लोकसभा अथवा विधानसभेची जागा सदस्याचे निधन, राजीनामा किंवा अपात्र ठरल्याने रिक्त झाल्यास सहा महिन्यांच्या मुदतीत भरण्याची स्पष्ट तरतूद १९५१च्या लोकप्रतिनिधी कायद्यात करण्यात आली आहे. यासाठी फक्त दोन अपवाद आहेत : एक म्हणजे सभागृहाची मुदत संपण्यास एक वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असणे किंवा सहा महिन्यांच्या मुदतीत पोटनिवडणूक घेणे शक्य नसल्याचे केंद्र सरकारने प्रमाणित करणे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली तेव्हा विद्यमान १७ व्या लोकसभेची मुदत संपण्यास १५ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी शिल्लक होता. म्हणजे कायद्यातील तरतुदीनुसार पोटनिवडणूक होणे अपेक्षित होते. पण निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रमच जाहीर केला नाही. या विरोधात पुण्यातील एका मतदाराने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने पुण्यात तात्काळ लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याचा आदेश दिला. हा आदेश विलंबाने आला असला तरी त्यातून पुण्याची पोटनिवडणूक टाळण्याचा निवडणूक आयोगाचा कारभारच अधोरेखित झाला आहे. लोकसभेची मुदत संपण्यास १५ महिन्यांचा कालावधी असतानाही पुण्यात पोटनिवडणूक घेण्यात आली नाही. पण २०१८ मध्ये कर्नाटकातील शिमोगा, बेल्लारी आणि मंडया या तीन मतदारसंघांमध्ये लोकसभेची मुदत संपण्यास एक वर्ष आणि १२ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना पोटनिवडणूक झाली होती. खासदार प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर १३ महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना ठाणे मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. वाशीम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघात विधानसभेची मुदत संपण्यास सहा महिने असताना पोटनिवडणूक झाली होती. पुण्याबाबत ‘आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत प्रशासकीय यंत्रणा गुंतलेली असल्याने पुण्यात पोटनिवडणूक घेणे शक्य झाले नाही’, असा युक्तिवाद निवडणूक आयोगाने केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा