यंदाची बुकर पारितोषिकासाठीच्या मानांकनाची लघुयादी जाहीर झाली असून, यंदाचे वेगळेपण यात सहा कादंबरीकारांपैकी पाच लेखिका आहेत. एकटा पर्सिव्हल एव्हरेट हा एकमेव पुरुष ‘जेम्स’ या कादंबरीसह यंदाच्या स्पर्धेत आहे. पहिल्यांदाच नेदरलॅण्ड्समधील साहित्यिकाला मानांकन मिळाले असून ऑस्ट्रेलियामधील कादंबरी दशकभरानंतर बुकरच्या पटलावर दाखल झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘बुकर’च्या दीर्घ आणि लघुयादीत स्थान मिळविणाऱ्या कादंबऱ्यांचे महत्त्व हे त्यांना जगभरामध्ये अतिओळख मिळवून देणारे असल्याने या दोन महिन्यांत सर्वच खंडांमधील आंतरराष्ट्रीय पुस्तक बाजारपेठा असलेल्या देशांत बुकरची पुस्तके वाचकांकडून मोठ्या प्रमाणात उचलली जातात. आपल्याकडे येणाऱ्या आंग्ल कादंबऱ्यांच्या प्रकाशनासंबंधीची छोट्या टायपातील माहिती वाचाल तर भारतात दिल्लीमध्ये या प्रकाशन संस्थांची कार्यालये असल्याचे नमूद असते. बुकरच्या यादीतील पुस्तकांची दहा-पंधरा वर्षांपूर्वीची आणि आताची उपलब्धता यात मोठा फरक पडला आहे. पूर्वी लघुयादी आल्यानंतरदेखील काही पुस्तके आपल्या अधिकृत बाजारपेठेत पोहोचायला वेळ लागत असे. आता दीर्घयादी लागताच आठवड्यात ती भारतातील शहरांत आणि निमशहरांत उपलब्ध होताहेत. अॅमेझॉन आणि इतर ऑनलाइन पुस्तक विक्री हा यातला दुवा हे एक कारण असले, तरी ही पुस्तके घ्यायची ठरवणाऱ्या वाचकांचा टक्का वाढला असल्याचा मुद्दाही आहेच.
तर यंदा या बुकरप्रसारी महिन्यात एक बदल झाला आहे, तो आंतरराष्ट्रीय पातळीवर पुस्तक विक्रीची गणिते ठरवणाऱ्या नव्या यंत्रणेकडून. त्याची दखल या सदरातील पुस्तके वाचायला घेण्यापूर्वी समजून घेणे महत्त्वाचे.
इन्फ्लू्अन्सर-सेलिब्रेटींच्या बुकक्लब्जमधून पुस्तकाची प्रसिद्धी करण्याचा झपाटा गेल्या काही वर्षांतला. पूर्वी या आघाडीवर फक्त ओप्रा विन्फ्रे यांचे ‘पुस्तक मंडळ’ (१९९६पासून) कार्यरत होते. २०१७ पासून आत्तापर्यंत अभिनेत्री रिस विदरस्पून ते गायिका डुवा लिप्पा (२०२३) आणि मालिकांमधील मिंडी कालिंगपासून सारा जेसिका पार्करपर्यंत साऱ्याच अमुक-तमुक पुस्तक घेऊन दर महिन्याला ग्रंथविक्रीच्या उलाढालीस मदत करीत आहेत. अर्थात आपली पुस्तक वाचनसुखाची हौस म्हणून नाही, तर निव्वळ व्यवसायाचा आणि आपल्या तारांकित असण्याचा भाग म्हणून. सिनेमांतील भूमिकांमधून जितका पैसा रिस विदरस्पूनने नसेल मिळवला, त्याच्या कैकपटींचा व्यवसाय तिला बुक क्लबने करून दिला. तिने ‘हॅलो सनशाइन’ नावाची एक कंपनी स्थापन केली, त्याअंतर्गत या पुस्तक मंडळाचे काम उभारले. हे बुक क्लबनंतर सिनेमा आणि मालिकांसाठी विविध निर्मात्यांच्या कंपन्यांसाठी पुस्तक निवडीचे काम करू लागले. ज्यातून कंपनी वट्ट नव्वद कोटी डॉलर (सात हजार ५०० कोटी रुपये) इतक्या नफ्याच्या उलाढालीची बनली. डोळे पांढरे झालेल्या डझनावरी प्रभावशाली महिलांना यानंतर अचानक पुुस्तकछंदाने घेरले. या सेलिब्रेटी आपल्या समाजमाध्यमावरील जागतिक अनुयायांना (फॉलोवर्स) आपल्या बुकक्लबची गोडी लावू लागले. त्यांना विकत घेण्यासाठी पुस्तक सुचवू लागले. प्रभावशाली व्यक्तींच्या या पुस्तक ‘देखरेखी’ने कैक लेखकांना खूपविक्यांच्या पंगतीत बसण्याची संधी दिली. पुस्तकांच्या हजारो-लाखोंच्या प्रती संपू लागल्या.
बुकर-बाह्य वलयांकित
याच यंत्रणेतून लोकप्रियतेचा कळस गाठलेल्या आयरिश लेखिका सॅली रूनी हिने या आठवड्यात मंगळवारी बुकरच्या लघुयादीतील लेखकांहून अधिक प्रकाशझोत मिळविला. रूनी ही अवघ्या तेहतीस वर्षांची. तिची दुसरी कादंबरी ‘नॉर्मल पीपल’ २०१८ साली बुकरच्या दीर्घयादीमध्ये समाविष्ट होती. टेलर स्वीफ्ट, लेना डनम, सारा जेसिका पार्कर यांच्या बुकक्लबांनी आपल्या चाहत्यांना शिफारस केलेली ही लेखिका व्हॉट्सअॅप-स्नॅपचॅटमध्ये रमलेल्या पिढीला चितारणी ‘सालिंजर’ म्हणून गौरविली जाते.(दोन कादंबऱ्यांवर आलेल्या रोमॅण्टिक मालिकांमुुळेही तिच्या पुस्तकांवर वाचकांची पकड वाढत गेली.) तरुणाईचा तिची ‘इंटरमेझ्झो’ (इंटमेझ्झो) नावाची ताजी कादंबरी मंगळावारी किती थाटामाटात प्रकाशित व्हावी, तर अमेरिकेतील १४० लहान-मोठ्या पुस्तक दुकानांनी मध्यरात्री १२ वाजता या पुस्तकाचा प्रकाशन स्वागत सोहळा कार्यक्रम आखला होता. नववर्ष सोहळ्यासारखे पुस्तक स्वागताच्या कार्यक्रमाला जाऊन वाचकांनी लेखिकेच्या सही (आधीच केलेल्या) असलेल्या प्रती मिळविण्यासाठी गर्दी केली. न्यू यॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार असले पुस्तक स्वागताचे दिव्य प्रकरण फक्त जे. के. रोलिंग यांच्या हॅरी पॉटरच्या शेवटच्या पुस्तकाबाबत २००७ साली घडले होते. ‘गर्ल्स’ ही मालिका बनवून तेव्हा चर्चेत आलेल्या लेना डनम या अभिनेत्रीने मिरांडा जुलै या आपल्या मैत्रिणीच्या ‘द फर्स्ट बॅड मॅन’(२०१५) या कादंबरीला आपल्या (तेव्हाच्या ट्विटर, इन्स्टा हॅण्टलवर) छायाचित्र काढून वाचण्यास सुचवले. कोट्यवधी अनुयायांपैकी वाचनप्रेमींनी या कादंबरीची लाखाची आवृत्ती दोन दिवसांत संपवली, ही देखील (तेव्हा वृत्त न बनलेली) एक लक्षवेधी घटना होती.
भारतात हे होणे शक्य आहे काय? पैसा कमावण्याचा हा कुटीरोद्याोग इथल्या सेलिब्रेटींच्या दृष्टिपथात आलाच नसेल काय? की इथल्या तारांकितांना आपले ‘सेलिब्रिटित्व’ वाचन नावाच्या गोष्टीशी जोडता येण्याची कला जमायची शक्यता नाही? की पुस्तक वाचनासारख्या शहाण्या गोष्टी आपल्या चाहत्यांना सांगून त्यांच्यातील पिढीजात मूर्खप्रवणता हिरावून घेण्याचा प्रमाद करावयास ते धजावत नाहीत? लोक मोठ्या प्रमाणात वाचू लागून सजग बनले, तर ‘बिग बॉस’सह सर्व रिअॅलिटी शोजचा, मोबाइल-इंटरनेटच्या बाजारपेठेचा विस्तार कसा होणार, ही भीती यामागे असेल काय? देशातील शहर ते गावखेड्यांत मोबाइलच्या चौकोनात, टॅबलेट्सच्या आयतात बुडालेल्या लोकांना ‘एकाग्रता कमावण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे’, हे ऐकून घेण्यासाठी पुढील दहाएक वर्षांत कदाचित महागड्या समुपदेशकांकडे खर्च करायला आवडेल. पण आज रील्सरिळांत बागडण्याचा नाद सोडायची बहुतांशांची तयारी नाही, हे खरे.
‘बुकर’-पेठ भक्कमच
तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पुस्तकांच्या प्रसिद्धी यंत्रणांच्या सोसात ‘बुक इव्हेण्ट्स’ घडत असताना अन् त्याच्या उलट आपल्याकडे वाचक घडविण्यातील अनास्थेच्या पातळीत फरक होण्याची चिन्हे नसताना बुकर पारितोषिकासाठीच्या पुस्तकांची बाजारपेठ शाबूत राहिलीय ही गंमतच. यंदा काही आंतरराष्ट्रीय प्रकाशनसंस्थांनी बुकरच्या दीर्घयादीतील पुस्तके भारतातच छापून किमती कमी ठेवण्याकडे बहुधा लक्ष दिलेय. (क्रिएशन लेकसह अनेक पुस्तकांच्या भारतीय दुकानांतील प्रती या हजार रुपयांहून कमी असल्याचे या वर्षीच पाहायला मिळाले.)
‘अमेरिकन फिक्शन’ या गेल्या वर्षी ऑस्करमध्ये गाजलेल्या चित्रपटानंतर (जो ज्या कादंबरीवर आधारला होता त्याचा लेखक) पर्सिव्हल एव्हरेट अधिक वाचला जात आहे. ‘हकलबरी फिन’ला कृष्णवर्णीय निवेदकासह मांडणारी ‘जेम्स’ ही त्याची कादंबरी किंवा अमेरिकी लेखिका रेचल कुशनर यांची ‘क्रिएशन लेक’ हे पर्यावरणाचा प्रश्न रहस्यकथेच्या थाटात मांडणारे पुस्तक यंदाच्या बुकरवर नाव कोरेल, अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे त्याव्यतिरिक्त असलेल्या स्पर्धकांपैकी ब्रिटिश लेखिका सामंथा हार्वे यांची ‘ऑर्बिटल’, याएल वान डर वाडन या डच लेखिकेची ‘द सेफ कीप’, ऑस्ट्रेलियामधील शार्लोट वुड यांची ‘स्टोन यार्ड डिव्होशनल’, कॅनडातील कवयित्री आणि लेखिका एन मिशेल यांची ‘हेल्ड’ यांतून विजेता ठरलाच तर कोण, याचे कुतूहल आता वाढलेले आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार याद्यांमधील सर्वच कादंबऱ्या आपल्याकडे होणाऱ्या ‘बुक फेस्टिव्हल्स’मध्ये मिरवतात. बुकरइतकाच मान ‘जेसीबी’ पुरस्कारांच्या दीर्घ-लघुयादीत असलेल्या पुस्तकांना मिळतो. देशभरातील आंग्ल वाचकांना आपली वाचन खरेदी यातून ठरवता येते. पुढील आठवड्यापासून सहा आठवडे सुरू राहणाऱ्या ‘बुकरायण’ या सदराचे हे दहावे वर्ष. वाचणारे ही पुस्तके जमवून वाचताहेत… आणि नाचणारे त्यांच्यासह छब्या काढण्यात दंगताहेत; हीच स्थिती यंदाही आहे. इन्फ्लूएन्सर जमात पुस्तक प्रसिद्धीचे नवे आराखडे तयार करते आहे.चांगल्या कादंबऱ्या वाचण्यात सुख मानणाऱ्यांना वाचन-निवडीची दिशा यंदाच्या ‘बुकरायणा’तून देखील मिळावी, ही अपेक्षा.
(पुढल्या शनिवारी : रेचल कुशनर यांच्या ‘क्रिएशन लेक’बद्दल)
हेही वाचा...
‘गार्डियन’साठी गेली अनेक वर्षे बुकर पारितोषिकावर लिहिणाऱ्या या वृत्तपत्राच्या फिक्शन एडिटर जस्टिन जॉर्डन यंदाच्या बुकर पारितोषिकाच्या निवड समितीत आहेत. त्यांच्या नजरेतून लघुयादीतील पुस्तकांची लघुओळख. https:// shorturl. at/40 QsY
सॅली रूनी या आयरिश लेखिकेच्या चारपैकी दोन कादंबऱ्यांवर मालिका आल्यानंतर, तिची पुस्तके वाचणे हे आज विशीत असलेल्या पिढीला आपले ‘वाचकपण’ मिरवण्याचे साधन कसे बनले, ते मांडणारा निबंध. https:// shorturl. at/ JomTU
स्लोव्हाकिया गेल्या आठवड्यात चर्चेत आले वेगळ्या कारणांसाठी. पुस्तकांवरील ‘व्हॅट’ वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला! यावरील टीकेतून आता निर्णय बदलण्यात आला. त्यावषियी येथे वाचता येईल.
https:// shorturl. at/ NAI8 o
pankaj.bhosale@expressindia.com