‘नेक्सस’ या पुस्तकाची घोषणा जानेवारीत झाली, तेव्हापासून अनेकांना माहीत असेल की युवाल नोआ हरारी यांचं हे पुस्तक सप्टेंबर २०२४ मध्ये प्रकाशित होणार आहे. आता ‘१० सप्टेंबर’ ही प्रकाशन-तारीख जाहीर झाली असून प्रकाशनाआधीची विक्रीही सुरू झालेली आहे. ऑफव्हाइट/ बदामीपांढरा म्हणावा अशा रंगाचं आणि अक्षरं-चित्रांची गर्दी टाळणारं मुखपृष्ठ जसं सेपियन्सचं होतं, २१ लेसन्स फॉर ट्वेन्टिफर्स्ट सेंच्युरीचं होतं, तसंच या नेक्ससचंही आहे. ‘ब्रीफ हिस्ट्री ऑफ इन्फर्मेशन नेटवर्क्स फ्रॉम स्टोन एज टु एआय’ हे नेक्ससचं उपशीर्षक. याआधी दूरसंपर्क यंत्रणेतल्या स्थित्यंतरांचा इतिहास सांगणारी पुस्तकं आली होतीच- गुहाचित्रं, कबुतरांच्या पायांना बांधलेल्या चिठ्ठ्या, मग तारायंत्राचा शोध, फोन, ई-मेल ते मोबाइल असंच स्वरूप असलेली किमान दोन पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. पण हे हरारींचं पुस्तक! स्वत:ला ‘बदलाविषयी भाष्य करणारा इतिहासकार’ म्हणवणारे हरारी. त्यामुळे हे पुस्तक संपर्क यंत्रणांच्या विकासाबद्दल नसून, मानवानं ‘माहिती’चं काय केलं, माहितीचं आदानप्रदान कसं होत गेलं, त्यातून मानव आणि माहिती यांचं नातं कसं बदलत गेलं, याचा शोध घेतं.
हेही वाचा >>> अन्वयार्थ: चंद्राबाबूंचे चोचले चालतील?
मानवी बुद्धी ही केवळ मानवी राहणार नसल्याचं भाकीत हरारी अगदी ‘सेपियन्स’पासून करताहेत. या पुस्तकातही ‘मानवी मेंदूच संगणकाला जोडण्याची सोय’ वगैरे त्यांच्या आवडत्या कल्पना असतीलच (बहुधा). पण सध्या तरी पुस्तकाबद्दल अतिगोपनीयता पाळली जाते आहे. १० सप्टेंबरला किमान पाच भाषांत प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाची पूर्वप्रसिद्धी बड्या मीडियाकडूनच व्हावी, याची काळजी पेन्ग्विनसारखं प्रकाशनगृह नक्कीच घेईल, पण त्याला अद्याप अवकाश आहे. तोवर वाचकांनी हे आठवून पाहावं की, ‘सिलिकॉन कर्टन’ किंवा ‘हॅक्ड ह्यूमन्स’ यासारखे शब्दप्रयोग हरारींनी आधीच केलेले आहेत. चीन आणि अमेरिका यांच्यादरम्यान जगभरातून विदा जमा करण्याची स्पर्धाच आहे पण ती मानवी जगण्याला कुठं नेईल? कुठले पदार्थ मागवा, काय वाचा, काय खरेदी करा हे इंटरनेट-आधारित अॅप्स आपल्याला आजच सांगताहेत. वापरकर्ता कसा आहे, त्याच्या आवडीनिवडी काय, हे या माहितीजाळ्याला वापरकर्त्यापेक्षाही अधिक अचूकपणे माहीत असू शकतं, त्यात भर पडली आहे ती रक्तदाब/ हृदयक्रिया/ शारीरिक हालचाल मोजणाऱ्या घड्याळांची. हे सारं माहितीचा खासगीपणा नष्ट करणारं तर आहेच, पण एखाद्याला अमुक माहिती ‘असणं’ किंवा माहीत असलेल्या बाबींआधारे नवी माहिती ‘तयार करणं’ या क्रिया यापुढे मानवी नियंत्रणाखाली राहतील की नाही, अशा शंकेचं बी हरारींच्या आजवरच्या विचारांनी वाचकांच्या डोक्यात पेरलेलं आहे. ‘नेक्सस’ हे त्याच बीचं झाड असेल का? त्याची फळं.. मग त्याच्या आणखी बिया… मराठीतही येतीलच त्या कधी तरी!