‘भारत आणि भारतीय यांच्याबद्दल विन्स्टन चर्चिल यांची धोरणे इतकी खुनशी का होती?’ हा ब्रिटिश इतिहासकार वॉल्टर रीड यांच्या आगामी पुस्तकातला मध्यवर्ती प्रश्न! चर्चिल यांचा भारतद्वेष भारतीयांना माहीत आहेच. त्याविषयी भारतीयांनी लिहिलेली किमान दोन पुस्तकं यापूर्वी, प्रकाशित झालेली आहेत. पहिलं ‘चर्चिल्स सीक्रेट वॉर’ (२०१०) – ते पर्यावरण-इतिहासकार मधुश्री मुखर्जी यांनी लिहिलं. १९४४ चा बंगालचा दुष्काळ आणि त्याला ब्रिटिशांनी दिलेला प्रतिसाद यांचा ऊहापोह त्यात विस्तारानं आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरं, ‘चर्चिल अ‍ॅण्ड इंडिया: मॅनिप्युलेशन ऑर बिट्रेअल?’ (२०२२) हे पुस्तक माजी राजनैतिक अधिकारी किशन एस. राणा यांचं. चर्चिल १८९६ साली,  वयाच्या बाविसाव्या वर्षी ब्रिटिश घोडदळाचे सेकंड लेफ्टनंट या पदावर असताना भारतात आले तेव्हा आणि १९०० सालापासून पार्लमेण्टचे सदस्य म्हणून आणि १० मे १९४० पासून जुलै १९४५ पर्यंत पंतप्रधान म्हणून वेळोवेळी त्यांच्या भूमिका भारतविरोधीच कशा होत्या, याचा आढावा या पुस्तकात आहे. मात्र फाळणीबद्दल भारतीय लेखकाला इथल्या राजकीय नेत्यांचाही आढावा घ्यावा लागतो, तसा तो घेताना राणा असा सूर लावतात की, ‘भारतीय नेते वाहावत गेले की खरोखरच त्यांना फसवले गेले?’ हाच प्रश्न महत्त्वाचा ठरावा. याउलट वॉल्टर रीड यांचा प्रश्न स्पष्ट आहे! शिवाय चर्चिलआधीचे पंतप्रधान नेव्हिल चेम्बरलेन यांचं चरित्र, चर्चिल आणि दुसरं महायुद्ध,  अरब देश अशी रीड यांची अन्य पुस्तकं आहेत.  ‘किपिंग द ज्युवेल इन क्राउन- द ब्रिटिश बिट्रेअल ऑफ इंडिया’ (२०१६) हेही रीड यांचंच पुस्तक. थोडक्यात रीड यांचा अधिकार वादातीत! पण ‘हस्र्ट’ या ब्रिटिश प्रकाशनगृहाचं  हे पुस्तक २०२४ च्या जानेवारीत येणार आहे, तोवर प्रतीक्षा करावी लागेल.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book information fighting retreat winston churchill and india zws
Show comments