आरती कुमार-राव या पर्यावरण- छायाचित्रकार म्हणून अधिक परिचित आहेत, याचं कारण इतकंच की त्यांचं लिखाण वाचण्यापूर्वी त्यांची छायाचित्रं कुणाचंही लक्ष चटकन वेधतात! ‘नॅशनल जिऑग्राफिक’तर्फे त्या देशोदेशी गेल्या, आफ्रिकेतल्या मसाईमारा अभयारण्यापासून थायलंडमधल्या हत्ती-अनाथालयांपर्यंतच्या कथा-व्यथा त्यांनी शब्दांतून आणि छायाचित्रांतून मांडल्या.. पण त्यांचं नवं – मे अखेरीस प्रकाशित होणारं पुस्तक या जगभ्रमंतीचं नसून भारताचीच निराळी ओळख देणारं आहे. हा भारत परिघावरचा. पर्यटकांच्या वहिवाटीबाहेरचा. राजस्थानातलं थर वाळवंट, हिमाचल प्रदेश आणि लडाख इथली सीमावर्ती तिबेटी गावं, सुंदरबनातले रहिवासी, पश्चिम घाटातलीच पण दुर्गम गावं.. अशा ठिकाणांना वेळोवेळी दिलेल्या भेटींमधून जे दिसलं ते आरती यांनी छायाचित्रांतून टिपलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोलकात्यापासून थोडं पुढे गेल्यावर दिसणारे ढासळते नदीकाठ पुढे सुंदरबनापर्यंत परिणाम घडवतात. खचणाऱ्या या वस्त्यांमधली माणसं आधीपासूनच खचलेली आहेत, त्यांना पूर्वीप्रमाणे मासेमारीवर जगता येत नाही, व्यावसायिक मासेमारी इथंही पोहोचली आहे आणि वादळं वाढली आहेत. ही कुणाला ‘रडकथा’ वाटेल, पण लेखिका म्हणून आरती यांचं कौशल्य असं की, बदलत्या काळाच्या नोंदींची पखरण योग्यरीत्या करून या ऱ्हासाचं रहस्य त्या उलगडून दाखवतात. जगतानाचा संघर्ष इथं जित्याजागत्या माणसांच्या तोंडूनच ऐकू येतो आणि चिवटपणाचीही साक्ष मिळते. वाळवंटातल्या पाणी-साठवणीच्या पद्धती, लडाखमध्ये हिवाळय़ातल्या हिमातून उभारलेले जलसंचयाचे डोंगर (हिमस्तूप! ) आणि मनाली-लेह मार्गावरल्या ‘ग्या’ या खेडय़ातल्या तरुणांनी अशा हिमस्तुपाच्या आत छोट्टंसं कॅफे चालवण्याची दाखवलेली कल्पकता, त्या कॅफेतून मिळालेला पैसा गावातल्या वृद्धांसाठी वापरला जाणं.. असे भन्नाट किस्सेही आरती सांगत राहतात. हे वर्णन मग लेखिकेच्या प्रवासाचं राहात नाही..  तिथल्या माणसांच्या आणि अन्य जिवांच्या अधिवासाला त्यात केंद्रस्थान मिळतं. पिकॅडोर- पॅन मॅकमिलन इंडिया या प्रकाशनगृहातर्फे येणाऱ्या या २५६ पानी पुस्तकाची किंमत ७०० रुपयांपर्यंत असण्याचं कारण म्हणजे, त्यातली छायाचित्रं!