवले. अपेक्षा नसतानाही १०० प्रभाग जिंकले. ही निवडणूक एकतर्फी होऊ दिली नाही. गुजरातमध्ये काँग्रेसने संघर्ष न करता भाजपसाठी वाट मोकळी करून दिली, असे म्हणावे लागते. गुजरातमध्ये झालेल्या एकतर्फी निवडणुकीसाठी काँग्रेसला जबाबदार धरता येऊ शकते.

काँग्रेसने २०१७ मध्ये गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात आक्रमक प्रचार केला होता. हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली पाटीदार समाजाने आंदोलन केले होते. अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवाणी या दोन तरुण आणि धडाडीच्या नेत्यांनी ओबीसी-दलित समाजाच्या हिताच्या राजकारणाला प्राधान्य दिले होते. तिघेही भाजपविरोधी आंदोलनातील प्रमुख चेहरे होते. पण, योग्य वेळी भाजपने त्यांचे आंदोलन मोडून काढले. हार्दिक आणि अल्पेश दोघेही भाजपमध्ये गेले. तर, काँग्रेसने आपला पुरेसा उपयोगही करून घेतला नाही, ही तक्रार जिग्नेश मेवाणी यांनी जाहीरपणे केली. काँग्रेसकडून सातत्याने घरोघरी जाऊन थेट प्रचार करत असल्याचे सांगितले गेले. काँग्रेसने एकाही बडय़ा नेत्याला प्रचाराला बोलावले नाही. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेतून वेळ काढून केवळ दोन प्रचारसभा घेतल्या. प्रियंका गांधी-वाड्रा यांनी हिमाचल प्रदेशवर लक्ष केंद्रित केले होते. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे गुजरातचे प्रभारी असले तरी, त्यांचे लक्ष सचिन पायलट यांच्या विरोधी कारवायांकडे अधिक होते. गेहलोत यांनी गुजरातमधील काँग्रेसच्या हितापेक्षा मुख्यमंत्रीपद टिकवण्याला प्राधान्य दिले होते. या वेळी भाजपविरोधात लढण्यासाठी काँग्रेसचे अस्तित्वही जाणवत नसल्याने नाइलाजाने मतदारांनी ‘आप’ला पसंत केले.

गुजरातमध्ये भाजपला ५० टक्क्यांहून अधिक मते कधीही मिळवता आली नाहीत. हे पाहिले तर निम्मे मतदार तरी भाजपविरोधी होते, त्यांनी या वेळीही भाजपविरोधात मतदान केलेले आहे. पण, त्यातील काही मतदारांनी ‘आप’चा पर्याय निवडला. भाजपविरोधातील मतदारांनी काँग्रेसला का अव्हेरले, याचे विश्लेषण काँग्रेसमधील तज्ज्ञांनी केलेले नाही. काँग्रेसला मिळणाऱ्या मतांमध्ये वा भाजपविरोधातील मतांमध्ये विभाजन झाल्याचा लाभ भाजपने घेतला असला तरी, हे मतविभाजन का झाले, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या विभाजनाला ‘आप’ला जबाबदार धरल्यामुळे काँग्रेसचे अपयश कमी होत नाही. काँग्रेसची तीन टक्के मते भाजपला तर, १३ टक्के मते ‘आप’ला मिळाली आहेत. गुजरातमध्ये लोक उघडपणे भाजपविरोधात बोलत होते. त्यांच्यासाठी काँग्रेस आणि आप हे दोन पर्याय उभे राहिले. पूर्वीप्रमाणे काँग्रेसचा पर्याय मतदारांनी निवडला नाही. आदिवासी भागांतील २७ मतदारसंघांतही काँग्रेसला वर्चस्व टिकवता आले नाही. गुजरातमधील राज्य सरकार केंद्रातून चालवले जाते, इथे प्रशासन दिल्लीचे आदेश मानते असा आरोप केला गेला, पण राज्य सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात काँग्रेसने तीव्र आंदोलन केल्याचे दिसले नाही. मोरबी पुलाच्या दुर्घटनेवेळी राजकारण करणे योग्य नसल्याची बाळबोध भूमिका काँग्रेसने घेतली होती. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषींविरोधात कारवाई झाली पाहिजे, यासाठी आंदोलन करणे गैर नव्हते. काँग्रेसला लोकांनी नेमून दिलेली प्रमुख विरोधी पक्षाची जबाबदारी सांभाळता आली नाही. हिमाचल प्रदेशमध्ये विजय मिळवल्याचा आनंद काँग्रेसकडून व्यक्त होणे अपेक्षित होते, पण भाजप आणि काँग्रेसच्या मतांमध्ये एक टक्क्याचाही फरक नाही! दिल्लीमध्ये महापालिका निवडणुकीत काँग्रेसला फक्त नऊ प्रभागांमध्ये विजय मिळवता आला, त्यातही पाच प्रभाग मुस्लीमबहुल भागांतील आहेत. अन्य प्रभागांतील मतदारांनी ‘आप’ वा भाजपला मते दिली.

गुजरातमध्ये मोदींची जादू कायम असल्याचे भाजपने मिळवलेल्या विजयामुळे म्हणावे लागते, पण देशभर मोदींचा करिश्मा भाजपला यश मिळवून देईल, असे ठामपणे सांगता येत नाही. तसे असते तर, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला तिथल्या मतदारांचा ‘रिवाज’ बदलता आला असता. हिमाचल प्रदेशमध्ये मतदार दर पाच वर्षांनी सत्तेच्या चाव्या विरोधी पक्षाच्या हातात देतात. त्यामुळे आलटून-पालटून भाजप आणि काँग्रेसला सत्ता मिळत राहिली. या वेळी भाजपने हा ‘रिवाज’ बदलण्याचे ठरवले होते. ‘राज नही रिवाज बदलो’, असा नारा दिला होता. मग, मोदींच्या नेतृत्वाकडे पाहून हिमाचल प्रदेशच्या मतदारांनी भाजपला सलग दुसऱ्यांदा सत्तेवर का बसवले नाही? मोदींच्या आवाहनानंतरही भाजपच्या बंडखोरांनी उमेदवारी मागे का घेतली नाही? काही उमेदवारांना मोदींनी फोन करून स्वत: विनंती केली होती, असे सांगितले जाते. शासन-प्रशासनावर पोलादी पकड असलेल्या भाजपच्या सर्वोच्च नेत्याचेही बंडखोरांनी ऐकले नाही. हे प्रश्न भाजपला सतावू शकतात.

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे दोन-तीन टक्के मतदार काँग्रेसकडे वळाले, त्यामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ झाली. पर्यायाने हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला ३५ जागांचा बहुमतांचा आकडा पार करता आला. उलट, गुजरातमध्ये प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात काँग्रेसचे अस्तित्व जाणवले, तेही वादग्रस्त ठरले. काँग्रेसच्या नेत्यांनी मोदींना थेट लक्ष्य केल्यामुळे भाजपने भूमिपुत्र, गुजरात अस्मिता, विकासविरोध असे निवडणुकीच्या रणधुमाळीत हमखास यश मिळवून देणारे मुद्दे काँग्रेसविरोधात मांडले. काँग्रेसची दोन-तीन टक्के भाजपला मिळालेली मते कदाचित मोदींविरोधात नाहक वाद निर्माण केल्यामुळे मिळाली का, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. गुजरातमधील भाजपच्या विजयात निवडणुकीतून गायब झालेल्या काँग्रेसचा वाटा मोठा असल्याचे मान्य केले पाहिजे.

mahesh.sarlashkar@expressindia.com

Story img Loader