रॉबर्ट तथा बॉबी चाल्र्टन हे ऐन भरात असताना इंग्लंडने फुटबॉलमधील एकमेव जगज्जेतेपद पटकावले. त्यांच्या निवृत्तीपश्चात इंग्लंडला आजतागायत हे साधलेले नाही, यातून चाल्र्टन यांचे अमूल्यत्व प्रस्थापित होते. आता तर त्यांच्या निधनानंतर इंग्लिश फुटबॉल चाहत्यांसाठी हे अमूल्यत्व एखाद्या विशाल पोकळीसारखेच खंतावणारे ठरेल. इतिहासात अशाच एका पोकळीतूनच चाल्र्टन यांनी इंग्लंड आणि प्रसिद्ध क्लब मँचेस्टर युनायटेडला बाहेर काढले होते. १९५८मध्ये ते अवघे २१ वर्षांचे असताना, मँचेस्टर युनायटेड संघाला मायदेशी घेऊन जाणारे विमान म्युनिकमध्ये कोसळले. त्या अपघातात २३ मृतांमध्ये क्लबचे आठ खेळाडू होते. चाल्र्टन तसेच प्रशिक्षक मॅट्स बझ्बी बचावले. बॉबी चाल्र्टन यांना त्या अपघातात किरकोळ इजा झाली. पण मानसिक आघात मोठा होता. तरीही तीनच आठवडय़ांनी चाल्र्टन मैदानात उतरले. प्रशिक्षक बझ्बी त्याही वेळी रुग्णालयातच होते. मँचेस्टर युनायटेड क्लबला आणि इंग्लिश फुटबॉलला त्या घटनेतून उभारी देण्याचे काम चाल्र्टन यांनी केले.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध: शारिब रुदौलवी
बॉबी चाल्र्टन यांचा जन्म फुटबॉलप्रेमी आणि फुटबॉल खेळणाऱ्या कुटुंबात झाला. त्यांचे चार काका आणि एक मामा व्यावसायिक फुटबॉलपटू होते. मोठा भाऊ जॅक हाही फुटबॉलपटू आणि तोही इंग्लंडकडून खेळला. ‘त्यामुळे आणखी काही करण्याचा विचारही मनात आला नाही,’ असे चाल्र्टन यांनी एका मुलाखतीत सांगितले. चाल्र्टन यांनी इंग्लंडकडून त्या काळी सर्वाधिक ४९ गोल केले, जो विक्रम ४५ वर्षे अबाधित राहिला. त्यांनी मँचेस्टर युनायटेडकडूनही त्या काळी विक्रमी २४९ गोल केले. दोन्ही विक्रम वेन रूनीने अनुक्रमे २०१५ आणि २०१७मध्ये मोडले. पण रूनीला इंग्लंडसाठी जगज्जेतेपद जिंकता आले नाही. चाल्र्टन हे १९६६मधील जगज्जेत्या इंग्लिश संघाचे आधारस्तंभ होते. एका साखळी सामन्यात त्यांच्या पल्लेदार गोलने मेक्सिकोविरुद्ध इंग्लंडला आघाडी आणि उभारी मिळाली. पुढे उपान्त्य सामन्यात धोकादायक पोर्तुगालविरुद्ध त्यांनी दोन गोल केले. अंतिम सामन्यातही त्यांच्याकडून गोलांची अपेक्षा केली जात होती. पण इंग्लिश संघाचे तत्कालीन प्रशिक्षक आल्फ रॅम्से यांनी त्यांच्यावर पूर्णपणे भिन्न जबाबदारी सोपवली – प्रतिस्पर्धी जर्मन संघातील निष्णात खेळाडू फ्रान्झ बेकेनबाउर यांना रोखण्याची! गंमत म्हणजे बेकेनबाउर यांच्यावरही चाल्र्टन यांना रोखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ‘बॉबी चाल्र्टन अतिशय तंदुरुस्त आणि चपळ होते. त्या द्वंद्वात ते मला भारी पडले. सामन्याचा निकालही यामुळे इंग्लंडच्या बाजूने फिरला,’ अशी स्पष्ट कबुली बेकेनबाउर यांनी दिली. दोनच वर्षांनी युरोपिय क्लब अजिंक्यपदासाठी झालेल्या अंतिम लढतीत चाल्र्टन यांच्या खेळामुळे मँचेस्टर युनायटेडने पोर्तुगालच्या बेन्फिकाचा पराभव केला. दहा वर्षांनी एका दुर्दैवी अपघातानंतर मँचेस्टरसाठी एक चक्र पूर्ण झाले. अप्रतिम नियंत्रण, विलक्षण वेग ही चाल्र्टन यांची वैशिष्टय़े होतीच. शिवाय त्यांच्या खिलाडूवृत्तीबद्दल बॉबी चाल्र्टन यांना ‘फर्स्ट जन्टलमन ऑफ फुटबॉल’ असेही गौरवले गेले.