हा ब्रिटिश लेखक कालबाह्य व्हायची शक्यता का नाही, या प्रश्नाचे उत्तर लंडनमधील सर्वस्तरीय-वर्गीय लोक जितके स्पष्ट देतील तितक्याच तन्मयतेने महाराष्ट्रातील मुंबई-पुणे-ठाणे-बदलापूर-पिंपरी-चिंचवड-सातारा-कोल्हापूर, सांगली, नाशिकमध्ये आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घातलेले गेल्या दोन-तीन दशकांतील पालकही देऊ शकतील. कारण वय वर्षे सात ते पंधरा या मुलांना ‘मटिल्डा’, ‘चार्ली ॲण्ड चॉकलेट फॅक्टरी’, ‘बीएफजी’, ‘फॅण्टॅस्टिक मिस्टर फॉक्स’, ‘जेम्स ॲण्ड जायंट पीच’ आणि रोआल्ड डालच्या इतर बालपुस्तकांच्या प्रती दुकानांतून, ऑनलाइन दालनांतून, शाळेशी संलग्न पुस्तक वितरणातून घेण्यासाठी या पालकांनी बऱ्यापैकी खर्च केलेला असेल. आजही राज्यातील कुठल्याही आडभागाच्या जुन्या पुस्तकविक्रेत्यांकडे रोआल्ड डाल ढिगाने सापडण्याचे कारणही हेच आहे. इतर खंडांतल्या, विविधभाषी विकसनशील राष्ट्रांसह भारतातील इंग्रजी शाळांतील मुलांचे इंग्रजी वाचन वृद्धिंगत करण्यामध्ये रोआल्ड डालच कारणीभूत ठरत आहे.
आपल्याकडे ब्रिटिश बाललेखिका रिचमल क्रॉम्प्टनच्या ‘जस्ट विल्यम्स’ने प्रेरणा घेऊन बरेच नायक स्वातंत्र्यपूर्व काळापासून तयार झाले. गोट्या त्याची वाचकडी बहीण चिंगी हेच ना. धों. ताम्हनकरांचे मानसनायक नव्हते. इतरही अनेक बालव्यक्तिरेखा त्यांनी तयार केल्या, त्या ‘विल्यम’ला मराठी रुपडे देऊन. इतरांनी याच वाटेवरून चंदू, बंडू अशा अनेक नायकांना येथे प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले. पुढे रोआल्ड डाल यांचे समकालीन मराठी लेखक भा. रा. भागवत यांनी लहान मुलांनी काय आणि कसे वाचावे, याचा धडा घालून देण्यासाठी बालसाहित्यात अनुवादित आणि स्वतंत्र असे भरपूर काम करून ठेवले. दोनेक पिढ्यांना मराठी भाषा समृद्धीचे टॉनिक त्यांतून मिळाले. (रशियन बालपुस्तकांचे प्रचारी बालसाहित्यही इथल्या मराठी बालवाचकांनी फडशा पाडून वाचले. पुढे ते येणे थांबले आणि भा. रा. भागवत यांचे वाचन टाॅनिक नवे बालवाचक इंग्रजीकडे वळल्याने वाया गेले. भागवतांच्या पुस्तकांचा विलुु्प्त होण्याकडे प्रवास सुरू झाला.) नंतर मग रोआल्ड डाल, ज्यांच्या बालपुस्तकांची २०१८ पर्यंत ‘द रोआल्ड डाल स्टोरी कंपनी’च्या अधिकृत विक्रीफायद्यातून खपलेली संख्या तीस कोटी इतकी आहे (अनधिकृत याच्या अनेक पट असू शकते), ते यापुढेही विक्रीत-नफ्यात राहतील याची दक्षता भारताप्रमाणेच इंग्रेजेतर देशांतील पालक घेत राहणार आहेत. त्यात ‘नेटफ्लिक्स’ या जगातील कुटुंबांचे वीज-पाणीइतकेच महत्त्वाचे अंग बनलेल्या ओटीटी फलाटाने ‘द रोआल्ड डाल स्टोरी कंपनी’कडून करोनापूर्वी सर्वच्या सर्व १६ बाल पुस्तकांचे हक्क सिनेमा बनविण्यासाठी घेतल्यानंतर डाल यांचे अमरत्व पुढल्या कैक पिढ्यांना पुरणार आहे.
हेही वाचा >>> बुकमार्क: अर्थपूर्ण दीर्घायुष्यासाठी..
तर ‘बुकबातमी’चा मुद्दा, हा रोआल्ड डाल यांच्या ‘द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर’ गोष्टीवरचा लघुपट यंदा ऑस्कर विजेता ठरला त्याबाबतचा आहे. माध्यमांकडून ‘ओपेनहायमर’ किंवा सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीतील अनेक खूपविक्या पुस्तकांवर पडलेल्या अतिप्रकाशझोतात वेस ॲण्डरसन या तिकडमोत्तमराव दिग्दर्शकाला ‘हेन्री शुगर…’साठी पहिल्यांदाच मिळालेल्या पुरस्काराकडे दुर्लक्ष झाले.
‘द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर ॲण्ड सिक्स मोअर’ हा रोआल्ड डाल यांचा कथासंग्रह. महाराष्ट्रातील कोणत्याही इंग्रजी पुस्तकांच्या दुकानात तो सहज मिळतो. मुंबईत फाऊंटन रस्ता दालनात शेकड्यानी प्रतींसह. गेल्या वर्षी ‘द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर ॲण्ड थ्री मोअर’ (द स्वान, रॅटकॅचर आणि पाॅयझन या तीन कथांवर तीन वेगळे लघुपट.) असा नेटफ्लिक्सचा वेस ॲण्डरसन दिग्दर्शित ऐवज आला. या कथेत रोआल्ड डाल यांच्या ‘हेन्री शुगर’ नामक उधळ्या-अवलियाला वारशाने आलेल्या ग्रंथदालनात एका भारतीय डाॅक्टरचा कोलकाता येथे लिहिलेला विचित्र अहवाल सापडतो. डोळ्यांवर पट्टी बांधून सारे पाहू शकणाऱ्या व्यक्तीविषयीचा. सर्कसमध्ये काम करणाऱ्या या व्यक्तीने योगसाधनेतून ती सिद्धी प्राप्त केलेली असते. हेन्री शुगर या भारतीय योग्याच्या साधना तीन वर्षे अवलंबतो आणि त्याच्यातही दिव्यशक्ती येते. या शक्तीचा वापर जुगारादी खेळांत वापरून हेन्री श्रीमंत होतो आणि त्यानंतर अमाप पैशांवर लोळणारा ‘हेन्री शुगर’ पुढे काय काय करीत राहतो, तो डाल यांच्या लघुकथेच्या आकर्षणाचा भाग आहे. गोष्टीमधून दुसरी गोष्ट सांगत, या लघुकथेला वेस ॲण्डरसनने ३३ मिनिटे फुलवत ठेवले आहे. (दुसरीकडे, डाॅक्टरचा अहवाल सापडूनच सुरू झालेली अलासडेअर ग्रे या स्कॉटलंडमधील लेखकाची ‘पुअर थिंग्ज’ नामक कादंबरी चित्रपट आल्यापासून खपतेय.)
रोआल्ड डाल यांच्या ‘हेन्री शुगर’च काय, कुठल्याही पुस्तकाच्या प्रती त्यावर चित्रपट आला नाही, तरी खोऱ्याने संपतच राहणार आहेत. पण वेस ॲण्डरसनच्या शैलीत रोआल्ड डालची कथा पडद्यावर साकारली जाणे, हा महाअनुभव का आहे, तर या चित्रकर्त्याच्या सर्व सिनेमांवर साहित्याचा मोठा पगडा आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने ‘न्यू यॉर्कर’ या साप्ताहिकासारख्याच पण काल्पनिक ‘फ्रेन्च डिस्पॅच’ नामक अंकाचे वाचन, हा आपल्या सिनेमाच्या पटकथेचा भाग केला होता. साप्ताहिकाचे वाचन सिनेमात परावर्तित करणाऱ्या या अचाट प्रयोगाला त्या वर्षी ऑस्करचे शून्य मानांकन होते. त्यामुळेच की काय, यंदा मिळालेल्या पुरस्काराला घेण्यासाठीही वेस ॲण्डरसन सोहळ्यात हजर नव्हता, अशी अटकळ बांधली जात होती. तूर्त रोआल्ड डाल यांच्या ‘द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर’ या कथेचे रूपांतरहक्क मिळवलेल्या नेटफ्लिक्सकडून या लघुपटाला मिळालेले ऑस्कर पारितोषिक दणक्यात साजरे केले जात आहे.
इथले नेटफ्लिक्सधारक त्या सिनेमात येणारी भारतीय नावे आणि व्यक्तिरेखा पाहून अचंबित होत आहेत, तर रोआल्ड डाल यांच्या कथा वाचलेली इथली मुले नेटफ्लिक्सने रूपांतर केलेल्या रोआल्ड डालकृत ‘अदर थ्री’चाही मजेत आस्वाद घेत आहेत. भा. रा. भागवतांची तीस-चाळीस वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली आणि तरीही आज अतिदुर्मीळ बनत चाललेली पुस्तके उपलब्ध करण्यासाठी ‘शिवकालीन/ महापुराणा’च्या भूल-गुंगीत अडकलेल्या चित्रकर्त्यांतून कुणी जागे होईल काय?